त्यादिवशी अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरात एका बर्गर शॉपमध्ये खूप गर्दी होती. भारतासारखंच जिथे गर्दी जास्त ते दुकान भारी असं तिथे ही समजलं जातं होतं. लोकांना या बर्गरची चव शहरातल्या इतर बर्गर शॉपच्या तुलनेत वेगळी वाटत होती. बर्गर विकणारा सुद्धा सामान्य माणूस नव्हता. त्या दिवसाच्या एक दिवसा आधीच्या रात्रीच त्याने दोन वेश्यांची हत्या केली होती. ही त्याची कितीवी हत्या होती माहिती नाही. तो रात्रीच्या हत्या करायचा आणि दिवसा बर्गर विकायचा. हा बर्गर विकणारा किल्लर कोण होता? आणि त्याने केलेल्या हत्यांचा आणि त्या बर्गरचा काही संबंध होता का? जाणून घेऊया. (Joseph Metheny)
अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरात जोसेफ मेथेनीचं बालपण गेलं. बालपण गेलं म्हणण्यापेक्षा बालपण त्रासदायक गेलं म्हणणं बरोबर राहील. वडील नेहमी दारूच्या नशेत असायचे. मेथेनी सहा वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांच दारूच्या नशेमुळे मृत्यू झाला. लहानपणापासून तो शरीराने धडधाकट आणि उंच होता. वयाच्या १८ व्या वर्षी तो अमेरिकन आर्मीमध्ये भरती झाला. त्याची पोस्टिंग व्हिएतनाममध्ये झाली. व्हिएतनाममधील पोस्टिंग दरम्यान त्याला आर्मीच्या आयुष्याचा कंटाळा आला. म्हणून जेव्हा तो पुन्हा अमेरिकेत परतला, तेव्हा तो पुन्हा आर्मीत परतलाच नाही. तो रोज नशा करू लागला. ड्रग्स घ्यायला सुद्धा त्याने सुरुवात केली. अशातच त्याची ओळख एका मुलीशी झाली. ती मुलगी वेश्या होती. ते दोघ सोबत राहू लागले, सोबतच नशा करू लागेल. एका वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला. घरचा खर्च चालवण्यासाठी तो ट्रक चालवायचा. आता इथपर्यंत त्याची स्टोरी सिम्पल आहे. १९९३ चं साल होतं एक दिवस तो कामावरून घरी परतला तेव्हा घरात कोणीच नव्हतं त्याची प्रेयसी आणि मूलगा घरी नव्हते. त्याने वाट पाहिली ते त्याची प्रेयसी मुलाला घेऊन परतलीच नाही. त्याने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.
त्याला मुलगा आणि प्रेयसी बेपत्ता झाल्यामुळे तो दुखी होता. तो डिप्रेशनमध्ये सुद्धा गेला. तरी तो रोज रात्री त्यांचा शोध घ्यायचा. असंच एक वर्ष उलटलं, एके दिवशी त्याला समजलं की त्याची प्रेयसी बाल्टीमोर शहरातील एका पुलाजवळ ड्रग्ज घेण्यासाठी येते. मेथेनी आपल्या प्रेयसीच्या शोधात त्या पुलावर पोहोचला. तिथे ड्रग्स विकणाऱ्या दोन डिलरशी त्याने चौकशी केली. पण तिच्याबाबत त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या दोघांना याबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे प्रेयसीच्या शोधात संतापलेल्या मेथनीने त्यांच्यावर हातोड्याने वार केले. त्या दोघांना मारत असताना तिथे नदी किनारी मासेमारी करणाऱ्या एका मच्छीमाराने त्याला बघितलं. त्याने त्याला सुद्धा मारून टाकलं. त्याने तिघांचेही मृतदेह नदीत फेकून दिले तो हतोडा सुद्धा. दोन जण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. जोसेफ मेथेनीला अटकसुद्धा झाली. पण त्याच्या विरोधात कोणताही पुरावा न सापडल्यामुळे काही महिन्यातच मेथेनी तुरुंगातून सुटला. त्याचा राग आता अजून वाढला होता. त्याला हे कळालं होतं की, कोणताही पुरावा सापडला नाही