मोठ्या जल्लोषात धनत्रयोदशी साजरी झाल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले ते अभ्यंगस्नानाचे अर्थात छोट्या दिवाळीचे. लक्ष्मी पूजनाच्या आधी नरक चतुर्दशी येते आणि त्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वीच्या उटणे, सुवाहक तेल आणि सुवासिक साबणाने अभ्यंगस्नान केले जाते. यालाच छोटी दिवाळी म्हटले जाते. नरक चतुर्दशी हा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. नरक चतुर्दशी दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केली जाते. यावर्षी नरक चतुर्दशी कधी आहे, त्याचा मुहूर्त कधी आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊया.
नरक चतुर्दशीची तिथी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी अर्थात ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी समाप्त होईल. सूर्याने बघितलेल्या तिथीनुसार म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जाईल.
नरक चतुर्दशीला कोणत्या देवाची पूजा करतात?
नरक चतुर्दशीच्या दिवशी मृत्यूची देवता यम, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, हनुमान आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा करावी. या सर्व देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्यात स्थापित कराव्या आणि त्यांची मनोभावे पूजा करावी.
नरक चतुर्दशीला कोणत्या गोष्टी कराव्यात?
सकाळी उटणे लावून आंघोळ
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा आहे. उटणे म्हणजे विविध औषधी वनस्पतींचा मिश्रण असलेला उटणे लावून स्नान केल्याने शरीरातील अशुद्धता दूर होते. असा समज आहे की यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
तेल अभ्यंग स्नान
या दिवशी अभ्यंग स्नान (तेल लावून स्नान करणे) करणे शुभ मानले जाते. यामुळे शरीर आणि मनाची स्वच्छता होते आणि यातून आत्मा शुद्ध होतो. अभ्यंग स्नानानंतर गोड पक्वानांचे सेवन करणे शुभ मानले जाते.
दिवा लावणे
नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी घराच्या बाहेर दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावल्याने वातावरणात सकारात्मकता वाढते असे मानले जाते. तसेच या दिवशी दिवा लावल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख-समृद्धी नांदते.
यमराजाची पूजा
या दिवशी मृत्यू देवता यमराजाची पूजा केली जाते. यासाठी एक दिवा विशेषतः यमासाठी लावला जातो. याला “यमदीप” म्हणतात. या दिवशी यमासाठी दिवा लावल्याने आपल्या मृत्यूनंतर नरकात जाण्याचे भय राहत नाही, असा श्रद्धा आहे.
========
हे देखील वाचा : जाणून घ्या नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नानाचा इतिहास
========
कारिटं फोडण्याची परंपरा
काही ठिकाणी अभ्यंगस्नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्याची परंपरा आजही पाळली जाते. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानापूर्वी घराबाहेर किंवा तुळशीजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. अभ्यंगस्नानाच्या आधी कारिटं फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वध केला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून गाजावाजा कोणताही दावा करत नाही.)