राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. रोज जुनी प्रकरणंही बाहेर काढली जात आहेत. थोडक्यात, विधानसभा निवडणुकींचा माहोल सेट होत आहे. प्रत्येक पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्याला टार्गेट करण्याचा त्याच्या विरोधात नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. याच लाइनवर महाविकास आघाडीने सध्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं चित्र आहे. याची सुरुवात झाली, श्याम मानव यांनी फडवीसांनी आदित्य ठाकरे ,उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा संसनीखेज आरोप केला. ज्याला अनिल देशमुखांनीही समर्थन दिलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बऱ्याच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी फडणवीसांवर टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. (Devendra Fadnavis)
मात्र याचा कळस गाठला तो म्हणजे फडणवीसांच्या राष्ट्रीय पातळीवर जाण्याच्या अफवेनं. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकीय पटलावरून बाहेर पडणार असा त्याचा अर्थ घेतला गेला. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण देत या केवळ अफवाच असल्याचं सांगितल्याने या बातम्या अफवाच असल्याचं स्पष्ट झालं. मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून एवढं टार्गेट का केलं जात आहे? नेमकं कोणत्या कारणासाठी विरोधक फडणवीसांनाच घेरत आहेत. (Devendra Fadnavis)
तर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यातील महायुती आणि महायुतीच सरकार एकत्रितपणे ठेवण्यात असलेला देवेंद्र फडणवीस यांचा रोल देवेंद्र फडणवीस हे राज्यात उपमुख्यमंत्री आहेत. सोबतच भाजपचे पक्षाध्यक्षही नाहीयेत. तरी महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्व आहेत. विशेषतः अजित दादा हे महायुतीत सामील झाल्यानंतर फडणवीस यांचा रोल अजूनच वाढला आहे. खरं तर एकनाथ शिंदेंच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अजित दादा त्यांना निधी देत नसल्याचं कारण दिलं होतं. जेव्हा अजित दादा महायुतीत आले त्यानंतर हे भांडण पुन्हा होईल असं बोललं जात होतं. मात्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि अजित दादा गट या दोन्ही गटांना जुळवून घेण्यास भाग पाडलं.
शिंदे गट आणि अजित दादा गट या दोन्ही गटाचे अनेकदा खटके उडतात मात्र फडणवीस ऍक्शनमध्ये येताच हा वाद मिटतो. सोबतच अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांचे एकमेकांशी व्यक्तीगत संबंध तितके चांगले नसले तरी फडणवीसांशी दोघांचे घनिष्ठ संबंध आहेत. थोडक्यात, तीन पक्षांचं महायुतीच सरकार चालवण्यात फडणवीसांचा मोठा रोल आहे. या अशावेळी येत्या निवडणुकीत जर महायुतीला खिळखिळीत करायचं असेल तर मग या महायुतीतल्या सर्वात महत्वाच्या दुव्याला टार्गेट करण्याची विरोधकांची स्ट्रॅटेजि आहे. त्यामुळेच अनेक प्रकरणं काढून फडणवीसांना टार्गेट केल्याचं दिसतं. (Devendra Fadnavis)
फ़डणवीसांना टार्गेट कारण्यामागचं दुसरं कारण हे लोकसभेचा निकाल आणि भाजप पक्षश्रेष्ठी याची नोंदणी घेण्याची शक्यता. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन महत्वाच्या राज्यांमध्ये भाजपची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी अत्यंत खराब राहिली. त्यामुळे या दोन्ही पराभवाची भाजपकडून चिकित्सा केली जाईल, असं बोललं जात होतं. त्यातच पराभवाची जबाबदारी घेण्यास सांगून योगी आदित्यनाथ यांची उचलबांगडी केली जाईल, या बातम्या येत आहेत. अशावेळी महाराष्ट्रातही फडणवीस अडचणीत येऊ शकतात, असे अंदाज बांधले जात होते.
याचाच फायदा घेत मग विरोधकांनाही फडणवीसांना टार्गेट करण्यास सुरवात केली. या वेळी विरोधकांच्या दबावाखाली जर फडणवीसांनी एखादं चुकीचं स्टेटमेंट केलं, तर त्यांची दिल्लीत प्रतिमा अजूनच डागाळली जाईल, असा विरोधकांचा कयास असावा, असं जेष्ठ पत्रकार सांगतात. मात्र, भाजप नेतृत्वाने मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये फडणवीसांना पहिल्याच रांगेत बसवून योग्य ते संदेश दिल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. फडणवीसांना टार्गेट केल्याने होणार तिसरा फायदा म्हणजे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील फोकस कमी होणं. (Devendra Fadnavis)
=================
हे देखील वाचा : फडणीसांवर गंभीर आरोप !
================
तर महाविकास आघाडीत शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यापुढे दुहेरी लढाई असणार आहे. पहिली म्हणजे शरद पवारांना अजित पवारांशी तर उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची पारंपरिक मतं वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे. अशावेळी या ठाकरे आणि शरद पवारांना अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्याशी वन टू वन लढाई असल्याचं चित्रही निर्माण करायचं नाहीये. त्यामुळे मार्ग उरतो तो म्हणजे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची स्वतःची अशी ताकद नाहीये आणि ते भाजपच्या तालावर राजकारण करतात, हे नॅरेटिव्ह पुढे रेटण्याचा.
हे नॅरेटिव्ह पुढे रेटण्याचा एक सोप्पा उपाय म्हणजे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट न करता आमची खरी लढाई भाजपाशीच असल्याचं चित्र निर्माण करणे. आणि यामुळेच मग शरद पवार गट आणि ठाकरे गट भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना दिसतात. आता यामध्ये त्यांना यश येतं का फडणवीस त्यांना पुरून उरतात हे येत्या विधानसभा निवडणुकांतच स्पष्ट होईल. (Devendra Fadnavis)