सुमारे वीस वर्षांपूर्वी बोरिवली ते ठाणे हा प्रवास रात्री एसटी बसने करत होतो. घोडबंदर रस्त्यावर मध्येच चालकाने करकचून ब्रेक दाबून बस अचानक थांबवली. काय झाले म्हणून पहिले तो बसच्या पुढ्यात एक भलामोठा वाघ रस्त्यावर आडवा पडलेला होता. कोणाचीही जवळ जायची हिंमत होत नव्हती.
अखेर बराच वेळ गेल्यावर सुद्धा वाघाने काहीच हालचाल न केल्याने तो मृत झाला असावा असे समजून चालकाने रस्त्याच्या बाजूबाजूने गाडी पुढे काढली आणि पुढचा प्रवास पार पडला. आज इतके वर्षांनी या घटनेची आठवण होण्याचे कारण म्हणजे टी २० विश्वचषक स्पर्धेतील ‘वेस्ट इंडिज’ (West Indies cricket team) नामक एके काळच्या क्रिकेट विश्वामधील वाघांची कामगिरी.
वेस्ट इंडिज संघ या वर्षीच्या स्पर्धेत उतरला तो यापूर्वीच्या २०१६च्या स्पर्धेतील ‘चॅम्पियन’ म्हणून. तोच संघ स्पर्धा संपताना आईसीसी क्रमवारीनुसार दहाव्या क्रमांकावर फेकला जाऊन त्याला २०२२ च्या विश्वकप स्पर्धेत पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची ही दुरावस्था केवळ टी २० पुरती मर्यादित नाही तर एक दिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही हा संघ रसातळाला पोहोचला आहे.
फ्रँक वॉरेल, एव्हर्टन विक्स, गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, वेल्सली हॉल, लान्स गिब्स, कलाईव्ह लॉईड, विवियन रिचर्ड्स, रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर, मार्शल, अँब्रोस, वॉल्श, ब्रायन लारा इत्यादी महारथी खेळाडूंची नुसती नावे जरी उच्चारली तरी छाती दडपून जाते मग प्रत्यक्ष मैदानावर प्रतिस्पर्धी संघांची काय अवस्था होत असेल ते आपण वर्षानुवर्षे पाहिले आहे. हे खेळाडू जेव्हा मैदानात पाउल टाकत असत तेव्हा जणू ते प्रतिस्पर्धी संघाच्या छाताडावर पाय टाकून चालत असल्याचा भास निर्माण होत असे.
दुर्दैवाने आजच्या विंडीज संघाची काय अवस्था झाली आहे? एका ओळीत सांगायचे तर ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशी अवस्था झाली आहे. ख्रिस गेल, पोलार्ड, रसेल इत्यादी आडदांड खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पाहून अक्षरशः कीव आली. ४२ वर्षांचा किळसवाणा गेल चेंडूला बॅट लावण्यासाठी झगडत होता. याच गेलने टी २० मधील सर्वोच्च १७५ धावांचा विक्रम नोंदवला आहे यावर विश्वास बसत नव्हता. त्याची देहबोली तर दात नसलेल्या म्हाताऱ्या सिंहासारखी भासत होती.
दुसरा कायरेन पोलार्ड (Kieron Pollard). आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी जणू प्राणाची बाजी लावणारा हा भीमकाय खेळाडू राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना मारून मुटकून खेळत असल्यासारखा दिसला. बांगला देशाविरुद्ध तर धावा काढता येत नसल्याने पोलार्ड ‘रिटायर्ड हर्ट’ म्हणून मैदान सोडून गेला.
रवी रामपाल हा बोजड व वयस्क वेगवान गोलंदाज काय प्रभाव पाडणार होता ते निवड समितीच जाणो. हॉटमेर, निकोलस पुरण, एल्विन लुईस वगैरे नवोदित खेळाडू दिशाहीन खेळत होते. त्यांच्या खेळात सातत्य नव्हते. सर्व संघ एका ध्येयाने प्रेरित होऊन खेळत नव्हता तर प्रत्येक जण आपल्या मर्जीनुसार खेळत होता.
दवेन ब्रावो (Dwayne Bravo) निवृत्तीनंतर परत आला होता पण तो पूर्ण निष्प्रभ ठरला. ज्या लेंडल सिमन्सने २०१६ मध्ये भारताविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला होता त्याला बांगला देश विरुद्ध एकेक धाव काढणे मुश्किल झाले होते. याचाच परिणाम म्हणजे इंग्लंडने त्यांचा ५५ धावात खुर्दा उडवला तर लंकेने सुद्धा हसतहसत विजय मिळवला. बांगला देश विरुद्ध ३ धावांनी कसाबसा विजय मिळवताना सुद्धा त्यांचा जीव मेटाकुटीला आला होता.
टी २० सारखीच स्थिती कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. मधेच एखाद दुसरा सामना हा संघ जिंकतो पण मालिका विजय तर फार दुर्मिळ झाला आहे.
विंडीज बेटातील (Trinidadian cricketer) तरुण पिढी क्रिकेटमध्ये पैसे मिळत नसल्याने फुटबॉल / बेसबॉल सारख्या खेळांकडे आकृष्ट झाली आहे. गुणवत्ता नाही म्हणून पैसे नाहीत आणि पैसे नाहीत म्हणून गुणवान खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास उत्सुक नाहीत अशा दुष्टचक्रात विंडीज क्रिकेट सापडले आहे.
सुनील नारायणसारखा अव्वल लेग स्पिनर देशाकडून खेळायला तयार नाही हे त्याचे बोलके उदाहरण आहे. सर्व विंडीज खेळाडूंचे झटपट पैसे मिळवून देणाऱ्या लीग सामन्यांना प्राधान्य आहे. २०१६च्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध शेवटच्या षटकात चार षटकार मारून विजय खेचून आणणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटची जिगर यावेळी एकही खेळाडूत दिसली नाही.
वरील सर्व विवेचनावरून म्हणावेसे वाटते की विंडीजची स्थिती रस्त्यावर मरून पडलेल्या वाघासारखी झाली आहे. दूरवरून बघणारे वाघाला घाबरतात पण जवळ गेल्यावर लक्षात येते की हा मेलेला वाघ आहे. सुरवातीला उल्लेख केलेल्या खेळाडूंनी विंडीजचा असा दरारा निर्माण करून ठेवला आहे की अजूनही इतर संघ प्रथम त्यांना गांभीर्याने घेतात पण प्रत्यक्ष मैदानात त्यांच्या लक्षात येते की हे सर्व पेंढा भरलेले वाघ-सिंह आहेत आणि हीच खरी विंडीजच्या क्रिकेटची शोकांतिका आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.