मध्य प्रदेश राज्यातील खजुराहो हे वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या खजुराहोमध्ये ८५ मंदिरे असल्याचा पुरावा आहे. मात्र यातील बहुतांश मंदिरे ही नष्ट करण्यात आली. आज या भागात केवळ २५ मंदिरे शिल्लक आहेत. यापैकी मातंगेश्वर महादेव मंदिर हे एक आहे. मातंगेश्वर मंदिराला मृत्युंजय महादेव मंदिर असेही म्हटले जाते. अतिशय गुढ असलेल्या या मंदिरात हजारो शिवभक्त भगवान शंकराची आराधना करण्यासाठी येतात. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी एक म्हणजे, दर वर्षी शरद पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात असलेल्या शिवलिंगाची लांबी एक इंचाने वाढते, असे मानले जाते. सध्या हे शिवलिंग ९ फूट उंचीचे आहे. दरवर्षी त्याची उंची एका तिळानं वाढत आहे. त्यामुळेही या शिवलिंगाला मृत्युंजय महादेव म्हटले जाते. (Matangeshwar temple)
मध्यप्रदेशच्या सतनायेथील खजुराहोमध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यातील मातंगेश्वर महादेव मंदिर हे धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही दृष्टीकोनातून खूप महत्वाचे मानले जाते. खजुराहोच्या लक्ष्मण मंदिराजवळ मातंगेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा आकार ३५ फूट चौरस आहे. मंदिराचे गर्भगृह चौकोनी असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे शिखर बहुमजली आहे. या मंदिराचे बांधकाम इसवी सन ९५०-१००२ च्या दरम्यानचे झाले आहे. चंदेला शासक हर्षदेव यांच्या कार्यकालात हे मंदिर बांधले गेले. काळ्या दगडामधील हे मंदिर अतिशय साधे असले तरी त्याची भव्यता ही गुढ वाटणारी आहे. या मृत्युंजय महादेव मंदिरातील सर्वात मोठे आकर्षण हे तेथील शिवलिंग आहे. या मंदिराच्या गर्भगृहात ९ फूट उंच आणि ३ फूट ८ इंच परिघाचे विशाल शिवलिंग आहे. हेच शिवलिंग ठराविक अंतरानं वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मंदिरात शतकानुशतके अखंड पूजा केली जात आहे. (Matangeshwar temple)
या मंदिराची बांधणी ही मिश्र पद्धतीची आहे. मंदिराचे छत बहुमजली आणि पिरॅमिडच्या आकाराचे आहे. मंदिराचा घुमट आतून गोलाकार आहे, ही मंदिराची स्थापत्यकला वैशिष्ट्यपूर्ण असून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक मंदिरात येतात. या मंदिराबाबत असलेली मोठी आख्यायिका म्हणजे, या मंदिरातील शिवलिंगाच्या खाली असलेले रत्न. मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या खाली एक रत्न असल्याचे सांगण्यात येते. प्राचीन कथांनुसार, भगवान शंकराने पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर यांना पन्ना हे रत्न दिले. युधिष्ठिराने हे रत्न, मातंग ऋषींना अर्पण केले आणि नंतर मातंग ऋषींनी हे रत्न राजा हर्षवर्धनला दिले. मातंग ऋषींनी हे रत्न भगवान शंकराच्या शिवलिंगाखाली संरक्षणासाठी स्थापित केले. त्यामुळे या मंदिराला मातंगेश्वर असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. या रत्नामुळे शिवलिंगाचा महिमा अधिक वाढला. (Matangeshwar temple)
या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही सांगितले जाते. मातंगेश्वर मंदिराच्या शिवलिंगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सतत वाढत जाणारी उंची. दरवर्षी या शिवलिंगाची उंची वाढत जाते. याचे रहस्य आजतागायत कोणालाच समजलेले नाही. शिवाय हे शिवलिंग पृथ्वीच्या वर दिसते त्यापेक्षा जास्त पृथ्वीखाली स्थापित असल्याचे मंदिराचे पुजारी सांगतात. दर वर्षी शरद पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात असलेल्या या शिवलिंगाची लांबी वाढते असे मानले जाते. येथील अधिकारी या शिवलिंगाची दरवर्षी वाढणारी उंची मोजून त्याबद्दल लेखी नोंद ठेवतात. कार्तिक महिन्यातील शरद पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाची लांबी तीळाएवढी वाढलेली असते. हा सोहळा बघण्यासाठी या मंदिरात हजारो शिवभक्तांची गर्दी होते. श्रावण महिन्यातील सोमवारीही या मंदिरात भक्तांची मांदियाळी जमते. महाशिवरात्रीला येथे आठवडाभर उत्सव साजरा करण्यात येतो. (Matangeshwar temple)
======
हे देखील वाचा : दहीहंडी सणाची संपूर्ण माहिती
======
मातंगेश्वर महादेव मंदिर हे खजुराहोमधील सर्वात उंच मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराच्या कुठल्याही भिंतीवर अन्य मंदिरांप्रमाणे आकृती नाहीत. चंदेल राजांनी पूजा आणि ध्यानधारणेसाठी हे मंदिर बांधल्याची माहिती आहे. या मंदिरावर छतही असून त्याची उंची इतकी उंच आहे की अधिष्ठानापर्यंत जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिराच्या परिसरात अन्यही देवीदेवतांच्या मुर्ती आहेत. मृत्युंजय महादेव मंदिराच्या शिवपिंडीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांनी केला आहे. आत्ताही अनेक संशोधक मंदिर परिसरात येतात, आणि मंदिर उभारलेल्या दगडांचे परिक्षण करतात. मात्र शिवपिंडीच्या वाढणा-या उंचीचे रहस्य त्यांना सोडवता आलेले नाही. (Matangeshwar temple)
सई बने