मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते असलेल्या अतुल परचुरे यांचे आकस्मिक निधन झाले. अतुल परचुरे यांनी मराठीसोबतच हिंदी विश्वात देखील आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप सोडली. अतुल परचुरे म्हणजे नाटकांमधील राजा माणूस. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये अनेक अजरामर नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपली प्रतिभा प्रेक्षकांसमोर आणली. यासोबतच अतुल यांनी मालिका आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये देखील आपला ठसा उमटवला.
हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. अतुल परचुरे यांना लिव्हरचा कॅन्सर झाला होता. ते त्यातून बरे देखील झाले होते. मात्र अखेर त्यांची ही लढाई अपयशी ठरली आहे. नजर टाकूया अतुल यांच्या अभिनयातील कारकिर्दीबद्दल.
अतुल यांनी मनोरंजनविश्वात बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी १९८५ साली आलेल्या मराठी चित्रपट ‘खिचडी’मध्ये काम करत या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अतुल यांचे नाव समोर येताच सोबत आपोआप नाव येते त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे. या नाटकामध्ये त्यांनी पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारत जे काही कौतुक, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली ती अफाट होती.
या नाटकानंतर तर अतुल यांना अनेकांनी पु. ल देशपांडे समजून त्यांना हीच ओळख बहाल केली. यासोबतच अतुल परचुरे यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांमधून काम करत आपल्या सशक्त अभिनयाची बाजू सगळ्यांसमोर आणली. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकात अतुल यांनी ‘मुकुंदा’ हा काही प्रमाणात स्त्रियांसारखा वागणारा मुलगा अगदी हुबेहूब साकारला. यासोबतच ‘नातीगोती’ नाटकातला त्यांच्या ‘बच्चू’ या मतीमंद मुलाच्या भूमिकेने त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. यासोबतच अतुल यांनी ‘गेला माधव कुणीकडे’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वासूची सासू’, ‘डोळे मिटून उघड उघड’, ‘वाह गुरू’, ‘आम्ही आणि आमचे बाप’ आदी असंख्य नाटकांमध्ये काम कर वाहवाई मिळवली.
अतुल परचुरे यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील कामे केली. यात ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘गोलमाल’, ‘झकास’, ‘नारबाची वाडी’, ‘जाणीव’, ‘अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच त्यांनी ‘कलयुग’. ‘ऑल द बेस्ट : फन बिगिनर्स’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘क्या दिल ने कहा’, ‘स्टाईल’, ‘क्योंकी’, ‘गोलमाल’, ‘बिल्लू’ आदी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते.
अतुल यांची टीव्हीवरील ‘आर के लक्ष्मण की दुनिया’ ही मालिका चांगलीच गाजली होती. आर के लक्ष्मण यांच्या कल्पनेतील ‘कॉमन मॅन’ त्यांनी उत्तमपणे साकारला होता. शिवाय ‘यम है हम’, ‘बडी दूर से आये है’ अशा मालिकाही प्रचंड गाजल्या होत्या. कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्येही त्यांनी त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. मराठी मालिकांमध्ये त्यांनी ‘जागो मोहन प्यारे’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘माझा होशील ना’ आदी हिट मालिकांमध्ये काम केले होते.
लवकरच अतुल परचुरे ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले होते. काही दिवसांपूर्वीच या नाटकाची घोषणा कऱण्यात आली होती आणि सध्या या नाटकाचा सराव चालू होता. याच दरम्यान अतुल यांना अस्वस्थ वाटू लागले होते म्हणून त्यांना पुन्हा उपचारस्ताही रुग्णालयात भरती केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अतुल यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे, फॅशन डिझायनर असलेली मुलगी सखी आणि त्यांची आई आहे.कॅन्सरवर यशस्वी मात केल्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवल्याने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. अशा या अष्टपैलू आणि बहुआयामी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.