वर्षभर आपण ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतो, तो सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणोशोत्सव आपल्या सगळ्यांचाच, लहानांपासून मोठ्यांचा लाडका सण. ७ सप्टेंबरला सगळ्यांच्याच घरात, विविध मंडळांमध्ये बाप्पाची मनोभावे स्थापना करण्यात येणार आहे. सगळीच कडे सध्या याचीच लगबग पाहायला मिळत आहे.
घरातील साफसफाई पासून, खरेदी, बाप्पाची आरास, बाप्पाच्या मूर्तीची खरेदी, प्रसाद आदी सर्वच गोष्टींवर चर्चा होत त्यावर काम चालू आहे. तसे पाहिले तर आजकाल बाजारामध्ये अतिशय वैविध्यपूर्ण गणेश मूर्ती पाहायला मिळत आहे. अगदी बालगणेश पासून, खंडोबा, शंकर, कृष्ण आदी विविध अवतारातील गणेश मूर्ती उपलब्ध आहे. सोबतच विविध फुलांमधील गणेश मूर्ती, विविध रंगांमधील मूर्ती, विविध प्राण्यांवर बसलेल्या मूर्ती देखील आपले लक्ष वेधून घेताना दिसतात.
मात्र तुम्हाला माहित आहे का? आपण आपल्या आवडीने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या, उंचीच्या, रूपातल्या गणेश मूर्ती घरी आणतो आणि स्थापित करतो. मात्र घरी कोणती मूर्ती आणावी? कोणत्या रंगाची?, किती उंचीची? आदी अनेक गोष्टींबद्दल देखील काही नियम पाहायला मिळतात. आपल्या घराच्या चला तर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
गणेश मूर्ती घरी आणताना काय करावे
1. गणेशाची मूर्ती माती किंवा वाळूने तयार केलेलीच स्थापित केली पाहिजे. कारण मान्यतेनुसार माता पार्वतीने गणेशाची मूर्ती त्यापासूनच तयार केली होती. याशिवाय सोने, चांदी, तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करु शकता.
2. गणपतीची मूर्ती आणताना मूर्तीसोबत त्यांचे प्रिय वाहन मूषक आहे की नाही ते नक्की तपासा. मूषक नसलेली मूर्ती स्थापित करू नये.
3. गणेशाची अशी मूर्ती एकदंत रूपातील असावी. अर्थात तुम्हाला आवडलेल्या मूर्तीचा एक दात तुटलेला असावा.
4. गणेश मूर्तीला चार हात असावेत. चारही हातात अनुक्रमे पाश, अंकुश, मोदक आणि वरमुद्रा स्वरूपातील असावे.
5. गणेश रक्तवर्ण, लंबोदर, शूर्पकर्ण आणि पीतवस्त्रधारी आहे. त्यामुळे गणेश मूर्तीचे पितांबर, सोवळे किंवा वस्त्र हे लाल किंवा पिवळ्या रंगामध्ये असले तर शुभ समजले जातात.
6. गणेशाची मूर्ती डावीकडे सोंड वळलेली बसवण्याची प्रथा आहे. कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे नियम, सोवळे आणि इतरही अनेक बाबी खूपच वेगळ्या आणि कडक असल्याचे सांगितले जाते.
7. गणेश मूर्ती घेताना मूर्तीला जानवे घातलेले असेल तर उत्तम मात्र नसेल तर पूजेच्या वेळी तुम्ही मूर्तीला जानवे घालावे.
8. घरामध्ये मूर्ती आणताना ती पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली अशी गणेशाची मूर्ती आणावी.
9. गणेशाच्या मूर्तीचा रंग निवडताना पांढरा, सोनेरी, शेंदुरी किंवा हिरवा निवडला तर तो अधिकच शुभ मानला जातो.
10. परंपरेनुसार गणेशाची मूर्ती घेताना मूर्तीचे मस्तक एकतर मुकुट, टोपी किंवा पगडी आदी गोष्टींनी झाकलेले असावे.
11. गणेशाची मूर्ती घेताना मूर्तीच्या कपाळावर टिळा असावा. हा टिळा केशर किंवा चंदनाचा त्रिपुंड तिलक असावा.
12. गणेशाची मूर्ती घेताना ती भंगलेली, रंग उडालेली नाही ना याची खातरजमा करून घ्या. शिवाय घरी प्राणप्रतिष्ठा करताना देखील पुन्हा एकदा पडताळून घ्या. कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही.
13. गणेशाची मूर्ती निवडताना गणपती त्याचे आई बाबा असलेल्या शिव-पार्वतीसोबत बसलेल्या रूपातली निवडू नका. अशी मूर्ती निषिद्ध मानली जाते.
14. संतान प्राप्तीसाठी इकचुक असाल तर घरात गणपतीच्या बालस्वरूपाची प्रतिष्ठापना करावी. बालगणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील.
15. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व प्रकारचे वास्तू दोष दूर करणारी मानली जाते. वास्तूनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती समोर आणि उजवीकडे ठेवल्याने घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी नांदते.
======
हे देखील वाचा : पिठोरी अमावस्या व्रत, पूजा विधी आणि कथा
======
16. घरात गणेशाची स्थापना करताना गणेशाच्या मूर्तीची उंची एक ते दीड फुटांपेक्षा जास्त नसावी.
गणेशाची मूर्ती घरी कशी आणावी
श्रीगणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे. गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे. गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती घरी आणावा. कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत. श्रीगणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी.