आपल्या सगळ्यांनाच प्रवास करायला आणि वेगवेगळी ठिकाणं पाहायला खूपच आवडत असते. देशात परदेशात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सगळे फिरायला जातात. मात्र जेव्हा आपण नवनवीन ठिकाणी जातो, तेव्हा काही विशिष्ट ठिकाणांचे काही नियम असतात. आपल्याला ते पटले नाही पटले तरी ते नियम पाळावे तर लागतातच. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे महिलांना प्रवेश दिला जात नाही. या मागे काही कारणं नक्कीच आहे. आता ही कोणती ठिकाणे आहेत, जिथे महिलांना प्रवेश नाही चला जाणून घेऊया.
भगवान अय्यप्पा मंदिर, शबरीमाला
भारतातील केरळ राज्यात शबरीमाला येथे असलेल्या भगवान अय्यप्पा या हिंदू मंदिरात मासिक पाळी सुरू असलेल्या म्हणजेच १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास मज्जाव आहे. एकदा एका ३५ वर्षीय महिलेने या मंदिरात प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर तेथील पुजाऱ्याने हे संपूर्ण शुध्द केले होते. या विषयावर अनेक वादविवाद झाले, पण आजही या मंदीरात महिलांना प्रवेश नाकारला जातो. या मंदिरात भक्त अनेक नियम पळून ४१ दिवस उपवास करतात आणि अनवाणी पायांनी मंदिरात दर्शनासाठी जातात.
रणकपूर जैन मंदिर
या मंदिरात तसे पाहिले तर या मंदिरात महिलांना पूर्णपणे प्रवेश बंदी केलेली नाही. परंतु अनेक नियमांचे पालन केल्यावर महिलांना इथे प्रवेश मिळतो. या मंदिरात जाण्याचे सर्व नियम रणकपूरमधील जैन मंदिराच्या बाहेरील फलकावर लिहिलेले असतात. त्याचे पालन केल्यानंतरच महिलांना मंदिरात जाता येते. या नियमांमध्ये महिलांनी आत जाण्यासाठी कोणते कपडे घालावे, कोणतीही महिला किंवा मुलगी विदेशी कपडे आणि मेकअप करून प्रवेश करू शकत नाही, मासिक पाळी आलेल्या महिलांना मंदिरात जाण्यास मनाई आदी अनेक नियम सामील आहेत.
भगवान कार्तिकेय मंदिर, पुष्कर
पुष्कर मंदिरात भगवान कार्तिकेयच्या ब्रह्मचारी रूपाची पूजा केली जाते. या मंदिरात महिलांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी आहे. एका दंतकथेनुसार मंदिरात प्रवेश करणार्या स्त्रियांना आशीर्वाद देण्याऐवजी देवाने शाप दिला होता. कारण इथे अप्सरांनी तपश्चर्या करणाऱ्या कार्तिकेयाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. देवाच्या या कथित आक्रमकतेचा वापर येथे स्त्रियांच्या निर्बंधाचे समर्थन करण्यासाठी केला जातो.
माउंट एथोस, ग्रीस
उत्तर ग्रीसमधील हा पर्वत आणि द्वीपकल्प सुमारे २००० भिक्षूंसाठी बांधण्यात आलेला एक मठ आहे. यात मागील जवळपास १००० वर्षांहून अधिक काळ स्त्रियांनाच नव्हे तर प्राण्यांना देखील प्रवेश दिला जात नाही. याआधीही एकदा महिलांनी विरोध करून द्वीपकल्पात प्रवेश केला होता, मात्र ते पाहून तेथील स्थानिक भिक्षूंनी या कृत्याबद्दल रोष व्यक्त केला होता. या भिक्षूंची मान्यता आहे की, महिलांच्या उपस्थितीमुळे समाजाची सामाजिक जीवनशैली बदलते आणि त्यांचा आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग मंदावतो. म्हणून या ठिकाणी महिलांना प्रवेस देण्यास मनाई करण्यात आली आहे.
माउंट ओमिन, जपान
जपानमधील माउंट ओमिनमध्ये यामाबुशी भिक्षू राहतात, या ठिकाणी महिलांच्या येण्यावरही बंदी आहे. इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की इथे ते त्यांच्या धार्मिक श्रद्धेला प्राधान्य देतात, ज्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. अनेक स्त्रीवादी महिलांनी या ठिकाणावरील बंदी हटवण्याची मागणी केली असली तरी आजही मंदिराच्या दारावर महिलांना येण्यास मनाई असल्याचे लिहिलेले आहे.
ओकिनोशिमा बेट, जपान
जपानमध्ये ओकिनोशिमा हे सुंदर बेट आहे, ज्याला जागतिक वारसा असा दर्जाही देण्यात आला आहे. परंतु येथे राहणार्या शिंटो परंपरेतील भिक्षूंनी या ठिकाणी महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, त्यामुळे महिला येथे जाऊ शकत नाहीत. या संपूर्ण बेटावर महिलांच्या प्रवेशावर कडक बंदी घातली आहे. या बेटावर मुनाकाता तैशा ओकिनोशिमा मंदिर आहे, जिथे समुद्राच्या देवीची पूजा केली जाते. या बेटावर प्राचीन काळापासून चालत आलेले धार्मिक निर्बंध आजही लागू आहेत, त्यात महिलांच्या येण्यावर बंदी आहे.