Home » चला, सामान भरा !

चला, सामान भरा !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेमध्ये 20 जानेवारीपासून डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता येणार आहे. ट्रम्प शासनकाळात अनेक कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ज्या स्थलांतरितांच्या मुलांनी अमेरिकेत जन्म घेतला आहे, त्यांना अमेरिकेच्या नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही. या निर्णयाची कठोरपणे अमंलबजावणी करणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केल्यावर उठलेली खळबळ कमी होते न होते तोच, त्यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या 15 लाख नागरिकांना बॅगा भरून तयार रहा अशा स्पष्ट सूचनाच त्यांनी दिल्या आहेत. या नागरिकांकडे अमेरिकेत निवास करण्यासाठी पुरेशी कागदपत्रे नसून त्यांना पुढच्या तीन वर्षात त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रीया करण्यात येणार आहे. या 15 लाख नागरिकांमध्ये 18 हजार भारतीयांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या नागरिकांच्या ओळखपत्रासंदर्भात भारताकडून अपेक्षित सहकार्य आलं नसल्यामुळे अमेरिकेच्या विभागानं भारतापुढे ‘नॉन-हेल्पफुल’ देश असा शिक्का मारला आहे. (America)

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढू असे सांगितले होते. आता ट्रम्प आपल्या शासन काळात त्यांच्या वचनपूर्तीसाठी तयारी करत आहेत. यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या स्थलांतरितांची यादीच बनवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. आता हे काम पूर्णत्वास आले असून त्या 15 लाख नागरिकांमध्ये 18 हजार भारतीयांचाही समावेश आहे. हे सर्व लोक बेकायदेशीर स्थलांतरित असून त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व नाहीच शिवाय नागरिकत्व घेण्यासाठी योग्य कागदपत्रेही नाहीत. ट्रम्प हे अमेरिकेचे आगामी राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चत झाल्यावर त्यांच्या सूचनेनुसार यूएस इमिग्रेशन-कस्टम्स एनफोर्समेंट कामास लागले आङे. या ICE विभागाने संपूर्ण अमेरिकेतून हद्दपारीसाठी ही 15 लाख नागरिकांची यादी तयार केली आहे. यूएस इमिग्रेशन-कस्टम्स एनफोर्समेंट ही अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांशी व्यवहार करणारी सरकारी एजन्सी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यावर या सर्वांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. अमेरिकेत मेक्सिको, एल साल्वोडेर येथून सर्वाधिक स्थलांतरित येतात. (International News)

त्यानंतर भारतीय नागरिकांचा नंबर लागतो. या सर्वांची ICE विभागाने यादी जाहीर केली आहे. यात असलेल्या भारतीयांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी भारतानं कुठलेही सहकार्य केला नसल्याचा ठपकाही या विभागानं मारला आहे. त्यामुळे भारताचा समावेश ‘नॉन-हेल्पफुल’ देशांच्या यादीत करण्यात आला आहे. ICE विभागाच्या माहितीनुसार अमेरिकेत 17,940 भारतीय बेकायदेशीर स्थलांतरित राहत आहेत.  या सर्वांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किमान तीन वर्षाचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. मात्र ही प्रक्रिया सुरु झाल्यावर अमेरिकेत बेकायदेशीरपणे स्थलांतरित होण्याचे प्रमाण कमी येईल, असेही सांगितले जात आहे. या सर्वात अमेरिकेत स्थलांतरित होणा-यांमध्ये भारतीयांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ICE या विभागानुसार गेल्या तीन वर्षात सरासरी 90 हजार भारतीय नागरिक बेकायदेशीरपणे अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करतांना पकडले गेले आहेत. यामध्ये भारताच्या पंजाब, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात समावेश आहे. भारतासोबत अमेरिकेत प्रवेश करणा-यांमध्ये अमेरिकेच्या शेजारील देशांचा अधिक समावेश आहेत. यात होंडुरासमधून 2 लाख 61 हजार नागरिक बेकायदेशीर नागरिक आहेत. या सर्वांनाही अमेरिकेतून बाहेर काढण्यात येणार आहे. (America)

========

हे देखील वाचा : दिवसा बर्गर रात्री मर्डर बर्गर किल्लरची थरारक स्टोरी !

======

त्यानंतर ग्वाटेमालामधील 2 लाख 53 हजार अवैध स्थलांतरित असून त्या सर्वांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरु झाली आहे. यासोबत चीनमधील नागरिकही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असून अमेरिकेच्या स्थलांतरीत नियंत्रण विभागातर्फे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अमेरिकेत सर्वाधिक स्थलांतरीत मेक्सिको मधून येत असून या देशाच्या सीमा कायमस्वरुपी बंद करण्यासाठी अमेरिका आता प्रयत्न करणार आहे. मेक्सिकोमधून आलेल्या नागरिकांचा गुन्हेगारीमध्ये समावेश असतो, असा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी केला होता. या वक्तव्याचा मेक्सिकोमध्ये निषेध करण्यात आला. मात्र मेक्सिकोमधील बेकायदेशीर स्थलांतराबाबत कोणतीही भूमिका जाहीर न करण्यात आल्यानं अमेरिकेतून मेक्सिकोमधील स्थलांतरित नागरिकांना बाहेर काढा ही मागणी जोर धरत आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.