Home » नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीची ओटी भरली !

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीची ओटी भरली !

by Team Gajawaja
0 comment
Marathi Bhasha
Share

ज्या भाषेला ज्ञानेश्वरांनी अमृतापेक्षा श्रेष्ठ मानलं, ज्या भाषेत तुकारामांनी “तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्देंचि गौरव पूजा करूं” हे लिहिलं. ज्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यव्यवहार कोष तयार करून घेतला. ज्या भाषेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जगभरातील मराठी भाषिकांची मागणी होती. केंद्र सरकारने ही मागणी अखेर पूर्ण केली आहे. पण हा दर्जा मिळाल्यावर आपली मराठी अभिजातच आहे, असा एक टीकेचा सुर ऐकू येतो आहे. त्यामुळे अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? एखादी भाषा अभिजात आहे हे कशावरून ठरवलं जातं? आणि त्याचे फायदे काय आहे? या प्रश्नांची उत्तरं सोबत मराठी भाषेचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊया. (Marathi Bhasha)

अभिजात भाषा म्हणजे काय? तर ज्या भाषेला दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. ज्या भाषेला स्वतःची स्वतंत्र आणि प्राचीन काळापासून चालत आलेली साहित्य परंपरा आहे. ज्या भाषेला एक स्वतंत्र प्रवास असेल आणि तिचे पूर्वीचे स्वरूप आजच्या भाषेपेक्षा निराळे असेल. त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. म्हणजेच अभिजात भाषा म्हणजे एखाद्या भाषेची अभिजातता शासकीय स्तरावर नोंदवली जाणे. सोप्या शब्दांत सांगायचं तर आपली मराठी भाषा ही पूर्वीपासूनच अभिजात आहे, फक्त या अभिजाततेवर काल सरकार दरबारी शिक्कामोर्तब झालं. मराठी भाषिकांच्या या मागणीला ऐतिहासिक संशोधनाचा आधार मिळावा यासाठी २०१२ साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सखोल अभ्यास करून २०१३ साली आपला अहवाल सादर केला. हा अहवाल महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही आपली मागणी मांडली. (National News)

या अहवालानुसार मराठी भाषेचे वयोमान आज जवळ जवळ २५०० असल्याचं सांगण्यात येतं. प्राचीन महारट्ठी-मरहट्ठी-मऱ्हाटी अर्थात प्राकृत भाषा असा प्रवास करत ती आपल्या पर्यंत मराठी म्हणून पोहचली. या ३ भाषा वेगवेगळ्या नसून ती एकच भाषेची ३ कालसुसंगत रूपे आहेत. महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून मराठी भाषा वापरली जाते. लिळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ मराठीतील पहिले ग्रंथ समजले जातात. पण हे ग्रंथ मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे ग्रंथ आहेत. काही तज्ञांच्या मते श्रवणबेळगोळ येथील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख आहे. गोमटेश्वराच्या पायाखाली असणाऱ्या या शिलालेखात असणारे‘श्री चामुण्डेराये करविले’ हे वाक्य मराठीतील पहिले लिखित वाक्य समजले जाते. तर काही जणांच्या मते आक्षी येथील शिलालेख, पण २,२२० वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या काळात नाणेघाटात ब्राह्मी लिपीत एक शिलालेख लिहिला गेला होता, या शिलालेखात महाराष्ट्र वासियांना उद्देशून ‘महारठ्ठीनो‘ असा उल्लेख आढळतो. (Marathi Bhasha)

विवेकसिंधु हा मराठीतील पहिला ग्रंथ हा शके १११० मुकुंदराजांनी रचला, असं मानलं जातं. श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लिळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला पद्य चरित्रग्रंथ समजला जातो. परंतु हे दोन्ही ग्रंथ असोत किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, हे सर्व ग्रंथ मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे ग्रंथ असल्याचं अहवाल सांगतो. विनयपिटक, दिपवंश, महावंश या ग्रंथात महाराष्ट्राचे उल्लेख येतात. तसेच रामायण, महाभारत आणि बृहत्कथा या ग्रंथात अनेक मराठी शब्द येतात. वररूचीचे प्राकृतप्रकाश, हेमचंद्राची देशीनाममाला, शाकुंतल, मृच्छकटिक या ग्रंथातील अनेक पात्रांच्या तोंडी प्राचीन मराठीतील संवाद येतात. हाल सातवाहनाने लिहिलेल्या गाथा सप्तशती मध्ये श्रेष्ठ मराठी काव्य वाचायला मिळतं. असे अनेक संदर्भ आणि दस्तावेज या अहवालात सादर करण्यात आले आहेत. यातून आपली मराठी भाषा प्राचीन आहे, हे सिद्ध झालं. म्हणूनच आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. (National News)

भारतात अभिजात दर्जा मिळालेल्या सहा भाषा होत्या. तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि ओडिया. त्यात आता मराठी भाषेबरोबरच बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना सुद्धा अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे भारतातील अभिजात भाषांची संख्या आता ११ झाली आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी मराठी भाषेसाठी आर्थिक निधी पुरवला जाईल. तसंच प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. (Marathi Bhasha)

मराठी भाषेवर संशोधन करणाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर विशेष अनुदाने आणि शिष्यवृत्त्या देण्यात येतील. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ति, विद्यार्थी यांना त्यासाठी भरीव मदत मिळेल. मराठी भाषेच्या संशोधन, अभ्यास आणि विकासासाठी मराठी भाषेचे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल. तसेच प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषेचे एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाईल. तसेच मराठी भाषेचे भवन उभारले जाणार. (National News)

======

हे देखील वाचा :  महाराष्ट्रातल्या जागृत साडे शक्तिपीठांची माहिती

======

मराठी भाषेबद्दल बोलताना ही कोसा-कोसावर बोलताना बदलणारी भाषा आहे असं म्हटलं जातं. कोल्हापुरी, कोकणी, मालवणी, विदर्भी, अहिराणी, खानदेशी अशा अनेक बोलीभाषा आपल्या मराठीला लाभल्या आहेत. या बोलीभाषांचा अभ्यास, संशोधन आणि या भाषेतील साहित्यसंग्रह करण्यासाठी निधी मिळेल. मराठी भाषेतील विद्वानांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. आता हे सगळं ऐकल्यावर अभिजात भाषा मिळाल्यामुळे मराठी भाषेला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळाली आहे, हे आपल्या लक्षात आलंच असेल. त्यामुळेच सर्व मराठी भाषिक अभिमान आणि आनंद व्यक्त करत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जणू मायमराठीची ओटी भरली गेली, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मराठी भाषिकांनी मांडली. पण आता एक मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. रोजच्या जगण्यात प्रत्येक ठिकाणी मराठी भाषाच बोलूया, लिहूया, ऐकुया, मराठी भाषा जपुया, मराठी भाषा जगूया. (Marathi Bhasha)

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.