कलाकार आणि राजकारण ही दोन क्षेत्र आता खूपच जवळ झाले आहेत. अनेक कलाकार राजकारणात देखील सक्रिय दिसतात. तर काही नेते मंडळी अभिनय करताना देखील पाहायला मिळतात. आजच्या काळात सोशल मीडियामुळे कलाकार विविध गोष्टींवर आपली मतं मांडत असतात. बरेच कलाकार राजकारणावर देखील भाष्य करताना दिसतात. विशिष्ट एका पक्षाला किंवा नेत्याला पाठिंबा देताना देखील बरेच कलाकार आपण पाहतो.
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला देखील आपण विविध राजकीय मंचावर, विविध राजकीय नेत्यांसोबत पाहिले आहे. अश्विनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टींवर भाष्य करत तिचे मतं मांडत असते. राजकारणावर अश्विनीला अनेकदा बोलताना आपण पाहिले आहे. हीच अश्विनी आता अभिनयासोबतच राजकारणात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकताच अश्विनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
अश्विनीने साताऱ्यातील वाई इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील आदी मोठी नेते मंडळी उपस्थित होती. पक्षप्रवेश झाल्यानंतर अश्विनीला लगेच शरद पवार गटात महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. तिने या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. अगदी गावातल्या निवडणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देऊन ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याचं व्हायच्या. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणं हे त्यांच्या रक्तातच होतं. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचं.
View this post on Instagram
पण, साधारण ४ वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की, ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली, तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचं स्वप्न आज ४ वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पूर्ण झालं आहे. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल.
मी स्वीकारलेलं हे काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झालं. त्या सगळ्यांचे आभार… राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट महिला काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे.
शरद पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील, अमोल कोल्हे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे प्रसाद काका सुर्वे, डॉ. नितीन सावंत, राजकुमार पाटील, बाबर, संतोष पवार यांची मी ऋणी आहे #राजकारणातून घडेल समाजकार्य”
अश्विनीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिचे अभिनंदन करत त्यांनी कधीचेच राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा होती असे म्हटले आहे. सगळ्यांना आता अश्विनीकडून उत्तम काम होणार आणि लोकांची आता सर्व अपेक्षा अश्विनी पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे.