फिरायच म्हटलं, तर हा देश एका दिवसात फिरून होईल एवढा छोटा आहे. आणि गाडीने फिरायच म्हटलं, तर काही तासांतच. हा देश म्हणजे जगातील सर्वात लहान प्रजासत्ताक देश. एकेकाळी हा देश इतका श्रीमंत होता की, समजा दुकानतून एखादी १०० रुपयांची वस्तु घेतली तर त्यासाठी १००० ची नोट देऊन लोकं बाकीचे पैसे परत घ्यायचेच नाहीत. हे ऐकून तुम्हाला खोटं वाटलं असेल, पण ह्याच्याही वरचढ म्हणजे या देशातील लोक नोटांचा वापर टॉयलेट पेपर म्हणून सुद्धा करायचे. हा देश म्हणजे नाऊरू आयलंड. पण हा देश एवढा श्रीमंत कसा झाला? या देशात ना इंधनाच्या खाणी सापडल्या, ना सोना चांदी, हा देश श्रीमंत झाला होता पक्षांची विष्ठा विकून. ७०- ८० च्या दशकात हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. पण मग असा काळ आला, जेव्हा या देशाच्या प्रगतीला आणि श्रीमंतीला उतरती कळा लागली. कसा हा देश पक्षांची विष्ठा विकून श्रीमंत झाला? काय आहे या नाऊरू देशाची स्टोरी, जाणून घेऊया. (Nauru Island)
पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असलेला जगापासून अलिप्त देश नाऊरू, येथून सर्वात जवळचे बेट तीनशे किलोमीटर अंतरावर आहे. खूप वर्षांपूर्वी, या बेटांवर खूप मोठ्या प्रमाणात पक्षी राहायचे. याच बेटावर ते खायचे प्यायचेआणि मल त्याग करायचे. असंच पक्ष्यांचं मल इथे लाखो वर्षांपर्यंत गोळा होतं राहिलं, आणि या बेटाच्या जमिनीचा भाग झालं. ज्यामुळे इथल्या मातीत फॉस्फेट आणि नायट्रेटसारख्या खनिजांचा साठा तयार झाला. पण इथे राहणाऱ्या स्थानिकांना कधीच समजलं नाही की ते एका अशा बेटावर राहत आहेत ज्याच्या जमिनीत भरपूर प्रमाणात फॉस्फेट आहे, जे विकून ते कोट्याधीश होऊ शकतात. (Social News)
१७९८ साली एक ब्रिटिश जहाज या बेटाजवळून गेलं. जहाज पाहून शेकडो नाऊरियन नागरिक किनाऱ्यावर जमले होते. तेव्हा जगाला या बेटाचा शोध लागला. मग ब्रिटिशांनी सुद्धा या बेटाचा वापर समुद्री प्रवासात ब्रेक म्हणून करायला सुरुवात केली. तेव्हा ब्रिटिश कैदींना खूप कठोर शिक्षा द्यायचे. म्हणून अनेक गुन्हेगार शिक्षेपासून सुटकेसाठी या बेटांवर जाऊन स्थायिक होऊ लागले. अशा ब्रिटिश फरार कैदीनीचं येणारे जाणारे जहाज इथे बेटावर थांबू लागल्यावर त्यांच्याशी व्यापार करायला सुरू केला. ते नाऊरियन लोकांकडून नारळ आणि डुक्कर प्रवासी जहाजांना विकून याच्या बदल्यात त्यांना तंबाकू, दारू आणि रायफल गन्स मिळवत. म्हणून १८७० च्या सुमारास बेटावर बंदुकांनी आपलं घर केलं. नाऊरूचे लोक तंबाखूचं सेवन करू लागले. आणि भरपूर दारू पिऊ लागले. यावेळी नाऊरूमध्ये 12 वेगवेगळ्या जमातींचे लोक राहत होते. बंदुकांच्या सहज उपलब्धतेमुळे, १८७८ साली या देशात गृहयुद्ध सुरु झालं. तत्कालीन राजा अवेइडा आणि त्याला सत्तेतून हाकलून दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याला राजा बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैन्यांमध्ये लढाई झाली. ज्यामध्ये बेटावरचे निम्मे लोक मरण पावले. नंतर १८८८ मध्ये जर्मन सम्राज्याने या युद्धात हस्तक्षेप केला आणि अवेइडाला पुन्हा गादीवर बसवलं. थोडक्यात, जर्मनीने हे बेट ताब्यात घेतलं आणि नगरिकांकडे असणारे शस्त्र जप्त केले. (Nauru Island)
