निवडणुकीचा प्रचार तर चालू आहेत. नेत्यांची वक्तव्ये, पक्षांची आश्वासनं यांनीच सध्या सगळी मीडिया स्पेस भरून टाकली आहे. मतदारसंघांचाच विचार करायचा झाल्यास, काही मतदारसंघाच्या जरा जास्तच चर्चा आहे, तर काही मतदारसंघांमध्ये मीडिया पोचला कि नाही ? असा प्रश्न पडतो. बरं, लढती रंगीत हव्यात? असा क्रायटेरिया असेल तर असे अनेक मतदारसंघ आहेत जिथल्या लढती अत्यंत चुरशीच्या आहेत. या मतदारसंघात नेमका कोणता पॅटर्न चालणार हे भल्या भल्या राजकीय पंडितांना ओळखता येत नाही. असाच एक मतदारसंघ आहे, विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहणार आहोत उरण विधानसभा मतदारसंघ. उरणमध्ये नेमकी लढत कशी आहे? उरणचा पॅटर्न इतर मतदारसंघांपेक्षा वेगळा कसा ठरतो? जाणून घेऊया. (Uran)
तर उरण विधानसभा मतदारसंघ उरण तालुका, पनवेल तालुक्यातील काही भाग मिळून तयार झाला आहे. झपाट्याने वाढणारा उरण हा भाग अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. इथे बहुचर्चित आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, ओएनजीसी प्रकल्प, रसायनीची जुनी एमआयडीसी म्हणजे पाताळ गंगा एमआयडीसी, ऐतिहासिक एलिफण्टा लेण्यांचा समावेश होतो. उरण मतदारसंघात एकूण ३ लाख ३६ हजार २२० मतदार आहेत. रायगड जिल्ह्यातील या मतदारसंघाची रचना बघता जिंकण्यासाठी इथे आगरी, कोळी मतदारांवर भिस्त जास्त असते. पक्षनिहाय विचार करायचा झाल्यास रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघ एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे बालेकिल्ले होते. मात्र जशी शेकापला उतरती कळा लागायला लागली, तशी सर्वच मतदारसंघातील गणितं बदलू लागली. उरण विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद नव्हता. २००९ मध्ये उरण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ ला शेकापचे विवेक पाटील या मतदारसंघातून आमदार होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांचा अवघ्या ८११ मताने निसटता पराभवापासून शेकापला उतरती कळा लागली आहे. त्यानंतर कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणामुळे विवेक पाटील यांना झालेला तुरुंगवास यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात शेकापला वाली नसल्याचे स्थिती निर्माण झाली. ज्यामुळे इतर पक्षांच्या वाढीला मोठी स्पेस मिळाली. (Political Updates)
ज्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला झाला आणि शिवसेनेचे मनोहर भोईर हे विजयी झाले. त्यांनी शेकापच्या विवेक पाटील यांना आटातटीच्या लढतीत केवळ ८११ मतांनी पराभव केला. या वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा मनोहर भोईर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे मनोहर भोईर आता माजी आमदार म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहेत. माजी यासाठी की सध्या उरणचे विद्यमान आमदार आहेत महेश बालदी. इंटरेस्टींगिली महेश बालदी हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर होते. मात्र दिवसेंदिवस शेकापची होणाऱ्या पीछेहाटीचा फायदा महेश बालदी यांनी पुरेपूर उचलला आणि भाजप मोठ्या प्रमाणात वाढवली. पण २०१९ ची निवडणूक भाजप शिवसेना युतीने एकत्र लढली आणि मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेला. अशावेळी महेश बालदी यांनी अपक्ष लढत दिली आणि सेनेच्या भोईर यांचा पराभव केला. त्यानंतर महेश बालदी पुन्हा भाजपात गेले होते आणि आता ते भाजपच्या अधीकृत चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. (Uran)
या सर्व निकालातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उरणमध्ये प्रत्येक निवडणुकीत नवीन आमदार निवडून आला आहे. थोडक्यात, मतदारसंघात जी सातत्याने राजकीय परिस्थिती बदलत आहे त्यात कोणत्याही एका मोठ्या नेत्याला अजून पूर्णपणे जम बसवता आलेला नाहीये. २०२४ च्या लोकसभेचा विचार करायचा झाल्यास, उरणमधून उद्धव ठाकरे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघिरे यांना उरण विधानसभा क्षेत्रात १२ हजारांची लीड मिळाली होती. त्यामुळे बालदी यांना निवडणूक अवघड जाणार असं बोललं जात होतं. मात्र यातही पुन्हा एकदा ट्विस्ट आला. लोकसभा निवडणुकीत शेकाप व शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येत उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळविले होते. त्यामुळे महाविकास विरोधात महायुती अशी थेट लढत होण्याची अपेक्षा मतदारांना होती. पण हे एकी विधानसभेपर्यंत टिकलेली नाहीये. उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात एकमत न झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. (Political Updates)
======
हे देखील वाचा : पनवेल मतदारसंघ कोणाच्या बाजूने?
========
हे दोन्ही पक्ष या मतदारसंघात वेगवेगळे लढणार आहेत. उरण मतदारसंघातून शेकापकडून प्रीतम म्हात्रे जरी निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे दुहेरी लढत आता तिरंगी झाली आहे. गेल्या पाच वर्षात शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी झाली आहे. असे असले तर गाव पातळीवर मजबूत असलेल्या या पक्षाची मूळं कायम आहेत. अशावेळी महाविकास आघाडीच्या मतांत फूट पडणार हेही नक्की आहे. या मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश बालदी यांच्याविषयी असलेली नाराजी, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे स्थानिक भूमीपुत्रांमध्ये असलेली अस्वस्थता, आणि दि.बा.पाटील यांच्या नामांतराचा गाजत असलेला प्रश्न यामुळे ही निवडणुक भाजपला सोपी नाही असेच चित्र होते. मात्र महायुतीविरोधात रान पेटविण्याऐवजी शेकाप आणि उद्धव सेनेतच जुंपल्याने बालदी यांचं पारडं पुन्हा जड आहे. त्यामुळं पुन्हा उरणमध्ये चुरशीची निवडणूक होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे मतदारसंघाचा एकूणच इतिहास पाहता उरण पॅटर्न अजुनही कोणाला ओळखता आलेला नाहीये हे मात्र नक्की. (Uran)