आजचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनानंतर साजरा होणार पाडव्याचा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मातील अतिशय शुभ आणि महत्वाचे मानले जाणाऱ्या साडे तीन मुहुर्तापैकीच एक दिवस म्हणून पाडव्याला ओळखले जाते. आजच्या दिवसाला लक्ष्मी पूजनाइतकेच महत्व आहे. आजचा सण हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आजपासून अनेक ठिकाणी नवीन वर्षाला सुरुवात होते. आजपासून विक्रम संवत्सर देखील सुरु होते. व्यापारी वर्गामध्ये देखील आजच्या दिवसाला मोठे महत्व आहे.
आजच्या दिवसाचे अजून एक मोठे महत्व म्हणजे आज साजरी होणारी गोवर्धन पूजा. गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू लोकांची महत्वाची प्रथा आहे. ही पूजा खासकरून मथुरेच्या आसपासचे लोक करतात. बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ज्यांना ही पूजा शक्य नसते ते गोवर्धन पर्वताची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. या पूजेलाच अन्नकूट पूजा असे देखील म्हणतात. या सणाची परंपरा भगवान श्रीकृष्णाशी जोडलेली आहे. गोवर्धन पूजा हा खासकरून शेती, शेती आणि दुधाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एक मोठा सण आहे.
घराच्याबाहेर गाईच्या शेणाने गोवर्धन पर्वत तयार केला जातो आणि लोक या दिवशी गायीची पूजा करतात. मातीची गाय किंवा वासरुही तयार करावे. पूजा विधीमध्ये आधी श्रीकृष्णाला दुधानं आंघोळ घालावी. यानंतर श्रीकृष्णाची पूजा करुन अन्नकूट अर्पण करावा. अनेक शतकांपासून दिवाळीनंतर एक दिवस गोवर्धन पूजा साजरी करण्याची परंपरा चालत आली आहे. आता गाईचे शेण सहज उपलब्ध होत नसल्याने रांगोळीने देखील गोवर्धन पर्वात लढून त्याची पूजा केली जाते.
गोवर्द्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव ॥ या लक्ष्मीर्लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥ अग्रतः सन्तु मे गावो गावो मे सन्तु पृष्ठतः । गावो मे हृदये सन्तु गवां मध्ये वसाम्यहम् ॥ हा मंत्र म्हणून गोवर्धन पूजा केली जाते.
गोवर्धन परिक्रमा
गोवर्धन पर्वत मथुरेपासून २२ किमी अंतरावर आहे. गिरीराज गोवर्धन हे भगवान श्रीकृष्णाचे खरे रूप मानले जाते. हे प्रदक्षिणा करतात जे अनंत पुण्य फलदायी असतात आणि मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. गोवर्धन परिक्रमा 21 किमीची आहे. राधाकुंड, गौडिया मठ, मानसी-गंगा, दान-घाटी, पुंचारी का लोथा इत्यादी अनेक सिद्ध ठिकाणे वाटेत सापडतात. त्याच्या दर्शनाने भक्त धन्य होतात.
अन्नकूट म्हणजे काय ?
विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट असं म्हटलं जातं. या दिवशी गायींना अन्न देऊन आणि त्यांची उपासना करून शहराबाहेर गाजे आणि बाजे सोबत जातात. तेथे प्रत्येक गाईची आरती करण्यात येत. असं केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो, अशी मान्यता आहे.
गोवर्धन पूजा कथा
गोवर्धन पूजा करण्यामागील धार्मिक धारणा अशी आहे की भगवान श्रीकृष्णांना इंद्राचा अहंकार मोडायचा होता. यासाठी त्यांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळातील लोकांचे इंद्रापासून रक्षण केले. त्यानंतर कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी 56 नैवेद्य करून गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा आदेश स्वतः भगवान श्रीकृष्णाने दिला होता, असे मानले जाते. तेव्हापासून आजही गोवर्धन पूजेची परंपरा सुरू असून दरवर्षी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट हा उत्सव साजरा केला जातो.