मग काही वर्षांनंतर न्यूझीलंडचे जियॉलजिस्ट अल्बर्ट एलिस १९०१ साली नाऊरु बेटावर पोहचतात. त्यांचं इथे येण्याच कारण असतं फॉस्फेट. त्यांनी या बेटावरच्या दगडाचा अभ्यास केला होता, म्हणून ते या बेटाच्या जमिनीचं संशोधन करण्यासाठी आले होते. आता पक्षांमुळे म्हणा किंवा अल्बर्ट एलिस यांच्या संशोधनामुळे, येणाऱ्या काळात या बेटाची परिस्थिती बदलणार होती. त्यांच्या संशोधनात त्यांना आढळलं की, या बेटाच्या ८०% भाग फॉस्फेट ने भरलेला आहे. तेव्हा या बेटावर जर्मनीची सत्ता होती. 1906 मध्ये, जर्मनीने पॅसिफिक फॉस्फेट कंपनीची स्थापना केली आणि येथे फॉस्फेटचे खाणकाम सुरू केलं. फॉस्फेट हे त्या काळी शेती करणाऱ्या देशांसाठी वरदानच होते. कृत्रिम खत म्हणून वापरले जाणारे फॉस्फेट हे त्या काळातील अत्यंत महत्त्वाचे साधन होतं. जसं आता पेट्रोल डिझेल आहे तसं. (Social News)
मग जर्मनी आणि ब्रिटिशांमध्ये फॉस्फेटवरुन राडे सुरू झाले. पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या पराभवानंतर हे बेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांनी ताब्यात घेतलं. नाऊरु बेटाच्या लोकांना या फॉस्फेटचा काहीच फायदा होतं नव्हता. हे बाकीचे देशच त्याचा फायदा उचलत होते. १९४२ मध्ये जपानने हे बेट ताब्यात घेतलं , आणि मग नाऊरुच्या लोकांना गुलाम बनवलं. दुसऱ्या महायुद्धात जपान हरल्यानंतर पुन्हा हे बेट ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या ताब्यात गेलं. आणि अखेर १९६८मध्ये नाऊरु स्वतंत्र झालं. स्वातंत्र्यानंतर, नाऊरुच्या राजकारण्यांनी फॉस्फेटचा व्यवसाय सुरू ठेवला आणि भरपूर कमाई केली. एकेकाळी नाऊरु इतका श्रीमंत देश बनला की, या बेटाची स्वत:ची एक नाऊरू एअरलाइन्स होती. राजकारण्यांनीही नाऊरुच्या फॉस्फेट्सची मोठ्या प्रमाणावर लूट केली. सरकारने देशात कोणत्याच प्रकारचा टॅक्स लावला नव्हता. शिक्षण आणि आरोग्य सेवांचा खर्च सर्वांसाठी सरकारने फुकट केला. सरकारने महागड्या क्रूझ शिप, एअरक्राफ्ट आणि इतर देशांत हॉटेल्स खरेदी केले. राजकीय नेते विदेशात विमानाने शॉपिंग करण्यासाठी जाऊ लागले. (Nauru Island)
========
हे देखील वाचा : मिठाला एक्सपायरी डेट असते का?
========
पण प्रत्येक गोष्टीची Expiry Date असतेच, फॉस्फेटची सुद्धा होती. २००० सालापर्यंत या बेटावरचं फॉस्फेट संपलं. नाऊरुच्या नेत्यांनी उत्पन्नासाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, पण देशाची आर्थिक व्यवस्था सुधारता आली नाही. एकेकाळी या देशात एका एका माणसाकडे ४ ते ५ गाड्या असायच्या, त्या गाड्या आजं आशाच गंज खात उभ्या आहेत. फॉस्फेटच्या खाणीमुळे या देशात पिण्याचं शुद्ध पाणी शिल्लक राहिलं नाही. खाण्यासाठी सुद्धा मुबलक आणि पौष्टिक अन्न उरलं नाही. त्यामुळे लोकांना गंभीर आजार होऊ लागले. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाऊरूची परिस्थिती आता वाईट आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या शेजारील देशांमधून स्वस्तात स्वस्त खाद्यपदार्थ इथे आयात केले जातात. आता हा देश वर्ल्ड fattest कंट्री म्हणून ओळखला जातो. या छोट्याशा देशात आज ९० टक्क्यांहून अधिक लोकांचं वजन जास्त आहे. अचानक आलेल्या पैशांमुळे या देशाने ऐश केली पण त्याचे परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावे लागले. (Social News)