दक्षिणपूर्व आशिया स्थित असलेल्या इंडोनेशियाला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. 17,508 बेटांच्या या देशाची लोकसंख्या सुमारे 27 कोटी आहे. जगातील चौथा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हा देश असून सर्वात जास्त मुस्लिम नागरिक या देशात राहतात. याच देशाच्या राष्ट्रपतीपदी आता प्रबोवो सुबियांतो यांची निवड झाली आहे. वास्तविक कुठल्याही देशाचा राष्ट्रपती निवडणे ही तेथील अंतर्गत प्रक्रिया आहे. त्यात एवढं विशेष काय, असा प्रश्न विचारला जाईल. मात्र प्रबोवो सुबियांतो यांचे नाव ज्यांना माहित आहे, त्यांना या सुबियांतोचा भूतकाळ नक्कीच आठवणार आहे. (Prabowo Subianto)
एक क्रूर लष्करी हुकूमशहा आणि खुनी अशीच त्यांची प्रतिमा आहे. आता हेच सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती झाले आहेत. एकेकाळी त्यांचे नाव घेतले तरी थरकाप उडत असे, अशा प्रबोवो सुबियांतोंचा भूतकाळ जाणण्यासारखा आहे. जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया या देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून प्रबोवो सुबियांतो यांनी शपथ घेतली आहे. 73 वर्षाचे प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे माजी संरक्षण मंत्री आहेत. एकेकाळी याच सुबियांतोचे नाव एकले तरी इंडोनेशियातील सर्वसामान्य नागरिक घाबरून जायचे, एवढी त्यांची दहशत होती. मानवाधिकारांचे उल्लंघन आणि आपल्याच देशातील अनेक नागरिकांना गायब केल्याच्या तक्रारी त्यांच्याबद्दल आहेत. अर्थात आता तेच प्रबोवो सुबियांतो या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत. (International News)
प्रबोवो यांचे सर्व कुटुंब श्रीमंत आणि राजकारणी. त्यांचे वडिल हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. प्रबोवो सुबियांतो यांनी 1970 मध्ये इंडोनेशियन मिलिटरी अकादमी मधून पदवी प्राप्त केली आणि 1998 मध्ये स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह कमांडचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त होईपर्यंत त्यांनी मुख्यतः विशेष दलांमध्ये सेवा केली. मात्र आक्रमक विचारांच्या प्रबोवो यांना काही वादामुळे इंडोनेशिया सोडून युरोपमध्ये आश्रय घ्यावा लागला. काही वर्षांनी परतल्यावर त्यांनी पुन्हा सैन्यात प्रवेश केला. त्यांची लगेच इंडोनेशियाच्या एलिट स्पेशल फोर्सच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आणि इंडोनेशियामध्ये सुबियांतोचे युग सुरु झाले. सैन्यात असतांना त्यांनी केलेल्या कारवायांमुळे अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. यातील सर्व आरोप सुबियांतो हे कायम फेटाळत आले आहेत. प्रबोवो सुबियांतो यांचे सर्वात बलस्थान म्हणजे ते सुहार्तो यांचे जावई होते. इंडोनेशियाचे हुकूमशहा आणि राष्ट्रपती म्हणून सुहार्तो प्रसिद्ध होते. 1967 पासून 1998 पर्यंत त्यांनी इंडोनेशियावर हुकूमशाही शासन केले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन झाले. सुहार्तो यांची 31 वर्षाची कारर्कीद सर्वात क्रूर आणि भ्रष्ट मानली जाते. (Prabowo Subianto)
त्यात त्यांना प्रबोवो सुबियांतो यांची मोठी मदत झाली होती. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा सुहार्तोची राजवट पडली तेव्हा त्यांच्या राजवटीस विरोध करणाऱ्या 20 हून अधिक विद्यार्थी कार्यकर्त्यांचे अपहरण करण्यात आले. यातली बहुतांशी अद्यापही गायब आहेत. त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता अधिक आहे. या अपहरणात प्रबोवो यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर प्रबोवोला सैन्यातून काढून टाकण्यात आले. ते काही काळ जॉर्डनमध्ये होते. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांनी त्यांना बंदी घातली. प्रबोवो 2019 मध्ये इंडोनेशियामध्ये परत आले आणि देशाचे संरक्षण मंत्री झाले. सुबियांतो हे तेव्हापासून राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले गेले. त्यांच्या विरोधात सुबियांतो यांनी दोनवेळा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली. परंतु 2014 आणि 2019 मध्ये जोको विडोडो पुन्हा अध्यक्ष झाले. मात्र त्यांनी सुबियांतो यांची संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती केली. आता तेच सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्रध्यक्ष झाले आहेत. (International News)
======
हे देखील वाचा : अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !
======
या निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान सुबियांतो यांनी देशवासीयांना देशांतर्गत उद्योगाला चालना देण्याचे आणि देशाची नवीन राजधानी शहर करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय देशातील कच्चा मालाला परदेशात चांगला भाव मिळण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. असे असले तरी इंडोनेशियातील लष्करी हुकूमशाहीच्या दिवसात सुबियांतो यांची प्रतिमा मलीन झालेली होती, ती प्रतिमा सुधारणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान रहाणार आहे. त्यांच्या कुटुंबियांचे इंडोनेशियाच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रावर वर्चस्व आहे. प्रबोवोचा भाऊ, हाशिम इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहे. इंडोनेशियापासून युरोप आणि उत्तर अमेरिकेपर्यंत जगभरातील अनेक मोठ्या मालमत्ता त्यांच्या नावावर आहेत. प्रबोवोच्या कुटुंबाचा दबदबा आणि त्यांची प्रतिमा यात आता अध्यक्षपदाची भूमिका ते कसे पार पाडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Prabowo Subianto)
सई बने