Home » फडणीसांवर गंभीर आरोप !

फडणीसांवर गंभीर आरोप !

by Team Gajawaja
0 comment
Devendra Fadnavis vs Anil Deshmukh
Share

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकरण बाहेर आलं आहे. या प्रकरणात जे आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत, त्याने इथून पुढे राज्याचं राजकारण संपूर्ण ढवळून निघेल एवढं नक्की. याची सुरवात झाली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या देवेंद्र फडणवीसांवरील धक्कादायक आरोपांपासून आरोपही असे आहेत ज्यामुळे फडणवीसांच्या इमेजला एक मोठा धक्काच बसेल. श्याम मानव यांनी असे आरोप करताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखणही केली. त्यानंतर अनिल देशमुख यांनीही या आरोपांना दुजोरा दिला आणि फडणवीसांवरील आरोपांना अजूनच धार मिळू लागली. मात्र, लागलीच ऍक्शन मोड मध्ये येत फडणवीसांनीही “मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर सोडत नाही” अशा शब्दात धमकीवजा इशाराच अनिल देशमुखांना दिला. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे? नेमके कोणते आरोप झाले? आय आरोपांची सुरवात कशी होते?

तर सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महायुतीच्या सरकार विरोधातआक्रमक वक्तव्य केलं ते म्हणाले “महाराष्ट्रातलं सरकार हे शेठजी आणि भटजीचं सरकार आहे. शेठजीची संपत्ती वाढवणारं आणि गरिबांना गरीब बनवणारं हे सरकार आहे,” त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांनुसार, अनिल देशमुख हे ED च्या रडारवर आले असताना त्यांना या प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी चार ऍफिडेव्हिटवर सही करण्यासाठी दबाव आणला गेला होता. महत्वाचं म्हणजे हा माणूस देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील होता असाही आरोप आहे. मात्र, त्यापेक्षा धक्कदायक आहे या चार ऍफिडेव्हिटमधला कंटेन्ट. (Devendra Fadnavis vs Anil Deshmukh)

श्याम मानव यांच्या आरोपांनुसार पहिल्या ऍफिडेव्हिटमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलवलं आणि त्यांना पैसे गोळा करायला सांगितले असा मजकूर होता. तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली असा उल्लेख होता. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांनी काही बेकायदेशीर बांधकामं केली आहेत असं नमूद करण्यात आलं होतं. तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचा उल्लेख होता. अजित पवारांनी देशमुखांना देवगिरी बंगल्यावर बोलवलं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार त्यावेळी उपस्थित होते.

त्या दोघांच्या उपस्थितीत अनिल देशमुखांना गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पैसे गोळा करायला सांगितलं गेलं असा उल्लेख होता. त्यावेळी गृहमंत्री असणाऱ्या अनिल देशमुखांना या चारी ऍफिडेव्हिटवर सही करण्यास सांगण्यात आलं होत असा आरोप श्याम मानव यांचा आहे. सोबतच, जेव्हा अनिल देशमुखांनी असं करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना अजित दादांचं ऍफेडेव्हिट वगळून इतर तीन ऍफिडेव्हिटवर सह्या करण्याच्या ऑप्शन देण्यात आला होता असा आरोपही श्याम मानव यांचा आहे. मात्र, “माझ्यामुळे तीन निरपराध माणसं तुरुंगात जातील, हे आपल्याला मान्य नाही”. असं म्हणत अनिल देशमुख यांनी पुन्हा ऍफेडेव्हिटवर सही करण्यास नकार दिला आणि देशमुखांवर एवढा दबाव होता की ते आत्महत्त्या करण्याचा विचार करत होते असा धक्कदायक आरोपही श्याम मानव यांनी केला. (Devendra Fadnavis vs Anil Deshmukh)

यानंतर लागलीच अनिल देशमुख यांनीही श्याम मानव यांना समर्थन दिलं. “महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी चार खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून द्या. तुमच्यावर कुठलीच कारवाई करणार नाही,” यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला पाठवले होते, असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनही केला. “मी प्रतिज्ञापत्र भरून दिले असते तर तीन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असते,”असंही देशमुख म्हणाले. थोडक्यात, देशमुखांच्या आरोपामुळे फडणवीसांवरील आरोपांची तीव्रता अजूनच वाढली.

मात्र, लागलीच मैदानात उतरत फडणवीसांनी हे आरोप खोडून काढले. “अनिल देशमुखांनी या आधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर बोललो नव्हतो. मी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर सोडत नाही. मला देशमुखांना एकच सांगायचं आहे, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत. त्यामध्ये अनिल देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही,” अशा आक्रमक शब्दात फडणवीसांनी आरोप फेटाळून लावलेत.

मात्र, या रोप प्रत्यारोपांत ज्या ED कारवाईतून सुटण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर ऍफिडेव्हिटवर साइन करण्याचा दबाव होता ते नेमकं काय होतं हेही पाहावं लागेल. डिसेंबर 2019 मध्ये, पाच वेळा आमदार राहिलेले अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री करण्यात आले. देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात, 25 फेब्रुवारी 2021 ला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या काठ्या आणि धमकीचे पत्र असलेली SUV पार्क करण्यात आली होती आणि त्यानंतर या SUV चा मालक मनसुख हिरेन याचाही मृतदेह सापडला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NIA ने सचिन वाझे या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाचे लिंक थेट गृहमंत्री देशमुखांपर्यंत जात असल्याचा आरोप करण्यात आला. (Devendra Fadnavis vs Anil Deshmukh)

===================

हे देखील वाचा :  शरद पवार अजितदादांना जागा देतील ?

====================

गृहमंत्री असणाऱ्या देशमुख यांनी या प्रकरणाचा खापर मुंबईचे पोलीस कमिश्नर परमबीर सिंग यांच्यावर फोडत त्यांची उचलबांगडी केली. पण त्याचवेळी परमबीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकला आणि वाझे प्रकरण देशमुखांना अजूनच जड जाऊ लागलं. परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील 1,750 बार आणि रेस्टॉरंटमधून 40-50 कोटी रुपये दरमहा 100 कोटी रुपये, गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला.या प्रकरणामुळे सत्तेमध्ये असणारे अनिल देशमुख केंद्रीय संस्थांच्या रडारवर ही आले. देशमुख यांच्या अनेक जवळच्या लोकांची ED ने चौकशी केली. याच वेळी देशमुख यांना चार प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्याचा आणि कारवाई टाळण्याचा सौदा देण्यात आला होता, असा आरोप आहे. पुढे, 2 नोव्हेंबर 2021 ला ईडीने देशमुख यांना अटक केली. त्यानंतर 6 एप्रिल 2022 रोजी सीबीआयने देशमुख यांना वझे प्रकरणातही अटक केली. अखेर १३ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर २८ डिसेंबर २०२२ ला अनिल देशमुख या दोन्ही केसमध्ये जामीन मिळवत बाहेर आले.

मात्र, जामिनावर असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी अजूनच वाढल्या आहेत. देशमुखांनी आरोप केल्यानंतर लागलीच त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक प्रकरण समोर आलं आहे. भाजप नेते गिरीश महाजनांवर गुन्हा का दाखल केला नाही? असं म्हणत अनिल देशमुखांनी मला वारंवार धमकावलं, असा आरोप जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी केला आहे. महत्वाचं म्हणजे , तसा जबाब त्यांनी सीबीआयकडे देखील नोंदवला आहे. त्यामुळे आधीच दोन प्रकरणांमध्ये जामिनीवर असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीसांवर जे गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे फडणवीसांच्या विरोधात एक नॅरेटिव्ह देखील पसरू शकतो. अशावेळी देशमुख पुन्हा जेलवारी करणार की फडणवीस पुन्हा एकदा नॅरेटिव्हच्या चक्रव्यूहात अडकणार हे येत्या काही दिवसांत कळेलच . (Devendra Fadnavis vs Anil Deshmukh)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.