आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला प्रेझेंटेबल राहणे खूपच महत्वाचे असते. आपल्या लूकची सगळेच कमालीची काळजी घेताना दिसतात. फक्त कपडेच नाहीतर आपले दिसणे देखील आजच्या काळात काही प्रमाणात महत्वाचे असते. त्यामुळे अनेक महिला, मुली आपल्या रोजच्या कामाला जाताना किंवा कॉलेजला जाताना साधा का असेना मेकअप करताना दिसतात.
मेकअप केला की आपला कॉन्फिडन्स कमालीचा वाढतो आणि चेहरा देखील चमकतो. मात्र हा मेकअप करायला आवडत असला तरी तो सगळ्यांनाच जमतो असे अजिबातच नाही. मेकअप करणे आणि तो तुमच्या चेहऱ्याला, त्वचेला सूट होणे देखील महत्वाचे असते. शिवाय मेकअप करताना तो कसा केला पाहिजे, त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे देखील गरजेचे असते. मेकअप मधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ‘फाउंडेशन.’
फाउंडेशन हा मेकअपचा पाया समजला जातो. जर तोच चुकला तर संपूर्ण मेकअप चुकीचा होतो, किंवा विचित्र दिसतो. तुमचा मेकअप तुमचा लूक किती सुंदर करेल हे योग्य फाउंडेशन ठरवते. फाउंडेशन घेताना देखील कोणताही घेऊन चालत नाही. आपल्या त्वचेच्या रंगानुसार तो निवडणे गरजेचे असते. जर शेड थोडा जरी चुकला तरी मेकअप विचित्र दिसायला लागतो. मात्र फाउंडेशनचा शेड आपल्या त्वचेला सूट होईल तो कसा निवडावा? त्यासाठी कोणते गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊया.
स्किन टोन समजून घेण्यापूर्वी अंडरटोन समजून घेता येणे आवश्यक असते. अंडरटोन हा तो रंग आहे जो तुमच्या त्वचेचा एकूण रंग दाखवतो. कधीकधी त्वचेच्या टोनमध्ये बदल होतात. मुरुम, टॅनिंग, डेड स्किन आदी अनेक गोष्टी तुमच्या त्वचेचा रंग बदलवण्यासाठी कारणीभूत ठरतात. मात्र अंडरटोन हा कायम सारखाच राहतो. त्वचेच्या टोनसोबतच अंडरटोनही महत्त्वाचा आहे. अंडरटोन्सचे मुख्य तीन प्रकार आहेत. थंड, उबदार आणि तटस्थ. या अंडरटोन्सनुसार फाउंडेशन निवडले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचा अंडरटोन ओळखण्याचे दोन सोपे मार्ग आहेत.
अंडरटोन ओळखण्यासाठी शिरा तपासून घेऊ शकता. आपल्या मनगटातील शिरा / नसा पाहा. जर तुमच्या नसांचा रंग जांभळा किंवा निळा असेल तर याचा अर्थ तुमचा अंडरटोन थंड आहे. जर तुमच्या नसांचा रंग हिरवा किंवा ऑलिव्ह हिरवा असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा अंडरटोन उबदार आहे. तटस्थ अंडरटोनमध्ये आपण थंड आणि उबदार दोन्हीचे मिश्रण पाहू शकता.
सावळ्या त्वचेच्या रंगासाठी लाइट शेड फाऊंडेशन चुकूनही निवडू नका. या स्किन टोनच्या लोकांसाठी ब्राऊन शेडचे फाउंडेशन घ्या. जेणेकरून यात तुमचा मेकअप सुबक होईल. यातही जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही लिक्विड बेस्ड फाउंडेशन निवडा. लिक्विड बेस फाउंडेशनचे वजन कमी असते त्यामुळे ते त्वचेत सहज शोषले जाते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ड्यू आणि सॅटिनवर आधारित फाउंडेशन वापरून पहा.
कृष्णवर्णीय त्वचेसाठी लिक्विड फाउंडेशन चांगले असते. कारण या रंगाच्या बहुतांशी महिलांची त्वचा तेलकट असते. त्यामुळे लिक्विड फाउंडेशन फिनिशिंग लुक देण्यासोबतच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल देखील शोषून घेते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीम बेस्ड फाउंडेशन घ्या.
=======
हे देखील वाचा : सकाळी लवकर उठण्याचे फायदे
=======
गव्हाळ रंगाच्या स्किन टोनच्या महिलांनी मॅट किंवा लिक्विड फाउंडेशन वापरण्यासाठी प्राधान्य द्यावे. फाउंडेशन खरेदी करण्यापूर्वी, एकदा मानेवर किंवा कपाळावर फाउंडेशनचा शेड मॅच करून पाहावा. अनेक वेळा चुकीच्या फाउंडेशनमुळे लूक खराब दिसू लागतो.
जर तुमची त्वचा एकदम गोरी असेल तर तुम्ही बेज कलर टोन फाउंडेशन घेऊ शकता. वास्तविक, ही गुलाबी रंगाची छटा आहे, जी गोऱ्या त्वचेवर उठून दिसते. जर तुम्हाला फाउंडेशन घेताना शेड लक्षात येतच नसतील तर मनगटावर किंवा मानेवर शेड चेक करून घेणे केव्हाही उत्तमच ठरेल.