सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गणपती बाप्पांचीच चर्चा आहे. गणेशोत्सव म्हणजे सगळ्याच मराठी माणसांचा आवडता आणि मोठा सण आहे. गणेशोत्सव सगळीकडेच साजरा केला जात असला तरी त्याचे महाराष्ट्रातले स्वरूप आणि मजा काही औरच असते. वर्षभर सगळे या सणाची अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात. गणपती बाप्पा असतात त्या दहा दिवसात सर्वत्र जल्लोषाचे, आनंदाचे, भक्तिमय वातावरण असते. या दिवसांमध्ये सर्वच जणं विविध प्रसिद्ध आणि लोकप्रिय गणपती मंडळांना भेट देऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतात. मुंबईचा गणपती उत्सव हा जगात प्रसिद्ध आहे.
उंचच उंच मुर्त्या हे या शहरातील गणेशउत्सवाचे मुख्य आकर्षण असते. गणपती उत्सवाच्या काळात मुंबईत फिरायला येताना अनेकांना विविध गणेश मंडळांना भेट देऊन हे गणपती पाहायचे असतात. मात्र काही बोटावर मोजण्याइतके गणपती सोडले तर बाकी अजूनही अनेक मुंबईत गणेश मंडळं आहेत जे खूप मोठे आणि प्रसिद्ध आहेत. चला जाणून घेऊया मुंबईतील काही खास आणि प्रसिद्ध मोठ्या गणेश मंडळांबद्दल.
लालबागचा राजा
नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. गणेश उत्सवाच्या काळात येथे देश नव्हे तर जगभरातून दर्शनासाठी लाखो लोकं येतात. या लालबागच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते, त्याच ठिकाणी ती साकारली जाते. १९३१ रोजी पेरू चाळीतील बाजारपेठ बंद पडली होती, त्यावेळी तेथील स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाली तर गणपती बसवू, असा नवस केला आणि त्याप्रमाणे १९३४ साली लालबाग बाजारपेठेत गणपती बसविण्यास सुरुवात झाली.
मुंबईचा राजा
लालबागमधील गणेश गल्लीतील मुंबईचा राजा देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गणपती आहे. १९२८ साली गणेश गल्लीत लालबाग-परळमधील गिरणी कामगारांनी गणपती बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७७ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि गणेश गल्ली मंडळाने येथे २२ फूट उंचीची गणेशमूर्ती बसवली. तेव्हापासून दरवर्षी येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी ही गणेशमूर्ती ही मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून १९२० मध्ये पहिल्यांदा चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यानंतर आजतागायत हा गणपती न चुकता दरवर्षी बसवला जातो. हे मंडळ मुंबईतील जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे.
परळचा राजा
परळचा राजा हा मुंबईतील एक मानाचा गणपती आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी या गणपती मंडळाची स्थापना झाली. या गणेशमूर्तीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा नावाने सुद्धा ओळखले जाते.
जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल
माटुंगा येथील जीएसबीच्या गणेशमूर्तीला सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते. जीएसबी सेवा गणेश मंडळाचा हा गणपती मुंबईतील मानाचा गणपती आहे. १९५५ मध्ये कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. या गणेशमूर्तीला शुद्ध सोन्याची आभूषणे घातली जातात. गणपतीची ही मूर्ती साकारतानासुद्धा सोन्याचा वापर केला जातो.
केशवजी नाईक चाळ, गिरगाव
मुंबईतील सर्वांत जुन्या गणेश मंडळांपैकी एक म्हणजे केशवजी नाईक चाळीतील गणपती मंडळ. अत्यंत पारंपरिक आणि साधेपणाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या मंडळाच्या गणेशमूर्तीचे आगमन दरवर्षी पालखीतूनच होते आणि विसर्जनासाठीही पालखीच वापरली जाते. हे मंडळ पर्यावरणानुकूल उत्सव साजरा करतात. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी ही परंपरा राखली आहे.
तेजुकाया मेन्शन गणपती
१९४७ साली तेजुकाया मेन्शन गणपती मंडळाची स्थापना झाली या मंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जाते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीवर कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे अनेक जण गणरायाची ही मूर्ती पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात.
खेतवाडीचा राजा
खेतवाडीच्या राजा गणपतीची आरास ही फुलांनी केली जाते. फुल आणि आकर्षक रोषणाई हे या गणपती मंडळाचे वैशिट्य आहे.
अंधेरीचा राजा
मुंबईतील अंधेरीचा राजा हा देखील अतिशय प्रसिद्ध आणि मानाचा गणपती आहे. आकर्षक उंच गणेश मूर्ती आणि सुंदर सजावट हे या मंडळाच्या गणेशउत्सवाचे आकर्षण असते.