उद्या आपण दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात नरक चतुर्दशी साजरी करणार आहोत. उद्या पहाटे सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्याने पुण्य मिळते. सोबतच मृत्यूनंतर नरकात जाणे देखील टाळता येते. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असे म्हटले जाते. नरक चतुर्दशीच्या रात्रीची पूजा यमाची, श्रीकृष्णाची आणि हनुमानाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे पौराणिक कारणं कोणती आहेत ते जाणून घेऊया.
आख्यायिका १
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नींसह द्वारकेत राहत होते. एके दिवशी देवराज इंद्र भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले… हे कृष्णा, दैत्य राजा भौमासुराच्या अत्याचारामुळे देवांना त्रास होत आहे.
क्रूर भौमासुराने वरुणाचे छत्र, अदितीचे कानातले आणि देवतांचे रत्न हिसकावून घेतले आणि तो तिन्ही लोकांचा राजा झाला. भौमासुराने पृथ्वीवरील अनेक राजे आणि सामान्य लोकांच्या मुलींचे अपहरण केले आहे. या तिन्ही जगाला त्या क्रूर राक्षसापासून वाचवा.
देवराज इंद्राचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी सत्यभामासह गरुडावर स्वार झाले आणि क्रूर भौमासुराचे वास्तव्य असलेल्या प्राग्ज्योतषपुरात पोहोचले. भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम आपल्या पत्नीच्या मदतीने मुर नावाच्या राक्षसाचा सहा पुत्रांसह वध केला. मुर राक्षसाच्या वधाची बातमी ऐकून भौमासुर आपल्या सैन्यासह युद्धासाठी निघाला. भौमासुराला एका स्त्रीकडून मारले जाईल असा शाप होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिला सारथी बनवले आणि युद्धाच्या शेवटी सत्यभामेच्या मदतीने भौमासुराचा वध केला. यानंतर त्यांनी भौमासुरचा पुत्र भगदत्त याला निर्भयतेचे वरदान देऊन प्राग्ज्योतिषाचा राजा बनवले.
भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी भौमासुराचा वध केला, ती आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती, म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने केवळ नरकासुराचा वध केला नाही तर त्याच्या बंदिवासातून सुमारे 16 हजार स्त्रियांची सुटका केली. या आनंदामुळे त्यादिवशी दीपप्रज्वलन करण्यात आले. चहूबाजूंनी दिवेही दान करण्यात आले. नरकासुराच्या मृत्यूनंतर, त्याच्या शरीरावरील रक्ताचे थैले स्वच्छ करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने स्वतः तेलाने स्नान केले. यामुळेच ते नेहमी अंगाला तेल लावतात, तेव्हापासून अभ्यंगस्नानाला सुरुवात झाली.
आख्यायिका २
रंतिदेव नावाचा एक धर्मात्मा राजा होऊन गेला. त्याने नकळतपणे देखील कोणतेही पाप केले नाही. तरीही मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर यमदूत त्याला नरकात येण्याची तयारी करू लागला. राजा म्हणाला की माझ्यावर कृपा करा आणि सांगा की मला कोणत्या पापामुळे नरकात नेले जात आहे. हे ऐकून यमदूत म्हणाला की, हे राजा, एकदा तुझ्या दारावरून एक ब्राह्मण भुकेला परतला होता. हे त्यात पापाचे फळ आहे. हे ऐकून राजाने यमदूताकडे एक वर्षाची वेळ मागितली. त्यानंतर यमदूताने राजाला एक वर्षाची मुदत दिली. राजा आपली चिंता घेऊन ऋषींकडे गेला आणि त्यांना आपली सर्व कहाणी कथन केली. या पापापासून मला मुक्ती मिळावी यासाठी मी काय करावे असे राजाने ऋषींना विचारले.
त्यावर ऋषींनी राजाला सांगितले की, कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला व्रत करावे आणि ब्राह्मणांना भोजनदान द्यावे. त्यानंतर त्यांच्याकडे आपल्या अपराधांसाठी क्षमायाचना करावी. ऋषींनी जे काही सांगितले तसेच राजाने केले. अशा प्रकारे राजा पापमुक्त झाला आणि त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त झाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्ती मिळवण्याच्या हेतूने भूलोकात कार्तिक चतुर्दशीला व्रत केले जाते.
आख्यायिका ३
========
हे देखील वाचा : जाणून घ्या नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नानाचा इतिहास
========
या दिवशी दक्षिण भारतात वामनपूजा देखील केली जाते. असे म्हणतात की, बळीला (महाबली) भगवान विष्णुने वामन अवतारात दरवर्षी त्यांच्याकडे पोहोचण्याचा आशीर्वाद दिला होता. याच कारणामुळे वामनपूजा केली जाते. बळी म्हणाले, हे भगवान, तुम्ही कार्तिक कृष्ण त्रयोदशीपासून आमावस्येच्या अवधीत माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहे. म्हणून जी व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजाच्या निमित्त दीपदान करेल, त्या व्यक्तीला यमयातना होऊ नयेत आणि जी व्यक्ती या पर्वात दिवाळी साजरी करेल त्याचे घर देवी लक्ष्मी कधीही सोडणार नाही.
ही प्रार्थना ऐकल्यानंतर भगवान वामन म्हणाले की, राजन,असेत होईल… तथास्तु. भगवान वामन यांनी राजा बळीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिनी यमराजाच्या निमित्ताने व्रत, पूजन आणि दीपदानाचे प्रचलन सुरू झाले.
(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही.)