सध्या संपूर्ण राज्यात एकाच प्रकरणाने वातावरण ढवळून निघालं आहे, ते म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड (Santosh Deshmukh Murdercase) आणि त्यामध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) यांचा सहभाग असल्याचा आरोप. संतोष देशमुख जे मत्साजोगचे सरपंच होते, त्यांची 28 दिवसांपूर्वी हत्या झाली. ही हत्या अत्यंत निर्दयतेने करण्यात आली. अजूनही या क्रूर घटनेचे डिटेल्स बाहेर येत आहेत. प्रकरणाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाल्यानंतर, या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असला तरी अजून एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. या संपूर्ण घटनेनेच समाजात आणि राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड याचं कनेक्शन, त्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप यामुळे धनंजय मुंडे हे ही या प्रकरणात अडचणीतच येऊ लागले आहेत. वाल्मिक कराड हा आपली सगळी दुष्टकृत्ये धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच करत होता, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरला आहे. अजित दादांचा राष्ट्रवादी मित्रपक्ष असताना, धनंजय मुंडे हे फडणवीस मंत्रिमडळात मंत्री असतानाही धस यांनी हा आरोप लावून धरला आहे.
दिवसेंदिवस त्यांच्या आरोपांची धार धारदारच होत चालली आहे आणि या सगळ्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनच तीव्र होत चालली आहे. एवढी कि थेट धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या. शेवटी धनंजय मुंडे यांना स्वतः सांगावं लागलं की, मी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यापुढे केवळ राजीनाम्याच्याच ऑप्शन राहिला आहे का? अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो? जाणून घेऊ.
तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे केवळ आता बिडपुरतंच मर्यादित राहिलेलं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभर याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महत्वाचं म्हणजे त्यासाठी मोर्चे निघायला लागले आहेत. आतापर्यंत या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात तीन प्रमुख मोर्चे निघाले आहेत. पहिला मोर्चा 28 डिसेंबरला बीड जिल्ह्यात झाला, ज्यामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्च्याला सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. त्यातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्च्यात आक्रमक वक्तव्ये करण्यास सुरवात केल्यानंतर, या प्रकरणामुळे मराठा समाजही एकवटल्याचं चित्र आहे.
असाच दुसरा मोर्चा 4 जानेवारीला परभणीत निघाला. या मोर्च्यात हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी झाली. पुन्हा सर्वपक्षीय नेते होते आणि जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत, त्यांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा दिला. या संपूर्ण प्रकरणात तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा मोर्चा 5 जानेवारीला पुण्यात आयोजित करण्यात आला. मराठवाड्याबाहेर निघालेला हा मोर्चा संतोष देशमुख प्रकरणाला महाराष्ट्रभर पोहोचवणारा ठरला. संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय आता राज्यभर पसरलं आहे, याचं हे एक उदाहरण ठरलं.
कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाज असाच एकवटला होता आणि मरा
ठ्यांची ही एकजूट त्यानंतर सरकारला चांगलीच जड गेली होती. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या मोर्च्यांना थंड करणे, त्यासाठी संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे चौकशी होत असल्याचा दिलासा सरकारला द्यावा लागणार आहे. त्यासाठीच मग धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगणं हा एक सरळ, सोप्पा मार्ग आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा अटळ असण्यामागचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सर्वपक्षीव विरोध. धनंजय मुंडे याना विरोधकांकडून जेवढा विरोध आहे, तेवढाच विरोध हा मित्रपक्षांकडूनही आहे. हे संपूर्ण प्रकरण भाजपचे केजचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. सुरेश धस या प्रकरणात रोज आरोप करत आहेत आणि त्याला भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने विरोध केलेला नाही. अगदी फडणवीस यांची संमतीच घेऊन धस असे आरोप करत असल्याच्या चर्चाही घडत आहेत. सोबतच भाजपच्या बीड जिल्ह्यातील दुसऱ्या आमदार नमिता मुंदडा यांनीही या प्रकरणात विधिमंडळात आवाज उठवला आहे. सोबतच अजित दादांच्या पक्षाचेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधात जातील अशीच वक्तव्ये केली आहेत.
==================
हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार ?
==================
तसेच देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे आमदार अभिमन्यू पवार आणि मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांमध्ये तर जितेंद्र आव्हाड ते संजय राऊत या प्रकरणात राजीनाम्याची मागणी लावून धरत आहेत. त्यातच धनंजय मुंडे या प्रकरणात पुरते अडकले असतानाच अजित दादा पवार यांनीही मौनाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके वगळता कोणीही धनंजय मुंडे यांची बाजू लावताना दिसत नाहीये. त्यामुळे एकटे पडलेले धनंजय मुंडे हे कोणत्याही परिस्थितित राजीनामा देऊ शकतात अशी स्थिती आहे.
तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची मंत्र्यांबद्दलची ‘नो नॉन्सेन्स’ भूमिका. आतापर्यंत मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असावा, कोणाला मंत्रिमंडळातून बाहेर केलं जावं या याबद्दल फडणवीस पर्टिक्युलर राहिले आहेत. सोबतच गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मंत्र्यांचे राजीनामा घेतले गेले होते. बंजारा समाजाचे नेते म्हणून प्रतिमा असतानाही पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडीच्या काळात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. अनिल देशमुख यानांही असाच राजीनामा द्यावा लागला होता. त्याचप्रमाणे, धनंजय मुंडेंनाही राजकीय दबावामुळे राजीनामा द्यावा लागू शकतो, असं राजकीय विश्लेषक म्हणतात.