मराठी सिनेविश्वाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी चित्रपटांचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा हे नाव सर्वात वर आणि सुवर्ण अक्षरात असेल. या नावाशिवाय मराठी मनोरंजनविश्व नेहमी अपूर्णच आहे. विनोदी सिनेमांना एक नवीन ओळख, नवीन उंची देण्याचे महत्वाचे काम लक्ष्मीकांत अर्थात आपल्या लक्ष्याने केले. आज त्यांना जाऊन अनेक वर्ष झाली असली तरी या क्षेत्रात त्यांचे नाव आणि त्यांचं विषय निघत नाही असे कधीच होत नसेल.
विनोदी चित्रपट, नाटकं, मालिका अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये अतिशय लीलया वावरणाऱ्या या लक्ष्याने प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील त्यांनी बरीच कामे केली. इंडस्ट्रीमध्ये त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहे. यारों का यार असा नावलौकिक त्यांनी कमावला होता. प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी लक्ष्या नेहमीच उभा असायचा. मात्र त्यांचे व्यावसायिक आयुष्य जेवढे गाजले हिट झाले तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले.
खूप कमी लोकांना माहित असेल की, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन लग्न केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते रुही बेर्डे. लक्ष्मीकांत यांनी अतिशय मेहनत आणि कष्टाने यश मिळवले होते. त्यांनी या क्षेत्रात खूपच संघर्ष केला आणि यश मिळवले. त्यांच्या या प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पहिल्या पत्नीची अर्थात रुही बेर्डे यांची. रुही यांच्याबद्दल देखील अनेकांना माहित नसेल चला जाणून घेऊया याच्याबद्दल अधिक माहिती.
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी रुही बेर्डे या देखील मनोरंजनविश्वातील उत्तम, प्रतिभावान आणि अतिशय सुंदर अभिनेत्री होत्या. रुही यांनी ना केवळ मराठी तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. रुही बेर्डे यांचे खरे नाव पद्मा होते. मात्र त्यांनी त्यांचे पडद्यावरील नाव रुही असे केले होते. रुही या मूळच्या मुंबईच्याच होत्या. रुही यांनी त्यांच्या करियरची सुरुवात हिंदी चित्रपटांपासून केली. ‘आ गले लग जा’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
रुही यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून झाली होती. ‘डार्लिंग डार्लिंग’ हे त्यांचे नाटक फारच लोकप्रिय झाले. या नाटकामुळे आणि या नाटकातील त्यांच्या भूमिकेमुळे रुही यांना मोठी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. १९७३ साली ‘जावई विकत घेणे आहे’ या चित्रपटातुन त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये पाऊल टाकले. दादा कोंडके यांच्या अतिशय गाजलेल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते. रुही यांनी अनेक उत्तम कामं केली आणि यश मिळवले. त्या मराठीमध्ये लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारूपाला आल्या होत्या.
रुही आणि लक्ष्मीकांत यांची पहिली भेट ‘वेडी माणसं’ या नाटकाच्या वेळेला झाली. मात्र दुर्दैवाने हे नाटक जास्त चालले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ते दुसऱ्या नवीन ‘कश्यात काय लफड्यात पाय’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले. याच नाटकाच्या वेळेला ते एकत्र काम करत असताना प्रेमात पडले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना ज्या नाटकाने प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली त्या ‘शांतेच कार्ट चालू आहे’ या नाटकात देखील रुही आणि लक्ष्मीकांत या दोघांनी एकत्र काम केले होते.
१९८३ साली रुही आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केले. रुही या खऱ्या अर्थाने लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यात लक्ष्मी बनून आल्या. कारण लग्नानंतर लक्ष्मीकांत यांच्या करियरने मोठा वेग धरला. ते एकापाठोपाठ एक काम करत होते आणि त्या सर्वात मोठे यश मिळवत होते. मोठ्या आणि लोकप्रिय अभिनेत्री असूनही रुही यांनी लग्नानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करिअरला गती मिळताना पाहून अभिनयातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. लोकप्रिय अभिनेत्री असल्याने रुही यांना सतत नवनवीन ऑफर येत होत्या. मात्र त्यांनी नवऱ्यासाठी घर आणि संसारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
=======
हे देखील वाचा : कामाख्या देवीशी संबंधित रोचक गोष्टी
========
सर्व काही सुरळीत चालू होते. लक्ष्मीकांत सुपरस्टार झाले होते. घर, संसार आणि करियर उत्तम चालू असताना लग्नानंतर १५ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात एक वादळ आले आणि एक दिवस रुही बेर्डे अंधेरीहून गाडीत प्रवास करत असताना अचानक ब्रेन हॅमरेज झाले. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र काही दिवसाच्या उपचारानंतर ५ एप्रिल १९९८ रोजी रुही यांचे दुर्दैवी निधन झाले. रुही यांचा जाण्याचा लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठा धक्का बसला.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण लेखिका वसुंधरा साबळे यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले होते की, “रूही खरंच लक्ष्मीकांत यांच्या लक्ष्मी होत्या. त्यांच्या पायगुणाने लक्ष्या प्रसिद्धीच्या आणि ऐश्वर्याच्या उंच शिखरावर पोहचले होते. रुही यांच्या जाण्याने लक्ष्मीकांत एकदम खचून गेले. त्या गेल्यानंतर ते बरेच दिवस मित्रांशी देखील बोलत नव्हते. रुही गेल्यानंतर स्मशानभूमीत त्यांना मुखाग्नी देताना लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या अंगावरचा एकही अलंकार काढला नव्हता. ते रुही यांच्या पार्थिवासमोर निशब्द उभे होते.”