Home » उद्धव ठाकरेंचे ‘अगं अगं दिल्ली’

उद्धव ठाकरेंचे ‘अगं अगं दिल्ली’

by Team Gajawaja
0 comment
Uddhav Thackeray
Share

शिवसेनेची धुरा सांभाळणारे ठाकरे घराणे हे कोट्यवधी शिवसैनिकांच्या दृष्टीने दैवतापेक्षा कमी नाही. शिवसेनेची स्थापना करणारे बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या एका शब्दाखातर जीवावर उदार होणारे लाखो शिवसैनिक होते. तसेच, त्यांच्या एका शब्दावर कोणाचा जीव घेणारेही होते. राजकारणात अत्यंत दुर्लभ असणारे असे हे देवासारखे स्थान ही ठाकरे घराण्याची पुण्याई होती. त्याला कारण होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कटाक्षाने दूर ठेवलेले राजकीय पद. अगदी गल्लीबोळातून सामान्य कार्यकर्त्यांना राज्याच्या मंत्रालयात पोहोचविणारे बाळासाहेब ठाकरे यांनी कुठल्याही राजकीय पदाचा कधीही मोह धरला नाही. अनेकांना त्यांनी नगरसेवक केले, अनेकांना आमदार, खासदार व मंत्री केले. मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत नेले. अगदी राष्ट्रीय पातळीवरही किंग मेकर म्हणून भूमिका निभावली. परंतु या सर्व काळात आपले शिवसेनाप्रमुख हे पदच त्यांनी सर्वोपरी मानले. (Uddhav Thackeray)

बाळासाहेबांनी घालून दिलेला हा दंडक पुढच्या पिढीतील ठाकरेंना पाळता आला नाही. बाळासाहेबांची हुबेहूब कॉपी मानले गेलेले राज ठाकरे यांनी सत्ता हाती घेण्याची आपली आकांक्षा कधीही दडवून ठेवली नाही. शिवसेनेत असतानाच युवा सेनेचे प्रमुख असताना एका मुलाखतीत त्यांनी आपली ही इच्छा बोलून दाखविली होती. मुख्यमंत्री होण्यात गैर काय, हा प्रश्न त्यांनी त्यावेळी मुलाखतकाराला विचारला होता. नंतरच्या काळात आपली स्वतःची महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढल्यानंतरही अधूनमधून त्यांनी हा संकेत दिलाच होता. किंबहुना, 2009 नंतर जेव्हा मनसे राज्याच्या राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आली तेव्हा समस्त मनसेसैनिक त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणूनच पाहत होते. मात्र, 2012 नंतर राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांचा उदय झाला आणि राज्याच्या राजकारणालाही वेगळे वळण लागले. त्यानंतरच्या घडामोडीत मनसेला उतरती कळा लागली आणि राज ठाकरे व त्यांचा पक्ष अडगळीत गेले.

मनसे जेव्हा जोरात होती तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काहीशी मरगळलेली होती. राज यांच्या वादळी आव्हानामुळे 2009 नंतर शिवसेना चाचपडत होती. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभा या लागोपाठच्या निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले होते. परंतु वर म्हटल्याप्रमाणे, मोदी यांच्या उदयानंतर सुरुवातीला त्यांच्याशी जुळवून घेऊन आणि नंतर त्यांना आव्हान देऊन शिवसेना राजकारणात टिकून राहिली. एकीकडे मनसेची शक्ती खालावत असताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला पुन्हा बळ आले. त्यातून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांची लाट असतानाही, मोदींच्या भाजपच्या विरोधात लढून शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. भारताच्या राजकारणातील नरेंद्र मोदी यांचे स्थान पाहता कुठल्याही प्रादेशिक पक्षाच्या दृष्टीने ही प्रचंड मोठी कामगिरी होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचा दिलेला हवाला आणि भाजपच्या कथित कुटील नीतीच्या विरोधात फुकलेले रणशिंग, यांचा या यशात मोठा वाटा होता. आपण एकाकी झुंज देत असल्याच्या उद्धव ठाकरे यांच्या हाकेला ओ देत तमाम शिवसैनिकांनी इरेला पेटून ते यश खेचून आणले होते. (Uddhav Thackeray)

त्याच यशामुळे असावे कदाचित, परंतु उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्रीपदाची लालसा निर्माण झाली. त्यातूनच मग ठाकरे घराण्याने जपलेली आजपर्यंतची पुण्याई संपुष्टात आली. भाजप आणि शिवसेना यांनी 2019 मध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी पाच वर्षे सत्तेत भागीदार असतानाही शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरले होते. तरी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिवसेनेशी युती करायला संमती दिली होती. परंतु ऑक्टोबर 2019 मध्ये निवडणुकीचे निकाल लागतात उद्धव ठाकरे यांनी टोपी फिरविली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने मुख्यमंत्रीपद मिळविले. मुख्यमंत्री होऊन उद्धव ठाकरे यांना फार काही करून दाखविता आले नाही, उलट शिवसेना पक्षावरील त्यांची पकड गेली. त्यातून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि त्यांची सत्ता उलटवून स्वतः मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून असलेल्या कार्यकाळात बहुतांश काळ कोरोनाच्या संकटात गेला, हे मान्य केले तरी ज्या पद्धतीने राज्यकारभार करायला हवा होता तसा तो झाला नाही हे वास्तव उरतेच.

देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवून मुख्यमंत्रीपद मिळविताना ठाकरे यांनी दोन दावे केले होते. एक म्हणजे, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे अमित शहा यांनी बंद खोलीत वचन दिले होते. दुसरा दावा हा होता, की शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर माझ्याशिवाय अन्य कोणाच्याही नावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संमती नव्हती. हे दोन्ही दावे अजूनही निर्विवाद सिद्ध झालेले नाहीत. असे कोणतेही वचन दिले नव्हते, हे भाजपच्या विविध नेत्यांनी अनेकदा सांगून झाले आहे. तसेच, फक्त उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचा आम्ही आग्रह धरला होता, असे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) आजपर्यंत म्हटलेले नाही. (Uddhav Thackeray)

हा सर्व इतिहास आठवण्याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकताच केलेला दिल्ली दौरा. उद्धव ठाकरे हे सध्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांशी गाठीभेटी घेऊन चर्चा करत आहेत. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांच्याशी ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांनी भेटी घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे जागावाटप याबाबत त्यांच्यात चर्चा झाली असे म्हटले जाते. शरद पवारांशीही अर्थातच चर्चा झाली. तसेच, काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्याशीही त्यांची भेट ठरली आहे. राज्याची विधानसभा निवडणूक अवघे दोन-तीन महिन्यांवर आली असताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत या चर्चा करणे याला महत्त्व आहे. (Uddhav Thackeray)

हा विकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे का? तसे संकेत स्वतः त्यांनीच दिले आहेत. दिल्लीत या भेटीगाठी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत साहजिकच प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असे पत्रकारांनी विचारले तेव्हा ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी असल्याचे सुचविले. “मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते, मला तशी इच्छाही नव्हती. परंतु मी जबाबदारीपासून पळ काढणारा व्यक्ती नाही. मी जबाबदारी घेतली आणि माझ्या क्षमतेनुसार सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्यांना (म्हणजे सहकारी पक्षांना) जर वाटत असेल की मी चांगले काम केले आहे, तर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मला पाहायला त्यांना आवडेल का हे विचारा,” असे ठाकरे म्हणाले.

यातली गंमत ही आहे की पूर्वीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांचे सहकारी पक्ष त्यांच्या या दाव्याला दुजोरा द्यायला तयार नाहीत. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेबाहेर यश मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह आहे. पुतण्याच्या जबरदस्त आव्हानाला परतवून लावून राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केल्यामुळे शरद पवारही जोमात आहेत. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे मुकाटपणे नेतृत्वाची कमान सोपवायला हे दोन्ही पक्ष तयार नाहीत. राज्याच्या सर्वोच्च पदावर आपला नेता असावा, हे स्वप्न काँग्रेस पहात आहे तसेच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसही पाहत आहे. (Uddhav Thackeray)

==============

हे देखील वाचा : राज ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी !

================

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नाही म्हटले तरी गलितगात्र होते. निवडणुकीच्या रणांगणात आपली काय स्थिती होईल, याची त्यांना शंका होती. म्हणून शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बिनशर्त नेतृत्व सोपवले होते. ती स्थिती आता नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेने लढविल्या, तरी सर्वाधिक जागा जिंकल्या त्या काँग्रेसने. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेटसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा चांगला आहे. अजूनही आपल्या पक्षात भरपूर बळ आहे, हे दोघांनाही जाणवले आहे. त्यामुळे ठाकरे म्हणतील ते पूर्व दिशा असे आता होणार नाही.

म्हणूनच उद्धव ठाकरे थेट दिल्लीत जाऊन आपला खुंटा बळकट करत आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात प्रत्यक्ष जागा वाटपाची चर्चा सुरू होईल. त्यावेळी आपला हा दावा अधिक ठामपणे मांडता येईल, यासाठी ठाकरे यांनी ही खेळी खेळलेली आहे. दिल्लीला गेल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न येणार, ही अटकळ ठाकरे यांना असणारच. त्याला त्यांनी अतिशय कुशलपणे वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे. एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, परंतु लोकलज्जेमुळे ती करता येत नाही तेव्हा काहीतरी सबब सांगून ती करण्यात येते. तेव्हा ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’ या म्हणीचा वापर केला जातो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून स्वतःला पुढे आणायचे आहे. परंतु बदललेल्या परिस्थितीत ते थेटपणे करणे शक्य नाही. त्यामुळे ते ‘अगं अगं दिल्ली’ या मार्गाने करत आहेत. (Uddhav Thackeray)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.