सध्या शारदीय नवरात्र सुरु आहे. या शारदीय नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी एका देवीच्या रूपाची पूजा केली जाते. जसा प्रत्येक दिवस देवीच्या एका रुपाला समर्पित असतो, तसेच त्या त्या दिवसाचे देखील एक वेगळे महत्व देखील असते. नवरात्रीमध्ये अष्टमी या तिथीला मोठे महत्व आहे. नवरात्र बसल्यानंतर सामान्यपणे आठव्या दिवशी जी तिथी येते ती अष्टमी असते. या अष्टमी तिथीला साजरे करण्याची प्रत्येकाची आपली एक पद्धत असते. चला जाणून घेऊया अष्टमीची माहिती आणि अष्टमी साजरी करण्याचे कारण.
यावर्षी, अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी, ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी साजरे करण्यात येणार आहे. अष्टमी तिथी १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२:३१ वाजता सुरू होईल आणि ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२:०६ वाजता समाप्त होईल. तर महानवमी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२:०६ वाजता सुरू होईल आणि १० वाजता समाप्त होईल. त्यामुळे उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथिनुसार अष्टमी ११ ऑक्टोबर रोजी साजरी होईल.
यंदा सप्तमी आणि अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच १० ऑक्टोबरला असून शास्त्रानुसार सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी व्रत करणे शुभ मानले जात नाहीय. अशा परिस्थितीत महाअष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबरला साजरी करायची आहे.
नवरात्रीचा आठवा दिवस हा महाअष्टमी म्हणून ओळखला जातो. या तिथीला विशेष महत्त्व असून ११ ऑक्टोबरला साजरा होणार आहे अष्टमीला माता गौरीची यथासांग पूजा केल्याने निपुत्रिक जोडप्यांना निरोगी आणि पुण्यवान संततीची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. याशिवाय अष्टमीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी टिकून राहते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्या पूजा केल्याने देवी मातेची विशेष कृपा होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भक्तांचा विश्वास आहे.
या अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाला अनन्यसाधारण महत्व असते. या जगात प्रत्येक स्त्रीमध्ये शक्तीचा अंश असतो. नवरात्रीमध्ये २ वर्षांपासून ते १० वर्षापर्यंतच्या लहान मुलींचे अष्टमीला पूजन केले जाते. या वयातील मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका देखील म्हटले जाते. कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा असते.
या दिवशी घरात ११ किंवा किमान एका तरी कुमारिकेचे पूजन केले पाहिजे असे सांगितले जाते. या कुमारिकांचे पाय धुवून त्यांच्या पायाला हळद कुंकू लावले जाते. त्यानंतर त्यांना गुलाबाचे फुल देऊन काहीतरी भेट देखील दिली जाते. सोबतच त्यांना काहीतरी दक्षिणा देखील दिली जाते. शिवाय त्यांना दूध, केळी खाण्यासाठी देतात. शक्य असेल तर या कुमारिकांना जेऊ देखील घातले जाते. २ ते १० वर्षांच्या मुलींमध्ये देवीची देखील विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात.
दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.
तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.
सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
=======
हे देखील वाचा : बंगाली दुर्गा पूजेची माहिती
=======
यासोबतच अष्टमी तिथीला अनेक ठिकाणी उपवास देखील केला जाते. सोबतच देवीच्या मंदिराभोवती एका तांब्यात पाणी हळद आणि एका तांब्यात पाणी कुंकू मिक्स केले जाते. या हळदीकुंकुवाच्या पाण्याचा सडा देखील मारला जाते. सोबतच या दिवशी घरी सवाष्णींना बोलावून त्यांची ओटी भरली जाते.