निरोगी राहण्यासाठी काय आवश्यक असते तर योग्य, पोषक आहार आणि नियमित व्यायाम. या दोन्ही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर नक्कीच आपले आरोग्य उत्तम पद्धतीने टिकेल. जर आपण अगदी सूक्ष्मातून विचार केला तर सर्वच गोष्टी शरीरासाठी अपायकारक आहे किंवा सर्वच गोष्टी शरीरासाठी हितकारक आहे.
आता चॉकलेटचेच घ्या. या जगात कोणाला चॉकलेट आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते. मात्र अनेकदा आपण ऐकतो आणि आपल्या मुलांना देखील सांगतो, की जास्त चॉकलेट खाल्ले की दात खराब होतात. त्यामुळेच आपण स्वतः देखील जास्त चॉकलेट खात नाही आणि मुलांना देखील देत नाही.
चॉकलेटचे देखील अनेक प्रकार आहेत. मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट हे त्यातल्या त्यात लोकप्रिय. बहुतकरून लोकांना मिल्क चॉकलेट जास्त आवडते तर काहींना डार्क चॉकलेट आवडते. मिल्क चॉकलेट चवीला अतिशय छान आणि गोड असते. याउलट डार्क चॉकलेट जरा कडवट असते. त्यामुळे हे चॉकलेट कमी लोकं खातात. मात्र तुम्हाला माहित आहे का की डार्क चॉकलेट चवीला जरी चविष्ट नसले तरी त्यामध्ये भरपूर पोषण असते. यामध्ये काही पोषक तत्व असतात जे अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात. डार्क चॉकलेट खाण्याचे आपल्याला काय फायदे होतात जाणून घेऊया.
– चॉकलेटमध्ये असलेले कॅफिन तणाव कमी करण्यासाठी आणि नैराश्य नियंत्रित करण्यासाठी खूप चांगले मानले जाते.
– डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजाराची शक्यता कमी होते. निरोगी, पोषक आहारासह डार्क चॉकलेट आपल्याला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकते.
– शरीरात जळजळ होत असेल, सूज असेल तर, स्नायू दुखत असेल, डोकेदुखी असेल तर यावर डार्क चॉकलेट लाभदायक आहे. या चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कोको असतात, जे अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतात आणि आपला त्रास कमी करण्यास मदत करतात.
– डार्क चॉकलेटमध्ये अशी काही द्रव्ये असतात, जे मनुष्याला आनंदी ठेऊ शकतात. या चॉकलेटमध्ये सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफेनची असते. हे डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर मन खुश होते.
– जर बीपी कमी झाले असेल किंवा दु:खी आणि सुस्त वाटत असाल, तर हे डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वरीत एनर्जी वाढून फ्रेश वाटेल.
– हे चॉकलेट वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
– डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स कॅन्सरपासून बचाव करण्यातही मदत करतात. हे चॉकलेट कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते. डार्क चॉकलेटमध्ये असलेले डायटरी फ्लेव्हॅनॉल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा चांगली होते.
– जे लोकं रोज डार्क चॉकलेट खातात त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे मुलांना नेहमीच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खायला देणे फायदेशीर ठरते. डार्क चॉकलेट मेंदूसाठी खूप चांगले आहे. हे मेंदूला योग्य रक्तपुरवठा सुनिश्चित करते. त्यामुळे मेंदूसाठी सुद्धा ते खूप आरोग्यदायी आहे.
– चॉकलेटमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषकत्त्वे आढळतात. विशेषत: डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि फायबर असते ज्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)