बांगलादेशातील एक हिंदू शक्तिपिठ असलेल्या जशोरेश्वरी मंदिरातील काली मातेच्या डोक्यावरील मुकुट चोरीला गेला आहे. नवरात्र चालू असतांना हा सोन्याचां मुकुट चोरीला गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रसिद्ध मंदिरातून चोरीला गेलेला हा माँ कालीचा मुकुट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिला होता. गेल्या काही महिन्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये सर्वाधिक हानी हिंदू समाजाची झाली आहे. पिढिजात घरांना दंगेखोरांनी आगी लावल्या. हिंदूना सरकारी नोकरी सोडण्यासाठी दबाब आणला. (Kali Mata Devi)
आता या सर्वात भयानक म्हणजे, शक्तिपीठ आणि तमाम हिंदू धर्मियांसाठी वंदनीय असलेल्या जशोरेश्वरी मंदिरातील काली मातेच्या मुकुटाची चोरी झाली आहे. सध्या बांगलादेशमध्ये कडेकोट बंदोबस्तात दुर्गापूजा करण्याची वेळ आली आहे. तरीही येथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात धमक्या येत आहेत. त्यातच आता ही मुकुट चोरीची घटना झाली आहे. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये हिंदू समाजच नाही तर त्यांची घरे आणि मंदिरेही सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे. हा मुकुट केवळ धार्मिक प्रतीकच नव्हता तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचेही प्रतीक होता. (International News)
या घटनेचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच सर्व तपास यंत्रणांनी या चोरीचा तपास करावा आणि देवीची मुकुट पुन्हा परत मिळवावा अशी मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशच्या सातखीरा जिल्ह्यातील श्यामनगर येथील जशोरेश्वरी मंदिर जगभरातील हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाचे आहे. देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. या मंदिरातील काली मातेच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवामध्ये मोठी गर्दी होते. भारतातूनही अनेक भक्त कालीमातेच्या दर्शनासाठी जातात. मात्र बांगलादेशमधील सध्याची अस्थिर परिस्थिती पहाता यावेळी देवीच्या दर्शनासाठी कमी गर्दी आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांनी देवीचा सोन्याचा मुकुटच चोरला आहे. (Kali Mata Devi)
या मंदिराची पिढ्यानपिढ्या देखभाल करणाऱ्या कुटुंबातील सदस्य ज्योती चट्टोपाध्याय यांनी मुकुट चांदीचा आणि सोन्याने मढवलेला असल्याचे सांगितले. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान मंदिरातून मुकुट चोरीला गेला. त्यावेळी मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी दिवसभराची पूजा आटोपून निघून गेले होते. नंतर आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली ही चोरीची घटना त्यांनी लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची घटना नोंदवली. या मंदिरात सीसीटिव्ही असून यात चोर देवीच्या डोक्यावरील मुकुट काढून शांतपणे बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. ही घटना समजल्यावर बांगलादेशमधली हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 मार्च 2021 रोजी बांगलादेश दौऱ्यात जशोरेश्वरी मंदिराला भेट दिली. त्या दिवशी त्यांनी देवीला हा मुकुट अर्पण केला होता. त्यामुळे हा मुकुट सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. जशोरेश्वरी मंदिर हे देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. ‘जशोरेश्वरी’ या नावाचा अर्थ ‘जशोरची देवी’ असा होतो. (International News)
======
हे देखील वाचा : देवी छिन्नमस्ता मुंडकं छाटुन भागवली मैत्रीणिंची भूक !
======
जशोरेश्वरी मंदिर देवी कालीला समर्पित आहे. 12 व्या शतकात अनारी नावाच्या ब्राह्मणाने हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. त्यांनी या जशोरेश्वरी माता मंदिरात 100 दरवाजे उभारले. पुढे 13 व्या शतकात लक्ष्मण सेन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 16 व्या शतकात राजा प्रतापादित्याने हे प्रसिद्ध मंदिर पुन्हा बांधले. त्यामुळे जशोरेश्वरी मंदिर भव्य दिव्य असे आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, येथे देवी सतीच्या पायाचे तळवे पडले होते, येथे माता देवी जशोरेश्वरीच्या रूपात येथे वास्तव्य करते अशी भाविकांची धारणा आहे. अशा पवित्र मंदिरातून मुकुटाची चोरी झाल्यामुळे हिंदू समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी याबाबत चिंता व्यक्त करुन मुकुट परत मिळवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बांगलादेशात देवीच्या मुकुटाच्या चोरीचे हे प्रकरण अशा वेळी घडले आहे जेव्हा देशातील धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समजावर हल्ले झाले आहेत. याप्रकरणी तेथील पोलीस यंत्रणा आणि सरकारी प्रशासन शांत आहेत. (Kali Mata Devi)
सई बने