गुलिगत धोका, बुक्कीत टेंगूळ, ब्रॅंड इज ब्रॅंड सॉरी सॉरी बॅंड इज बॅंड हे सर्व डायलॉग ज्याला माहीत नसतील, असा एकही मराठी तरुण महाराष्ट्रात नसेल. लॉकडाउनपासून प्रत्येकाच्या मुखात हे डायलॉग आहेतच हे डायलॉग ज्याचे आहेत, त्याला लोकं प्रचंड हसतात, ट्रोल करतात, शिव्या देतात तसं तो कामंही हसवायची आणि वेडगळपणाची करतो. पण ज्याला लोकं नावं ठेवतात, तोच आज चक्क मराठी बिगबॉस पर्यंत पोहोचला आहे हो मी रीलस्टार सूरज चव्हाणबद्दलच बोलतोय.
सध्या मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीजनची चर्चा आहे. त्यातच बिग बॉसच्या घरात जाणारे १६ स्पर्धक जाहीर करण्यात आले. यात एका स्पर्धकाला पाहूंन अनेकांनी नाकं मुरडली, तो म्हणजे सूरज चव्हाण या छपरीला का घेतलं ? आता तर आम्हाला बिग बॉस पहायचच नाही ? अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. पण ज्या सुरज चव्हाणला लोकं नावं ठेवत आहेत, तोच आज लाखो कमावतोय आणि मराठी इंडस्ट्रीतला प्रत्येक सेलेब्रिटी त्याला ओळखतोय. आज रील्स आणि टिकटॉकवर धुमाकूळ घालणाऱ्या याच सूरज चव्हाणचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. (Suraj Chavan)
सूरज चव्हाण हा बारामतीचा ! इथल्या मोडवे गावामध्ये त्याचा जन्म झाला. घरी परिस्थिती भयंकर हलाखीची आठ बहिणी त्यात हा एकच भाऊ नन्यत्र तीन बहिणी जग सोडून गेल्या. बाबांना कॅन्सर झाला होता. आधीच आर्थिक परिस्थिती वाईट त्यात कॅन्सरसारखा भयाण आजार या सर्व गुंतगुंतीत आईनेही जीव सोडला दुसरीकडे ज्या दिवशी आई गेली त्याच दिवशी आजीही गेली. सूरज चव्हाणचं अर्ध कुटुंब मरणाच्या दारात गेलं. यानंतर बहीणींनी आणि आत्याने त्याचा सांभाळ केला. आधीपासूनच बोबडं बोलणंत्यामुळे त्याच्या बोलण्याला कॉमेडीचा एक पंच मिळतो. फक्त आठवीपर्यंतच शिकला. त्यानंतर मोलमजुरी करायला सुरुवात केली. दररोज मजूरीसाठी जाऊन कुटुंब थोडं पैसे कमवत होतं. याचदरम्यान सोशल मीडियावर टिकटॉकचा ट्रेंड आला होता.
याचवेळी बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल सांगितलं. टिकटॉकवर आधीपासूनच अनेक जन वेडगळ व्हिडिओ बनवतच होते. तसाच काहीसा भाव सूरजचाही होता. लोकांना हसवणं, थट्टा-मस्करी करणं, कोणाचीही Acting करणं हे त्याला आवडायचं. त्यामुळे एक दिवस त्याच्या बहिणीचा त्याचा असाच एक व्हिडिओ बनवून टिकटॉकवर टाकला. सोशल मीडियावर लोकांना मनोरंजन बघायला जास्त आवडतं. त्यामुळे पहिल्याच व्हिडिओनंतर सूरज चव्हाण सोशल मीडियावर बराच गाजला. भन्नाट चाळे करायचे, कोणाचे डायलॉग मारायचे अशा प्रकारचे व्हिडिओ तो बनवायला लागला. यानंतर त्याचे स्वत:चे डायलॉग प्रसिद्ध झाले. ते म्हणजे गुलीगत, बुक्कीत टेंगूळ आणि बॅंड इज बॅंड ! (Suraj Chavan)
काही लोकांना त्याचे व्हिडिओ आवडत नव्हते. काही लोकं मात्र एंजॉय करू लागले. बारामतीचा मुलगा या व्हीडिओजमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. लाईक्स, शेअर्स, कमेंट्सचा पाऊस पडू लागला. आणि अशा प्रकारे सूरज चव्हाण एक ब्रॅंड झाला. इतका मोठा ब्रॅंड की कसलंही उद्घाटन असो, तेव्हा चक्क रिबन कापण्यासाठी सूरज चव्हाणला बोलावलं जातं. आणि यासाठी तो तब्बल ८० हजार रुपये घ्यायचा, असा खुलासा त्याने बिग बॉसमध्ये केला आहे. सध्या ३० ते ५० हजार मिळतात, असं सूरजने सांगितलं. पण याच दरम्यान माजी अनेकांनी फसवणूक केल्याचंही तो म्हणाला. टिकटॉक आता भारतातून हद्दपार झालं असलं, तरी इनस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून अशा व्हिडिओज बनवल्या जातात. त्यामुळे रील्सवरही त्याने धुमाकूळ घातलाच आहे.
==================
हे देखील वाचा : सोनाली कुलकर्णीचे आकर्षक फोटोशूट
================
व्हिडिओजच्या माध्यमातून त्याने इतका पैसा कमावला की, आता महागडी बाइक घेतली, घर बनवून घेतलं. घरची पूर्ण परिस्थिती सुधारली. नुकतच त्याला ‘प्रेमासाठी काहीपण’ या वेब सिरिजसाठी सुद्धा विचारणा झाली होती. याशिवाय एका ‘गुलीगत सूरज चव्हाण’ ही युट्यूब वेब सिरिजसुद्धा त्याने केली आहे. याशिवाय ‘का र देवा’ आणि मुसंडी या मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. आता तर थेट तो मराठी बिग बॉसपर्यंत पोहोचला आहे. सूरजने शून्यातून जग निर्माण केलं. आपण जरी त्यांच्या स्वभावाची, त्याच्या व्हिडिओजची थट्टा मस्करी करत असलो, तरी आज तो महिन्याला लाखो रुपये कमावतोय. आपल्या दिसण्या आणि वागण्याला त्याने कलेची जोड दिली आणि आज अनेक जण त्याच्या व्हिडिओ आनंदाने पाहतात. त्यातही काही त्याला ट्रोल करतात, शिव्या देतात. पण या सर्वांनी त्याचं यश झाकोळलं जाणार नाही. (Suraj Chavan)