Home » जाणून घ्या सांगलीच्या ‘चोर’ गणपतीबद्दल

जाणून घ्या सांगलीच्या ‘चोर’ गणपतीबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chor Ganpati
Share

गणेशोत्सव आता अगदी परवावर येऊन ठेपला आहे. सगळ्यांची गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून आता नजर फक्त बाप्पाच्या आगमनाकडे टिकल्या आहेत. गणेश चतुर्थी म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो. संपूर्ण राज्यासोबतच देशात नव्हे तर जगात गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. आपण महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर या उत्सवाचे अतिशय विविध प्रकारचे स्वरूप आपल्याला दिसते.

प्रत्येक गावासोबत, शहरासोबतच या उत्सवाला एक वेगळेच महत्व आणि वेगळीच प्रथा, परंपरा पाहायला मिळते. बाप्पाच्या मूर्तीपासून ते नैवद्य, आरास, परंपरा आदी अनेक गोष्टींमध्ये वैविध्य असते. महाराष्ट्रात देखील एक असा गणपती आहे, जो गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधीच विराजमान होतो. हा गणपती वाजत गाजत नाही तर चोर पावलांनी येतो आणि भक्तांना आशीर्वाद देतो. नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल ना? असे कसे नाव चोर गणपती ? मात्र हो हा गणपती अतिशय जुना आणि जाज्वल्य देवस्थान मानले जाते.

महाराष्ट्रातील सांगली शहरात गणेश चतुर्थीच्या चार दिवसांआधीच चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. चोर गणपती बसवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहे. नुकतेच या सांगलीच्या मंदिरात चोर गणपती विराजमान झाला आहे. कोणालाही माहिती होऊ न देता या गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो. या चोर गणपतीला २०० वर्षांची परंपरा आहे. हा गणपती कोणालाही माहित न पडता त्याची स्थापना केली जाते. म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात.

Chor Ganpati

सांगलीचे आराध्य दैवत म्हणून या गणपतीला ओळखले जाते. या चोर गणपती केवळ हिंदूच नाही तर सर्वच धर्मातील लोकांचे आराध्य दैवत आहे. चोर गणपती बसवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजतागायत सुरु आहे. हा गणपती सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानाच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. सांगली नगरीचे आराध्यदेवत असणा-या श्री गणपती मंदिरातील पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असतो.

लाखो भाविकांच्या उपस्थित साजरा होणा-या या गणेशोत्सवास अनेक दशकांची परंपरा आहे. 1844 पासून सुरू झालेला संस्थान गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यात येतो. ‘चोर गणपती’ गणपती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण. सांगलीतील चोर गणपतीची मूर्ती ही कागदाच्या लगदयापासून बनवली जाते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते. दरवर्षी रंगरगोटीशिवाय मूर्तीना हात लावला जात नाही. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात.

======

हे देखील वाचा : हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा

======

या चोर गणपती सोबतच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची देखील येथे स्थापना केली जाते. या ठिकाणी हा पाच दिवसाचा आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने “चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावेळी साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते .

यंदा देखील हा चोर गणपती मोठ्या भक्ती भावाने बसवला गेला आहे. यावर्षी चोर गणपतीच्या मंदिराबाहेर प्रसिद्ध अशा तिरुपती मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. असंख्य भाविक या काळात मंदिराला भेट देत देवाचे दर्शन घेतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.