राजस्थानच्या बिकानेर येथील गंगा बिशनजी अग्रवाल यांनी 1937 मध्ये एक इतिहास घडवला. गंगा अग्रवाल हे उत्तम आचारी होते. त्यांच्या हाताला चव होती. विशेषतः त्यांचे नमकीन पदार्थ चवदार असायचे. गंगा अग्रवाल यांनी आपल्या काकीच्या सल्यानुसार या नमकीन पदार्थात आणखी चांगले बदल केले. त्यांना हल्दीराम या नावानं ओळखलं जायचं. याच नावावरुन मग बिकानेरमध्ये हल्दीराम नमकीनची सुरुवात झाली. आज तमाम भारतीयांच्या जिभेचे चोचले पुरवणारी ही हल्दीराम कंपनी घराघरात पोहचली आहे. अनेकविध स्नॅक्स उत्पादने आणि आता हॉटेल चेन असलेल्या हल्दीरामचे काळानुरुप कौटुंबिक विभाजन झाले असले तर या ब्रॅण्डच्या नावात कधीही घट झाली नाही. मात्र अलिकडे याच हल्दीराम ब्रॅंण्डची विक्री होणार ही बातमी आली आणि भारतीय बाजारात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही कंपनी एकाच मोठ्या कंपनीला विकली जाणार अशी बातमी आली. पुढे या रेसमध्ये टाटा आणि रिलायन्स सारखी नावे जोडली गेली. मात्र नंतर हल्दीरामची मालकी असलेल्या अग्रवाल कुटुंबानं हल्दीराम कंपनीचा काही भाग विकण्याचा निर्णय जाहीर केला. आत्तापर्यंत हल्दीरामसाठी तीन मोठ्या कंपन्या रांगेत उभ्या असून भारतीय चवीच्या हल्दीरामसाठी मोठ्या परकीय कंपन्यांनी रेडकार्पेट टाकले आहे. हल्दीरामची भुजीया आणि सोनपापडी खाल्ली नसेल असा भारतीय सापडणार नाही. (Haldiram)
यासोबतच हल्दीरामची अन्यही उत्पादने प्रसिद्ध आहेत. अलिकडच्या काळात हल्दीरामनं आपली हॉटेल चेनही सुरु केली. अशाचवेळी भारतातील प्रसिद्ध नमकीन आणि स्नॅक्स उत्पादन करणारी हल्दीराम कंपनी लवकरच विकली जाणार अशी बातमी आली आणि चर्चा सुरु झाली. सुरुवातीला ब्लॅकस्टोनच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमने हल्दीराममधील 75 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावल्याची बातमी आली. त्यानंतर हल्दीराम कंपनीसाठी भारतातील अग्रगण्य टाटा कंपनी उत्सुक असल्याचीही बातमी आली. शिवाय मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कंपनीही हल्दीराम घेण्यासाठी उत्सुक असल्याची बातमी आली. मात्र याचवेळी हल्दीरामचे अग्रवाल कुटुंब फक्त काही हिस्सा विकणार असल्याचे स्पष्ट झाले आणि मग या सर्व कंपन्या स्पर्धेतून बाहेर पडल्या. अशावेळी हल्दीरामसाठी अमेरिकेच्या टायगर ग्लोबलने मोठी ऑफर केली आहे. टायगर ग्लोबल मॅनेजमेंटच्या युनिट अल्फा वेव्ह ग्लोबलने हल्दीराममधील बंधनकारक ऑफर दिली आहे. हल्दीराम आणि टायगर ग्लोबलमध्ये हा व्यवहार झाला तर हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा खाजगी इक्विटी व्यवहार ठरणार आहे. बोली लावणाऱ्यांनी हल्दीरामच्या व्यवसायाचे मूल्य 75,000-80,000 कोटी रुपये ठरवले गेले आहे. ब्लॅकस्टोन आणि बेन यांच्या नेतृत्वाखालील हा सर्व व्यवहार हल्दीरामचे प्रवर्तक असलेल्या अग्रवाल कुटुंबाबरोबर जवळपास एक वर्षापासून सुरु आहे. (Social News)
टायगर ग्लोबल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑफर मिळाल्यामुळे अग्रवाल कुटुंबीय अनेक पर्यायांचा विचार करत आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, हल्दीरामचा महसूल 12,800 कोटी रुपये आणि एबिटा 2,580 कोटी रुपये होता. कंपनीने या कालावधीत सुमारे 1350-1400 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती आहे. हल्दीरामची देशभरात अनेक नमकीन दुकाने आहेत. शिवायं त्यांची देशाबाहेर 150 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत. यामध्ये स्थानिक खाद्यपदार्थ, मिठाई आणि अनेक विदेशी पदार्थही उपलब्ध आहेत. त्यामुळेच टायगर ग्लोबलबरोबर हल्दीरामचा करार झाला तर हल्दीरामला अधिक ग्लोबलरुप प्राप्त होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. यासाठी हल्दीरामला त्यांचे नागपूर आणि दिल्ली व्यवसाय विलीन करावे लागतील. हे विलीनीकरण पुढील 4 महिन्यांत पूर्ण होऊ शकते. बिकानेरमध्ये 1937 मध्ये गंगा अग्रवाल यांनी सुरु केलेला हल्दीरामचा प्रपंच आता वटवृक्षासारखा फैलावला आहे. (Haldiram)
========
हे देखील वाचा : भारतीय वस्तूंवर बहिष्कार करुन बांगलादेश होतोय कंगाल !
========
बिकानेर येथे गंगा बिशनजी अग्रवाल छोट्याशा दुकानात भुजिया आणि नमकीन विकायचे. त्यांचीं आई त्यांना प्रेमाने हल्दीराम म्हणायची, म्हणून त्यांनी नमकीनचे नावही ‘हल्दीराम’ ठेवले. नमकीन आणि भुजिया बनवण्याची कला त्यांनी त्यांच्या मावशी ‘बिखीबाई’ यांच्याकडून शिकून घेतली होती. पुढे बिकानेरचे महाराजा डुंगर सिंग यांच्या नावावरून भुजियाचे नाव ‘डुंगर सेवा’ ठेवले. आणि हल्दीरामचे नशिब पालटले कोलकाता, नागपूर, दिल्ली येथे त्यांच्या शाखा सुरु झाल्या. कालांतरानं या कुटुंबात वाद झाले आणि कुटुंबाची, व्यवसायाची विभागणी झाली. मुलगा सत्यनारायण यांनी हल्दीराम अँड सन्स नावाने वेगळे दुकान सुरू केले. दक्षिण आणि पूर्व भारतातील व्यवसाय कोलकाता येथून हाताळला जातो, त्याचे नाव ‘हल्दीराम भुजियावाला’ आहे. पश्चिम भारतातील व्यवसाय नागपूरच्या ‘हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल’द्वारे होतो आणि उत्तर भारतातील व्यवसाय दिल्लीच्या ‘हल्दीराम स्नॅक्स आणि एथनिक फूड्स’द्वारे नियंत्रित केला जातो. त्यामुळेच आता याच कंपनीचा एक हिस्सा कोणाला विकला जातो, याची उत्सुकता आहे. (Social News)
सई बने