चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेला आर्थिक फटका दूर होण्याची सोनेरी संधी निर्माण झाली आहे. कारण चीनच्या हातात एक अलीबाबाची मोठी गुहाच आली आहे. चीनच्या हुनान प्रांतात जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. चीनमधील हुनानच्या पिंग्झियांग काउंटीमध्ये 1000 मेट्रिक टन उच्च दर्जाचे सोने भरलेली खाण मिळाली आहे. या सर्व सोन्याची किंमत 83 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. सध्या चीन आर्थिक दृष्ट्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्यांनी ज्या देशांना कर्ज दिले, तिथून त्यांना योग्य परतावा आलेला नाही. (China)
शिवाय कोरोनापासून चीनमधून अनेक परदेशी कंपन्यानी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. या सर्वांमुळे चीनमधील मोठ्या कंपन्यांना टाळे लागले आहे. परिणामी तिथे बेकारांची संख्या वाढली आहे. ज्यांना नोकरी आहे, त्यांना 12 ते 13 तास काम करण्याचे बंधन आहे. अशा विषम परिस्थितीमुळे तिथे मोठा सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे. या सर्वांचा फटका चीनच्या उत्पादन क्षमतेवर झाला असून जगावरील चीनची आर्थिक पकड ढिली होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या कठिण परिस्थितीत चीनला एक सोनेरी गुहा सापडली आहे. या नव्या शोधाचा चीनला आर्थिकदृष्ट्या फायदा होणार असून जागतिक सोन्याच्या बाजारावरही परिणाम होणार आहे. या सोन्याच्या खजिन्यामुळे चीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सोने हा धातू मानवी आकर्षणाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे. समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक म्हणून सोन्याला मानले जाते. हे सोने धारण करायला जेवढे छान वाटते, त्यापेक्षा कितीतरी अवघड अशी सोने खाणीतून काढण्याची प्रक्रिया असते. खाणीतून सोने काढण्यासाठी खोल खणून कितीतरी टन मातीतून फक्त काही ग्रॅम सोने काढले जाते. (International News)
अशा सोन्याच्या खाणी शोधण्यासाठीही मोठी यंत्रणा कामाला लावावी लागते. चीनच्या हुनान प्रांतात अशीच मोठी यंत्रणा एका सोन्याच्या खाणीच्या शोधार्थ काम करत होती. या शोधमोहीमेला यश आले असून हुनानच्या पिंग्झियांग काउंटीजवळ सोन्याची जगातील सर्वात मोठी खाण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या खाणीत 1000 मेट्रिक टन सोने असल्याचा अंदाज आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याचा साठा असल्याची माहिती आहे. या खाणीतील सोन्याची घनताही अधिक आहे. साधारणपणे सोन्याच्या खाणीत 1 मेट्रिक टन खडकात 25 ग्रॅम सोने असते. मात्र चीनमध्ये नव्यानं मिळालेल्या खाणीमध्ये सरासरी 138 ग्रॅम प्रति मेट्रिक टन सोने असल्यामुळे हे मोठे घबाड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या खाणीसाठी शोध घेणा-या तज्ञांच्या मते, येथील अनेक खडकांच्या गाभ्यामध्ये सोने स्पष्टपणे दिसत आहे. ही अद्भूत घटना असून हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याचा साठा मानला जातो. दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण खोल खाणीत हे 900 मेट्रिक टनांपेक्षा जास्त सोने आहे. (China)
=====
हे देखील वाचा : हिंदूसाठी लढणा-या चिन्मय दास यांना अटक !
========
चीनसाठी हा शोध एका संजीवनी औषधासारखा ठरणार आहे. कारण चीन मोठ्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. चलनवाढ, कर्जाचे संकट आणि रिअल इस्टेटमध्ये निघालेले दिवाळे या सर्वांचा परिणाम येथील अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. असा स्थितीत ही सोन्याची खाण आणि तिथून येणारे आर्थिक बळ चीनमधील अन्य उद्योगांना उभारी देणारे आहे. पिंगजियांग काउंटीमध्ये 40 हून अधिक सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. येथे 300 मेट्रिक टन सोने असल्याचा अंदाज भूवैज्ञानिकांनी पूर्वी व्यक्त केला होता. तथापि, नंतर 3D मॉडेलिंगचा वापर करुन या भागात सोन्याच्या विवरांची खोली 3000 मीटरपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच हे अंदाजे 700 मेट्रिक टन जास्त सोने आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. 2023 मध्ये जागतिक उत्पादनात त्याचा वाटा सुमारे 10% होता. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, चीनकडे 2,264 टन सोन्याचा साठा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सोने हे पृथ्वीचे मूलभूत घटक नाही. सुपरनोव्हा आणि न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टक्करातून त्याचा उगम झाला आणि उल्कापिंडातून पृथ्वीवर पोहोचला. हेच कारण आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सोने नाही तर खोल खाणींमध्ये आढळते. आता हिच खाण चीनमध्ये मिळाली असून ती चीनला सोनेरी दिवस पुन्हा आणण्यासाठी मदत करणार आहे. (International News)
सई बने