Home » मुंब्रा देवीचा इतिहास

मुंब्रा देवीचा इतिहास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mumbra Devi Temple
Share

आज नवरात्राची पाचवी माळ. देवी स्कंदमातेची आज पूजा करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची अनेक जागरूक देवस्थाने आहेत. ज्यांची माहिती त्या त्या भागात राहणाऱ्या लोकांनाच असेल. मात्र या नवरात्राच्या निमित्ताने आपण त्या देवस्थानांबद्दल जाणून घेत आहोत. आज आपण माहित करून घेणार आहोत ठाण्याजवळ असलेल्या मुंब्रा देवीबद्दल.

लोकलने कल्याणच्या दिशेने जाताना ठाण्यानंतर दुसरे स्टेशन लागते ते मुंब्रा. स्टेशनवरून किंवा अगदी लोकलमधून देखील पूर्वेच्या बाजूला मोठंमोठे डोंगर दिसतात आणि याच डोंगरांमध्ये वास्तव करते मुंब्रा देवी. मुंब्रा स्थानकातून पूर्वेला बाहेर पडले की या मुंब्रा देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुरु होतो. या स्थानकाबाहेरील जुना पुणे-मुंबई महामार्ग ओलांडला की एक छोटी गल्ली या डोंगराच्या दिशेने जाते. या गल्लीतून थोडे पुढे गेल्यानंतर डोंगरावर जाण्यासाठी अर्थात डोंगरावरील मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात.

मुंब्रा देवीचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला तब्बल ७५० पायऱ्या चढून वर जावे लागते. हा पायऱ्यांच्या चढणीचा खडतर प्रवास केल्यानंतर आपण वर पोहचतो. मंदिर प्रवेशद्वाराच्या काही पायऱ्या चढल्यानंतर सर्वात आधी मारुती मंदिर लागते आणि त्यानंतर साती आसरा देवीचे मंदिर दृष्टीस पडते. आधी या मंदिरात दर्शन करूनच भाविक पुढे देवीच्या दर्शनासाठी जातात.

Mumbra Devi Temple

मंदिरात जाण्यासाठी जेव्हा तुम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात करतात तेव्हा आजूबाजूला अतिशय सुंदर आणि विहंगमय दृश्य दिसू लागतात. मुंब्रा खाडीचा किनारा आणि संपूर्ण मुंब्रा, दिवा, डोंबिवली शहराचा परिसर, मध्य रेल्वेचे मार्ग अतिशय सहज दिसतात. हे सर्व दृश्य आपल्या फोनमध्ये कैद करण्यासाठी हात सहज फोनकडे जातात.

७५० पायऱ्या चढून वर आल्यानंतर ज्याच्यासाठी एवढी मोठी चढण केली त्या देवीला बघण्यासाठी नजर सैरभैर झालेली असते. थोडे चालल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा लागतो. या गाभाऱ्यात आल्यावर दर्शन होत ते आई मुंब्रा देवीचे. महाराष्ट्रातील हे पहिले असे मंदिर आहे ज्यात नऊ दुर्गांचे दर्शन एकाच मंदिरात एकसाथ होते. नवरात्री दरम्यान या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी अलोट गर्दी करत असतात.

=======

हे देखील वाचा : नवरात्रीची पाचवी माळ – स्कंदमाता पूजन

=======

मुंब्रा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. ठाण्याच्या जवळ असलेले हे ठिकाण मुंबईपासून ४० कि.मी. अंतरावर आहे. मुंब्रा खाडी असल्याने मोगल काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसवलेल्या या गावात सतराव्या शतकात जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस आला. आगरी – कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नावावरूनच या गावाचे नाव मुंब्रा ठेवण्यात आले.

एका पौराणिक कथेनुसार, शेकडो वर्षांपूर्वी स्थानिक लोकांनी मुंब्रा देवीच्या टेकडीवर जळणारी ज्वाला पाहिली. त्यानंतर, नाना भगतांसह अनेक लोक जमले आणि ते टेकडीवर गेले. त्यांना तिथे एक दिवा जळताना दिसला, आणि मुंब्रा देवीची मूर्ती दिसली. त्या मूर्तीची देखभाल भगत कुटुंबाने केली आहे. मुंब्रा देवीच्या मंदिराचे बांधकाम मुंब्रा येथील भगत कुटुंबाने केले असून ते आजही याच ठिकाणी राहतात. १७ व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे आगरी – कोळीचे एक लहान गाव होते. नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आणि लोकांनी मुंबईच्या जवळ त्यांच्या नवनवीन वसाहती तयार केल्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.