Home » जेएनयुत महाराज

जेएनयुत महाराज

by Team Gajawaja
0 comment
Jawaharlal Nehru University
Share

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अर्थातच जेएनयु हे भारतातील एक प्रसिद्ध केंद्रीय विद्यापीठ आहे. राजधानी दिल्लीमध्ये असलेले हे विद्यापीठ जवळपास 1,020 एकर जागेवर पसरले आहे. जेएनयु हे जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढेच त्यातील वादांमुळे ते कुप्रसिद्धही आहे. जेएनयुमध्ये मानवता, सामाजिक विज्ञान, विज्ञान, आंतरराष्ट्रीय अभ्यास, भाषा अभ्यास, संगणक विज्ञान अशा अगणित विषयात उच्चस्तरीय शिक्षण देण्यात येते. शिवाय या विद्यापीठात संशोधन करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तके, ग्रंथ उपलब्ध आहेत. या विद्यापिठाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून भारतीय राजकारणातील अनेक विभूती याच विद्यापीठातून आलेल्या आहेत. आता या जेएनयु विद्यापीठामध्ये आणखी एक अभ्यासक्रमाची नोंद करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम आहे, आपल्या महाराजांचा. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील अभ्यासक्रमाची जेएनयुमध्ये सुरुवात करण्यात येत आहे. जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महारांजांची रणनिती आणि शौर्यगाता हा अभ्यासक्रम आता सामिल करण्यात आला आहे. (Jawaharlal Nehru University)

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. सोबतच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या नावाने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये अखंड भारत आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांच्या संघर्षाची संकल्पना सांगण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जात असून या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. या अभ्यासक्रमात मराठा लष्करी इतिहास, शिवाजीची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाईल. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजी, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्राफ्ट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या अभ्यासक्रमासाठी पहिल्या पाच वर्षांत सुमारे 15-35 कोटी रुपयांचे बजेट आहे. यासाठी विशेष प्राध्यापकांची एक टीम नियुक्त करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची युद्धनिती यासंदर्भातील पुस्तकांचे स्वतंत्र संग्रहालय तयार करण्यात येणार आहे.

डिप्लोमा, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अशा तिन्ही प्रकारांमध्ये असलेला हा अभ्यासक्रम 2025 च्या शैक्षणिक कालावधीपासून सुरु करण्यात येणार आहे. जेएनयुमध्ये रशियन आणि चिनी क्रांतीसंदर्भात स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महारांजांसंदर्भात अभ्यासक्रम नव्हता. महाराजांच्या युद्धनितीसंदर्भात परदेशातील विद्यापिठात शिकवत असतांना भारतातील विद्यापीठात यासंदर्भात अग्रक्रमानं शिकवण्यात आलं पाहिजे, असा आग्रह जेएनयूच्या कुलगुरू प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी धरला होता. यासंदर्भात अन्य प्राध्यापकांनीही होकार दिल्यावर अभ्यास समिती तयार करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यासंदर्भातील अभ्यासक्रमाची आखणी कऱण्यात आली आहे. आजच्या काळात तरुणांना अखंड भारताची संकल्पना सांगणे गरजेचे आहे. तसेच त्यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्यही सांगणे गरजेचे आहे. त्याचा तरुणपिढीला नक्कीच फायदा होईल, असे जेएनयुतर्फे स्पष्ट कऱण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी सामर्थ्य, युद्धनीती आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना यासारख्या विषयांवरही अधिक संशोधन करण्यासाठी विदयार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यात येईल, असे जेएनयूच्या कुलगुरू प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितले आहे. (Jawaharlal Nehru University)

======

हे देखील वाचा :  मोती साबण आणि दिवाळी नक्की कनेक्शन काय ?

======

महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव या विद्यापिठाला देण्यात आले. पार्थसारथी हे या विद्यापिठाचे पहिले कुलगुरू होते. मात्र स्थापनेपासूनच जेएनयु हे वादात राहिले आहे. यात 70 टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते. मुख्यतः काश्मिरमधील विद्यार्थ्यांचा त्यात सुरुवातीला भरणा होता. नंतर मात्र भारताच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी जेएनयुमध्ये प्रवेश घेतला. या विद्यापिठात डाव्या विचारांनी प्रेरीत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. येथील छात्रसंघाच्या निवडणुकीतही मोठा तणाव असतो. असे असले तरी देशभरातील हुशार विद्यार्थ्यांना अत्यंत कमी दरात जेएनयुमधून पदवी प्राप्त करता येते. मात्र त्यासाठी विद्यापिठाची स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहे. आता या विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांची रणनिती शिकवली जाणार आहे. (Jawaharlal Nehru University)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.