हिवाळा सुरु झाला की, सर्वात जास्त लक्ष द्यावे लागते, ते आपल्या त्वचेकडे. कारण हिवाळ्यात वाहणाऱ्या थंड हवेमुळे आपली त्वचा सतत कोरडी पडते आणि तिला तडे जातात. त्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. आपल्या त्वचेला मॉइश्चराइज्ड करण्यासाठी, मुलायम करण्यासाठी विविध उपाय करणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही घरातील बेसिक सामान वापरून नानाविध प्रकारचे लाभदायक फेसपॅक बनवून ते चेहऱ्यावर लावून ग्लो मिळवू शकतात.
अनेक वेळा फेसवॉशने चेहरा धुतल्यानंतर त्वचा टाइट आणि कोरडी होऊ लागते. अशा परिस्थितीत घरगुती फेस पॅक त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवता येते आणि ती मऊ आणि गुळगुळीत बनते. चला तर मग जाणून घेऊया कोणते फेस पॅक त्वचेला नैसर्गिकरित्या ऑइली आणि मॉइश्चरायझिंग करण्यात मदत करतात.
मध आणि केळी फेस पॅक
त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यासाठी पिकलेली केळी मॅश करा. त्यात काही थेंब मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. विशेषतः हिवाळ्यासाठी हा सर्वोत्तम फेस पॅक आहे.
कॉफी पावडर आणि नारळ तेल
कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी कॉफी पावडर आणि नारळ तेलाचा फेसपॅक फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी १ चमचा कॉफी पावडर आणि त्याच प्रमाणात खोबरेल तेल घेऊन ते नीट मिक्स करून ही सॉफ्ट पेस्ट १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
बेसन आणि कच्चे दूध
हा फेसपॅक बनवण्यासाठी दोन चमचे बेसनात तीन चमचे कच्चे दूध मिसळावे. त्यात थोडी हळद देखील घालता येते. आता हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्याचा रंग उजळतो, त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ होते, त्वचा मऊ होते.
मध आणि कॉफी
कॉफी त्वचेसाठी नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते. हे त्वचेच्या मृत पेशी, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग काढून टाकण्यास मदत करू शकते. यासोबतच त्वचा मॉइश्चरायझ होऊन त्वचेला चमक येते. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे कॉफी पावडर, २ चमचे मध आणि १ चमचा कच्चे दूध घालून पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर १५ मिनिटे लावा आणि नंतर गोलाकार मोशनमध्ये मसाज करून चेहरा धुवून घ्या.
कच्चे दूध आणि मध
एक चमचा कच्च्या दुधात चिमूटभर हळद आणि मध मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येण्यास मदत होते आणि त्वचेची मोठी छिद्रेही कमी होतात. तसेच त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते.
कोरफड आणि मध
त्वचेला ओलावा देण्यासाठी आणि मऊ बनवण्यासाठी मध फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा कोरफड जेल आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५ – २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका.
मध आणि गुलाब जल
हिवाळ्यात त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यासाठी या दोन गोष्टी उत्तम आहेत. १ चमचा मध घ्या आणि नंतर त्यात १ चमचा गुलाब जल घाला. दोन्ही एकत्र मिक्स करा. नंतर चेहरा आणि मानेवर पॅक लावा. १० मिनिटे राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ करा.
मध आणि साय
दुधाची साय निस्तेज आणि कोरडी त्वचेपासून वाचण्यास मदत करते. हा पॅक बनवण्यासाठी साय आणि मध समान प्रमाणात घ्या आणि दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हा पॅक २५ मिनिटे ते राहू द्या आणि नंतर ते धुवा.
दूध – कोको पावडर फेसपॅक
कोको पावडरचा फेसपॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये कच्चे दूध घ्यावे. यामध्ये व्हिटॅमिन E कॅप्सूल मिक्स करावी. मग हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.
(टीप : कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)