भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर अश्विनने त्याचा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आर. अश्विन रोहित शर्मासोबत उपस्थित होता. याच पत्रकार परिषदेमध्ये त्याने त्याची निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी टीम इंडियाने अश्विनला गार्ड ऑफ ऑनर दिला.
आर. अश्विन हा भारतीय क्रिकेट संघातील अतिशय महत्वाचा आणि मोठा गोलंदाज समजला जातो. अश्विनने त्याच्या कमालीच्या गोलंदाजीने अनेकदा भारताला सामना जिंकून दिला. याशिवाय अश्विन एक उत्तम फलंदाज देखील आहे. त्याने नेहमीच अटीतटीच्या सामन्यात भारताला आपल्या फलंदाजीच्या जोरावर तारले देखील. अशा या महान खेळाडूच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात एक पोकळी नक्कीच निर्माण होईल.
अश्विनने भारतासाठी एकूण २८७ मॅच खेळल्या. १०६ कसोटी सामन्यामध्ये त्याने ५३७ विकेट घेतल्या. यामध्ये त्याने २०० डावांमध्ये गोलंदाजी केली. त्याने ३७ वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. अश्विनने ११६ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने १५६ विकेट घेतल्या. तर ६५ टी २० मॅच खेळल्या त्यामध्ये ७२ विकेट घेतल्या. यासोबतच त्याच्या नावावर ३५०३ धावा आहेत. एकाच कसोटी सामन्यात शतक आणि ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने ४ वेळा केला आहे.
१४ वर्षांच्या मोठ्या करियरनंतर त्याने क्रिकेटला राम राम ठोकला. टीम इंडियासाठी सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणारा अश्विन अनिल कुंबळेंनंतर देशातील सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. अश्विन फक्त गोलंदाज म्हणूनच नाही तर एक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. अश्विनने त्याच्या मोठ्या क्रिकेट करियरमध्ये बक्कळ पैसा कमावला आहे. चला जाणून घेऊया त्याच्या एकूण संपत्तीबद्दल.
रविचंद्रन अश्विनची २०२४ मध्ये एकूण संपत्ती १३२ कोटी रुपये आहे. त्याच्या या मोठ्या संपत्तीमध्ये क्रिकेटचा सर्वाधिक वाटा आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सामन्यांपासून तसेच आयपीएलमधील उत्पन्नाचा समावेश आहे. याशिवाय अश्विन अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती करतो, ज्यातून तो बक्कळ कमाई करतो. २०२२-२३ च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बीसीसीआयने अश्विनला अ श्रेणीतील खेळाडूंच्या यादीत ठेवले होते. या करारातून त्याला वार्षिक ५ कोटी रुपये वेतन मिळाले.
राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी अश्विनला ५ कोटी रुपये मिळतात. यापूर्वी पंजाब अश्विन पंजाब किंग्सकडून खेळला होता यावेळी त्याला एका आयपीएल सीजनसाठी ७.६ कोटी रुपये मिळाले होते. २००८ मध्ये अश्विनने आयपीएलमध्ये डेब्यू केले होते यातून त्याने आतापर्यंत ८२ कोटी रुपये कमावले आहेत. रविचंद्रन अश्विनची मासिक कमाई ही जवळपास ५० लाख असल्याचे सांगितले जाते.
आर अश्विन जाहिरातींच्या माध्यमातून देखील सर्वात जास्त कमाई करतो. तो अनेक कंपन्यांचा ब्रँड अम्बॅसिडर आहे. अश्विन मिंत्रा, बोम्बे शेविंग कंपनी, मान्ना फूड्स, एरिस्टक्रेट बॅग्स, ओप्पो, मूव, स्पेक्समेकर्स, कोक स्टूडियो तमिल, ड्रीम 11 के यासारख्या ब्रँडला एंडोर्स करतो. तसेच त्याची पत्नी प्रीति नारायणनच्या इंस्टाग्रामवर लिहिलेल्यानुसार अश्विन जेन-नेक्स्ट क्रिकेट अकॅडमीचा मेंटॉर सुद्धा आहे. अश्विन कॅरम बॉक्स नावाची एक मीडिया आणि इव्हेंट कंपनी सुद्धा चालवतो.
अश्विनने २०२१ मध्ये चेन्नईमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला होता. त्यांच्या घराची किंमत जवळपास ९ कोटी रुपये आहे. या घरात तो पत्नी प्रीती अश्विन आणि दोन मुलींसह राहतो. याशिवाय अश्विनकडे कारचे मोठे आणि आलिशान कलेक्शन आहे. त्यांच्याकडे ६ कोटी किंमत असलेली रॉल्स रॉइस कार आहे. याशिवाय त्याच्या कार कलेक्शनमध्ये ९३ लाखांची Audi Q7 देखील आहे.