आपल्या भारत देशाला मसाल्यांचा देश म्हणतात. भारतामध्ये नानाविध प्रकारच्या असंख्य मसाल्यांचे उत्पादन केले जाते. भारतीय जेवणाला या मसाल्यांशिवाय चवच नसते. भारतीय लोकं मसाल्यांशिवाय त्यांचे जेवण आणि आयुष्य याची कल्पनाच करू शकत नाही. हे मसाले जेवणाला चव देण्यासोबतच आपल्या शरीराला आणि आरोग्याला देखील लाभदायक आहे.
याच मसाल्यांमधील एक महत्वाचा मसाल्याचा पदार्थ म्हणजे दालचिनी. चवीला काहीशी गोड आणि तिखट असणारी दालचिनी प्रत्येकाच्या घरात असतेच. भाज्यांमध्ये, बिर्याणीमध्ये दालचिनीचा तुकडा टाकला की त्याची चव केवळ अहाहा….. दालचिनी केवळ जेवणालाच चव नाही देत तर ती आपल्या आरोग्यच्या आणि शरीराच्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणावर गुणकारी आहे. अनेक आजारांमध्ये दालचिनीचा घरगुती उपाय म्हणून वापर केला जातो. झाडाचे खोड असलेली दालचिनी आपण वापरतो.
दालचिनीच्या झाडाच्या खोडाची साल निवडून घेऊन ती उन्हात वाळवतात आणि मग ती आपल्याला वापरता येते. या दालचिनीचा आकार कौलासारखा गोल, जाड, मऊ आणि तांबूस रंगाचा असतो. दालचिनीमध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि लाइकोपीन सारखे पोषक तत्व आढळतात जे तुमचे शरीर आतून मजबूत करतात. दालचिनीची पाने देखील ‘तेजपत्र‘ म्हणून मसाल्यात वापरतात.
दालचिनीचे आरोग्यदायी फायदे
रोगप्रतिकारकशक्ती वाढवते
दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला वाढवण्यास मदत करतात. याशिवाय दालचिनीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन देखील नियंत्रित राहते.
मधुमेहावर नियंत्रण
दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.
सर्दीमध्ये गुणकारी
चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतले असता जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.
पचनक्रिया सुधारते
दालचिनीमधील हाय फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता दूर करून पचनास मदत करू शकते. अपचन, पोटदुखी आणि छातीत जळजळ यावर दालचिनीचे सेवन प्रभावी आहे. दालचिनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात. दालचिनीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात.
हृदयाचे आरोग्य सुधारते
उच्च कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी यांसारखे जोखीम घटक कमी करून हृदयाच्या आरोग्यावर दालचिनीचा परिणाम चांगल्या पद्धतीने होतो.
स्त्रीरोगामध्ये लाभदायक
अंगावरून जाणे, गर्भाशयाचे विकार आणि गनोरिया यावर दालचिनी उपयुक्त आहे. प्रसुतीनंतर महिनाभर दालचिनीचा तुकडा चघळल्याने लवकर गर्भ धारणा होत नाही. दालचिनीमुळे महिलांचे दुध वाढते. गर्भाशय संकोच होतो.
थकवा दूर करते
दालचिनी रक्त प्रवाह सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते, थकवा दूर ठेवते. झटपट ऊर्जा वाढवण्यासाठी तुमच्या कॉफी किंवा स्नॅक्समध्ये दालचिनी घालण्याचा प्रयत्न करा. त्या कठीण दिवसांमध्ये अधिक उत्साही आणि आत्मविश्वास अनुभवण्याचा हा एक मार्ग आहे.
इतर फायदे
थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा. मुख दुर्गंधी आणि दातासाठीच्या औषधांमध्ये दालचिनी वापरतात. मुरुमे जाण्यासाठी दालचिनीचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावे.
गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. दालचिनी,मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.
(टीप : कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.)