हिवाळा सुरु झाला की, वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळाच उत्साह जाणवायला लागतो. ना पावसाळ्यासारखी रिपरिप, ना उन्हाळ्यातील घामाची चिकचिक अतिशय सुंदर आणि आणि हवाहवासा वाटणारा हा ऋतू म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. असे म्हटले जाते की, या ऋतूमध्ये आपण जी ऊर्जा कमावतो ती वर्षभर आपल्याला टिकते. त्यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याची खास काळजी घेऊन उत्तम आहार घेतला पाहिजे.
हिवाळ्याचे फायदे अनेक असले तरी या ऋतूचे काही तोटे देखील आहे. हो हिवाळ्यामध्ये थंड वारे वाहतात वातावरण देखील थंड असते, त्यामुळे आपली त्वचा कमालीची कोरडी होऊ लागते. तिला सतत खाज येते, तडे जातात कधी कधी तर त्यातून रक्त देखील येते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची जास्तच काळजी घेतली गेली पाहिजे. हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो ओठांना.
ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असते. त्यामुळे ओठ कोरडे होणे आणि त्यांना तडे जाणे ही बाब खूप सामान्य आहे. फुटलेले ओठ कोणालाही, कोणत्याही वयात आणि कोणत्याही ऋतूत होऊ शकतात. पण हिवाळ्यात हा त्रास वाढतो. कोरडे आणि फुटलेले ओठ खूपच विचित्र दिसतात आणि त्रासदायक देखील ठरतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये ओठांची खास काळजी घेतली पाहिजे.
थंडी सुरू झाली तरी ओठांना चिरा पडणे किंवा ओठांच्या त्वचेची साले निघणे, ओठ फाटणे अशा त्रासदायक गोष्टींचा सामना अनेकांना करावा लागतो. ओठांची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक क्रीम, लीप बाम उपलब्ध असतात. पण, कधी कधी ते देखील पाहिजे तसे फायदे देत नाही. मग तेव्हा आपण काही घरगुती उपाय करून आपल्या ओठांना मऊ, मुलायम ठेऊ शकतो. त्यासाठी आपण घरी अगदी सहजपणे करू शकतो असे कोणकोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया.
– ओठांना थंडीपासून वाचवण्यासाठी नेहमी व्हॅसलीन वा पेट्रोलियम जेली लावत राहा. त्यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत. ओठांना नेहमी तूप लावून झोपा. त्यामुळे ओठ नरम राहतील आणि उलण्याची भीती राहणार नाही.
– वारंवार ओठांना जीभ लावण्याच्या सवयीमुळेही नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे ओठ उलण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे या सवयीवर नियंत्रण ठेवा.
– फाटलेल्या ओठांची त्वचा कधीही ओढू नका. त्यामुळे ओठ आणखी उलू शकतात. त्यामुळे रक्त निघण्याचा व इतर संसर्गाचा धोका वाढतो.
– आहारात ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ओठ उलण्याची समस्या उद्भवू शकते.
– झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावल्यास ओठांची कोमलता कायम ठेवता येते. तसेच उललेल्या ओठांपासूनही सुटका होते.
– रात्री नेहमी लिपस्टिक साफ करूनच झोपायला हवे आणि भरपूर पाणी प्यावे, जेणेकरून ओठ उलणार नाहीत.
– दिवसातून २-३ वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो.
– १ चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्रित करुन हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यास हे मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावा.
– फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं.
– रात्री झोपताना फुठलेल्या ओठांवर दूधाची साय लावून झोपा. यामुळे एका रात्रीतच आपल्याला या समस्येतून खूप आराम मिळेल. हा उपाय केल्यास ओठ मऊ होतील. दूधाची साय अर्थात मलई ओठांच्या नाजूक त्वचेवर डीप मॉइश्चरायझर म्हणून काम करते.
– फाटलेले ओठ टाळण्यासाठी, शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. म्हणून, पुरेसे पाणी प्या आणि आपले ओठ तसेच संपूर्ण शरीर हायड्रेटेड ठेवा.
(टीप : उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)