कोणतीही मालिका सुरु झाली की काही दिवसातच ती प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करते. मालिका संपते तेव्हा कलाकारांसोबतच प्रेक्षकांना देखील वाईट वाटते. मात्र काही मालिका अशा असते, ज्या प्रेक्षकांवर आपले एक गारुड निर्माण करतात. या मालिकांची चर्चा ती संपल्यानंतरही पुढील अनेक वर्ष होते. आजच्या घडीला असेच गारुड प्रेक्षकांवर निर्माण केलेली मालिका म्हणजे, ‘आई कुठे काय करते’. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकतीच ही मालिका संपली.
आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः झपाटले होते. सगळीकडे या मालिकेची चर्चा ऐकायला मिळायची. आता जरी याच आशयावरील अनेक मालिका आपण बघत असाल तरी जेव्हा मालिका सुरु झाली तेव्हा या मालिकेचा विषय खूपच वेगळा होता. त्यामुळे अगदी पहिल्याच दिवसापासून मालिकेने आपली पकड निर्माण केली आणि सलग पाच वर्ष टिकवली.
३० नोव्हेंबर रोजी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपल्यामुळे अनेकांना दुःख झाले. मालिकेतील अनेक कलाकारांनी आपली भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. यातच आता मालिकेत ‘अनिश’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुमंत ठाकरेने देखील पोस्ट शेअर करत त्याच्या या पहिल्या वाहिल्या मालिकेचा प्रवास उलगडला आहे. सुमंतची पोस्ट सध्या कमालीची गाजत आहे.
सुमंतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “पहिली नेहमी खास असते! आज आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. हे थोडं अस्वस्थ करणारं आहे पण हा प्रवास समृद्ध करणारा आहे . कधी कधी संधी विचित्र मार्गाने येते, तो मार्ग जितका विचित्र तितकाच ती स्वीकारल्यावरचा प्रवास सुखद, असं माझं मत आहे. मी प्रदीप दादाचा नेहमी ऋणी राहीन.
View this post on Instagram
नमिता वर्तक तुझं मार्गदर्शन, योग्य निर्णय घ्यायला मदत करणं, पात्र समजावून सांगणं, चूक सुधारायला लावणं, नको त्या गोष्टींसाठी उगाच रागावणं सगळ्याचसाठी खूप धन्यवाद तुझ्यामुळे ही संधी मिळाली. DKP सारखं प्रोडक्शन हाऊस मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. वेळोवेळी त्यांचं काम आणि कार्यपद्धत खूप काही शिकवून गेली.
आमचे कॅप्टन रवी सर. त्यांच्या संवेदनशील, डोळस, शांत आणि चिकित्सक दृष्टिकोनामुळे हा “प्रवाह” इथवर आला आहे! मराठीरंगभूमी घडवणाऱ्या, जगवणाऱ्या दिग्गजांचे त्यांच्यावर संस्कार आहेत. नटाला समाधान देणारे क्षण सरांच्या कामात असतात. त्याची शैली हे दाखवते की त्यांची दिग्दर्शनाची ताकद काय आहे, भविष्यात त्यांच्या हातून अनेक कलाकृती घडाव्या, हीच ईच्छा. त्यांचे खंदे सहकारी,तितकेच गुणी, आपला वेगळा विचार ठामपणे मांडणारे, पडद्यामागून शांतपणे काम करणारे आणि तेवढ्याच खोडकर पणे एखाद्या शब्दाचा चोथा करणारे आयुष्यभरासाठी लाभलेले मित्र, कोटी कंपनीचे मालक तुषार आणि सुबोध दादा.
मुग्धाचं संवादलेखन नेहमीच “वाह!” म्हणायला लावणारं होतं. तुषार, चित्रा आणि लेखन विभागाचे खूप आभार. प्रत्येक डिपार्टमेंटमधील मित्रांशी जडलेली मैत्री आयुष्यभर जपून ठेवेन. माझ्या गुणी हरहुन्नरी हुशार सहकलाकारांनी हा प्रवास फुलवला. मधुराणीने साकारलेली आई मला कधीही विसरता येणार नाही. ईला ताईसारख्या प्रेमळ आजी जी खऱ्या आयुष्यात आणखीन जास्त प्रेम करते. मेकअप रूममध्ये क्रिकेट, नाटक, सिनेमा, इतिहास, कला अशा विषयांवर झालेल्या गप्पा नेहमी आठवतील.
2 वर्षे एका घरात राहून, मला स्वतःच्या जगात सामावून घेतलं, माझ्या जगात सामील होऊन माझ्या आयुष्याचा मोठा भाग बनलास ओंकार, तुझे आभार कसे मानू . अपूर्वा, तुझं वेळोवेळी मदत करणं, इतक्या आठवणी, सीन्स, त्यावर चर्चा, गाणी, आणि माझी गॉडमदर होणं, यासाठी मनापासून धन्यवाद!
या प्रवासाने मला शिकवलं की एक मालिका का लोकप्रिय ठरते—ती फक्त कथा नाही तर त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रेमाने आणि मेहनतीने साकार होते. मला भेटलेली माणसं आयुष्यभर साथ देतील, हे समाधान आहे. आई कुठे काय करते ही माझ्या पदार्पणाची मालिका आहे आणि कायम हृदयाच्या जवळ राहील.”
दरम्यान सुमंतच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आणि या मालिकेच्या प्रेक्षकांनी कमेंट्स करत ‘मालिका चालू ठेवा हवं तर वेळ बदल पण मालिका बंद करू नका.’ असे म्हटले आहे. दरम्यान ही मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेच्या जागी ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका सुरु होत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.