हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात एकादशी येत असते. मात्र वर्षातून दोन एकादशींना फार मोठे महत्व आपल्या धर्मात दिले आहे. यातली एक एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी देवशयनी किंवा आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी.
यातली आषाढी एकादशी तर झाली आता येणार आहे कार्तिकी एकादशी. १२ नोव्हेंबर ला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षी ही एकादशीची तिथी आहे. याच एकादशीला देवोत्थानी, प्रबोधिनी, देवउठनी किंवा देवोत्थान एकादशी या नावांनीही ओळखले जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या त्यांच्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात आणि पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचे त्यांचे काम स्विकारतात. याच देवउठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशीचा विवाहही साजरा केला जातो. चला जाणून घेऊया देवउठनी एकादशीची संपूर्ण माहिती आणि पूजा, महत्वाबद्दल.
आषाढ शुक्ल एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेला विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीस जागा होतो. म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थानी असे नाव पडले आहे. या दिवशी उपवास, जागरण करून अगस्त्याच्या फुलांनी विष्णूची पूजा केली जाते. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतच्या काळाला चातुर्मास असेही म्हणतात. हरी प्रबोधिनी एकादशीपासून चातुर्मास व्रताची समाप्ती होते.
प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो.
प्रबोधन एकादशी कधी आहे?
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रबोधिनी एकादशी यंदा १२ नोव्हेंबरला आहे. या दिवशी एकादशी तिथी सूर्योदयापूर्वीपासून सुरु होईल आणि ती दुपारी ४.०५ पर्यंत राहील. मात्र उदय तिथीच्या नियमानुसार १२ तारखेला एकादशी संपूर्ण दिवस राहील. तर १३ नोव्हेंबरला एकादशीचे व्रत सोडता येणार आहे.
प्रबोधिनी एकादशी महत्त्व
या दिवशी भगवान विष्णू ५ महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतील. शालिग्राम आणि तुळशीमातेचा विवाह प्रबोधिनीला रात्री होतो. तुळशीमातेच्या विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे. कारण. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे.
एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या
एकादशीच्या दिवशी दान करणे श्रेष्ठ मानले जाते. शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी गंगा स्नान करावे. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी केशर, केळी किंवा हळद दान करावे. एकादशीचे व्रत केल्यास धन, मान-सन्मान आणि संतती सुखाबरोबरच अपेक्षित फल प्राप्त होते, असा विश्वास आहे. एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात.