सध्या सगळीकडे मराठी बिग बॉसची चांगलीच हवा आहे. हा शो सुरु होऊन आता केवळ २ आठवडे झाले आहे. मात्र सगळीकडे फक्त बिग बॉस मराठीच्याच चर्चा रंगलेल्या दिसत आहे. या शोमध्ये होणारी भांडणं, टास्क आदी सर्वच गोष्टी सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे हा शो रोजच अधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. अशातच आता हिंदी बिग बॉसच्या बातम्या देखील येण्यास सुरुवात झाली आहे.
लवकरच बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व सुरु होणार आहे. याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर येताना दिसत आहे. या शोसाठी अनेक कलाकारांची नावे समोर देखील येत आहे. मात्र अजूनही कोणतेही नाव अधिकृत रित्या जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र आता मीडियामध्ये अनेक नावं समोर येताना दिसत आहे. यात हिंदी टीव्ही जगतातील स्टार अभिनेता अर्जुन बिजलानी, कशिश सिंग. दिग्विजय सिंग राठी आदी कलाकारांची नावे समोर आली आहेत.
मात्र या नावांमध्ये एक नाव असे आहेत, ज्या नावामुळे मराठी मनोरंजनविश्वात आणि मीडियामध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे. हे नाव आहे अभिनेत्री रुपाली भोसलेचे. आई कुठे काय करते? या मालिकेत मुख्य खलनायिका रंगवणारी रुपाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. मागील जवळपास तीन वर्षांपासून रुपाली ‘संजना’ ही भूमिका निभावून अमाप लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली. आता मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार रुपालीला हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाली असल्याचे समजत आहे.
मात्र अद्याप रुपालीकडून किंवा बिग बॉसच्या निर्मात्यांकडून, चॅनेलकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. जर रुपाली या शोमध्ये खरंच गेली तर नक्कीच त्याचा तिच्या चाहत्यांना आनंद होणार आहे. याआधी रुपालीने मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वामध्ये हजेरी लावली होती. या पर्वामध्ये तिने तिच्या खेळाने आणि तिच्या वागण्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
=======
हे देखील वाचा : अंकिता वालावलकरचा प्रेरणादायी प्रवास
=======
दरम्यान रुपालीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने २००६ साली ‘महासंग्राम’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘वहिनीसाहेब’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘शेजारी शेजारी’ आदी अनेक मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी नाही तर तिने हिंदीमध्ये देखील बरेच काम केले आहे.
रुपालीने सोनी सब चॅनेलवरील ‘बडी दूर से आये हैं’ या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्याव्यतिरिक्त तिने ‘कसमे वादे’, ‘तेनालीरामा’ या मालिकांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय २००७ साली तिने ‘रिस्क’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. २०१८ साली झी 5 च्या ‘झिरो केएम’ या वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. यासगळ्यांमध्ये तिला सर्वात जास्त लोकप्रियता मिळवून दिली ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने.