तर आपण तुरुंगातून निर्दोष मुक्त सुटू शकतो. त्याने त्या सर्व लोकांना मारायचं ठरवलं जे त्याच्या प्रेयसीच्या ओळखीचे असतील. ड्रग्स डीलरपासून ते वेश्यांपर्यंत त्याने सर्वांना मारण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने फक्त मारण्याचा निर्णय नव्हता घेतला. त्याने त्याच रात्री एका वेश्याला घरी बोलावलं तिच्यावर बलात्कार करून त्याने तिची हत्या केली. पुन्हा एका वेश्याला त्याने घरी बोलावलं तीच्यासोबत सुद्धा तेच केलं आणि तिचीसुद्धा हत्या केली. दोन्ही वेश्यांची हत्या केल्यानंतर त्यांनी त्यांचे मृतदेह आपल्या घराच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. (Joseph Metheny)
मग त्याने सुरू केला एक विचित्र खेळ. तो त्या दोन मृतदेहांचे काही भाग कापून पोर्क मीटमध्ये मिसळून त्याचे बर्गर बनवून विकू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बर्गरची चव इतर दुकानांपेक्षा वेगळी असल्यामुळे, अल्पावधीतच त्याच्या दुकानात बर्गरची विक्री खूप वाढली. जसजशी त्याच्या बर्गरची विक्री वाढली, तसतशी त्याने आणखी माणसांना मारायला सुरुवात केली, तो माणसांना मारून त्यांचे फक्त सांगाडेच नष्ट करत होता. कारण त्याला माहिती होतं पुरावा नाही तर अटक नाही. तो दररोज रात्री लोकांची आणि खासकरून वेश्यांची हत्या करत होता. १९९६ साल उजाडलं होतं, एका रात्री असंच मेथेनी आपल्या शिकारच्या शोधात ट्रक घेऊन फिरत होता. रस्त्यात त्याला एक वेश्या दिसली तिने मेथेनी कडे लिफ्ट मागितली. मग वाटेत त्याने तिला ड्रग्स ऑफर केले. यानंतर तो तिला आपल्या कारखान्यात घेऊन गेला. इथे तिला संशय आला म्हणून तिने कारखान्यातून पळण्याचा प्रयत्न केला. पण मेथेनीने तिला पकडलं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण स्वत:ला सोडवत तीने बाजूला पडलेल्या हातोड्याने त्याच्यावर हल्ला करून स्वत:ला सोडवलं आणि कारखान्यातून पळून थेट ती पोलिस स्टेशनमध्ये गेली. पोलिस लगेचच घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतात. पण तोपर्यंत तो तिथून पळून गेला होता.
========
हे देखील वाचा : चेस मास्टर गुकेश डोम्मराजू !
======
पोलिसांनी तिच्या जबाबानुसार त्याचं एक स्केच काढून घेतलं. त्याचा शोध सुरू झाला. पोलिसांना कोणताच पुरावा हाती लागत नव्हता. पण १५ ऑगस्ट १९९६ मध्ये एका फोन कॉलमुळे जोसेफ मेथेनीची खबर लागते आणि पोलिस त्याला अटक केली जाते. यावेळेस पोलिसांना त्याच्या विरोधात अनेक पुरावे सापडले होते. पोलिस चौकशीत त्याने स्वत: हे कबूल केलं होतं की, त्याने 10 मुलींसह 13 जणांची हत्या केली आहे. कोर्टात सुद्धा त्याने या हत्यांबद्दल आणि बर्गरमध्ये मानवीमांस मिसळून विकल्या बद्दल त्याला कुठला ही पश्चाताप नसल्याच कबूल केलं होतं. त्याशिवाय कोणत्याही कारणामुळे मी तुरुंगातून सुटलो तर पुन्हा बर्गरमध्ये मानवी मांस घालून विकेल असं तो म्हणाला होता. जो मेथेनीचे गुन्हे पाहून न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली होती. पण नंतर तिला जन्मठेपेत बदलण्यात आलं. काही वर्षांनी २०१७मध्ये जोसेफ मेथेनी तरुंगात मृत अवस्थेत आढळला होता. असं बोलतात या घटनेनंतर अनेक दिवस बाल्टीमोर शहरातील लोक बर्गर खायला घाबरत होती. (Joseph Metheny)