अफगाणिस्तानमधील तालिबानने एका विद्यार्थ्याची मुंबईत अफगाण राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला भारताने अद्याप जाहीर मान्यता दिली नसली तरी संबंधित अधिकारी गेली सात वर्ष भारतातीलच एका विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, या शिक्षणासाठी त्यांना भारत सरकारचीच शिष्यवृत्ती मिळाली आहे. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर वर्षभरात भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंधांमध्ये स्थिरता आली आहे. त्यामधीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या नियुक्तीकडे पाहिले जाते. अफगाणिस्तानमधील तालिबानने मुंबईतील वाणिज्य दूतासाठी नेमलेल्या या अधिका-याचे नाव इक्रमुद्दीन कामिल आहे. या नियुक्तीला परवानगी मिळाली तर डॉ. इक्रमुद्दीन कामिल हे भारतातील तालिबानचे पहिले राजदूत ठरतील. इक्रमुद्दीन कामिल यांच्यासाठी भारत देश नवीन नाही. ते गेल्या सात वर्षांपासून दिल्लीतील एका विद्यापीठात शिकत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर होत असलेली ही महत्त्वपूर्ण घटना आहे. डॉ. इक्रामुद्दीन कामिल हे एक तरुण अफगाण नागरिक असून ते गेल्या सात वर्षांपासून भारतातील दक्षिण आशिया विद्यापीठ, दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय कायद्यात पीएचडी करत आहेत. (Dr. Hafiz Ikramuddin Kamil)
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या शिष्यवृत्तीतूनच त्यांचा हा अभ्यास सुरू आहे. सध्या या नियुक्तीच्या सुचनेमुळे इक्रामुद्दीन कामिल मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा परराष्ट्र अधिकारी म्हणून काम करण्याचा यापूर्वीचाही अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात सुरक्षा सहकार्य आणि सीमा व्यवहार विभागाचे उपसंचालक म्हणून काम केले आहे. डॉ. इक्रमुद्दीन कामिल यांच्या नियुक्तीची माहिती, तालिबानचे राजकीय घडामोडींचे उप परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टॅनिकझाई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन दिली आहे. डॉ. हाफीज इकरामुद्दीन कामिल हे भारतातील मुंबई शहरात इस्लामिक अमिरात अफगाणिस्तानचे नवे वाणिज्यदूत असतील अशी पोस्ट त्यांनी टाकल्यानं डॉ. हाफीज कोण आहेत, याची चौकशी सुरु झाली. अफगाण तालिबाननं ही माहिती भारत सरकारकडेही पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (International News)
डॉ. हाफीज यांची ही नियुक्ती तालिबानकडून झाल्याचे नक्की असले तरी भारत त्याला पाठिंबा देईल अशी अटकळ आहे. कारण सध्या भारत आणि तालिबान यांच्यातील संबंध शांततापूर्वक सुधारत आहेत. अलीकडेच परराष्ट्र मंत्रालयातील पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण व्यवहारांसाठीचे संयुक्त सचिव जेपी सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ काबूलला गेले होते. त्यांनी तिथे तालिबानचे कार्यवाहक संरक्षण मंत्री मुल्ला मोहम्मद याकूब यांची भेट घेतली. याकूब हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा आहे. मुल्ला उमर हा अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला होता. त्यामुळेच भारताच्या पथकानं मुल्ला याकूब याची भेट नेमकी कशासाठी घेतली यावर अनेक चर्चा झाल्या आहेत. एकीकडे अमेरिका आणि तालिबान यांचे संबंध टोकाच्या वादात असतांना भारतानं तालिबानबरोबर आपल्या संबंधात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. तालिबान आणि पाकिस्तान सरकारमध्येही वाद सुरु आहेत. या सर्वांत भारतानं तालिबान सरकारला आपल्या बाजुनं वळवल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे भारत एकीकडे अमेरिका आणि पाकिस्तानवरही वचक ठेऊ शकणार आहे. (Dr. Hafiz Ikramuddin Kamil)
======
हे देखील वाचा : हिजाबबंदीसाठी इराणी तरुणींचे नग्न आंदोलन !
====
या सर्वात डॉ. इक्रमुद्दीन कामिल यांची नियुक्ती लक्षवेधी ठरणार आहे. माहितीनुसार कामिल यांनी सध्या मुंबईत आहेत. इस्लामिक अमिरातीचे प्रतिनिधित्व करणारा मुत्सद्दी म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये भारत सरकारची अनेक योजनांमध्ये गुंतवणूक आहे. तालिबननं अफगाणिस्तानमधील सत्ता काबीज केल्यावर या सर्व योजनांना खिळ बसली आहे. ना ऩफा ना तोटा या तत्वावर चालू असलेल्या योजना अफगाणिस्तानमधील जनतेच्या फायद्याच्या आहेत. त्यात धरण आणि विज प्रकल्पांचाही समावेश आहे. त्यामुळेच भारत सरकारनं तालिबान सरकारबाबत वेट अँड वॉचची भूमिका ठेवली होती. आता ही भूमिका सफल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कुपोषण वाढले असून बेकारीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदत रोखल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा आहे. अशा परिस्थितीत भारतानं तालिबानला हात दिल्यानं या दोघांमधील संबंध सुधारत आहेत. भारतानं अफगाणिस्तानची संसद ‘मिली शूरा’ 670 कोटी रुपये खर्चून बांधले आहे. शिवाय हेरांत प्रांताला वीज पुरवठा करणारे सलमा धरणही भारतानं बांधले आहे. याशिवाय भारताने गहू, औषधे आणि वैद्यकीय साधनांचाही पुरवठाही अफगाणिस्तानमध्ये केला आहे. त्यामुळे भारताचे तालिबानबरोबरचे संबंध सुधारत असल्याचे चित्र आहे. (International News)
सई बने