Home » १५ गोळ्या झेलूनही पाच पाक सैनिकांना केलं ठार !

१५ गोळ्या झेलूनही पाच पाक सैनिकांना केलं ठार !

by Team Gajawaja
0 comment
Yogendra Singh Yadav
Share

कवी प्रदीप यांनी एक सुंदर गाणं लिहिलं आहे, ‘ए मेरे वतन के लोगो’… या गाण्यात एक ओळ आहे, ‘जब देश में थी दीवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली..’१९९९ चा तो काळ एकीकडे भारतीय क्रिकेट वर्ल्ड कपचा आनंद लुटत होते, तर दुसरीकडे कारगिलमध्ये इंडियन आर्मीचे जवान देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडत होते. भारताचे ५२७ वीर जवान या युद्धात धारातीर्थी पडले. कारगिल युद्धात असेही पराक्रमी वीर होते ज्यांनी तब्बल १०-१० गोळ्या शरीरावर झेलल्या, मात्र तरीही मृत्यूलाही पराभूत करून त्यांनी शत्रूंचा खातमा केला. असेच एक वीर म्हणजे परमवीर चक्र सुबेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ! शरीरात चक्क १५ गोळ्या घुसल्या आहेत, कपाळ फुटलं आहे, हात खांद्यापासून तुटून निखळला आहे, जखमेमधून हाडं डोकावत आहेत . मात्र तरीही एकटा पाकिस्तानच्या अख्या कंपनीसोबत भिडला आणि कारगिलचा टायगर हिल जिंकून दाखवला.  (Yogendra Singh Yadav)

योगेंद्र सिंग यादव यांचा जन्म १० मे १९८० चा मुळचे बुलंदशहर, उत्तर प्रदेशचे  घरी आर्मीचच बॅकग्राऊंड, वडील रामकरण सिंगसुद्धा आर्मीमध्येच आणि १९७१ च्या युद्धात त्यांचा सहभाग होता. योगेंद्र आणि त्यांच्या दोन भावांना ते युद्धाच्या आणि सैन्याच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे आर्मीतच जायचं हे त्यांनी पक्कं होतं आणि वयाच्या अवघ्या १६व्या वर्षीच ते सैन्यात भरती झाले. त्यावेळी अकरावीमध्येच होते. आर्मीमध्ये तीन वर्ष झाली आणि १९९९ ला कारगिल युद्धाला सुरुवात झाली. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा योगेंद्र हे रजेवर होते, त्यातच लग्न होऊन अवघे १५ दिवस झाले होते. पण ऑर्डर आली आणि ते द्रास सेक्टरमध्ये आपल्या कंपनीसोबत दाखल झाले. पुढच्याच २२ दिवसांमध्ये २ अधिकारी, २ जेसीओ आणि २१ जवान शहीद झाले होते.

भारताने टोलोलिंग शिखर जिंकलं, यानंतर योगेंद्र यांच्या बटालियनसमोर टायगर हिल जिंकण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. पाक सैनिकांनी या शिखरांवर बंकर्स उभे करून ठेवले होते. योगेंद्र यांच्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कुशलचंद ठाकूर होते. आता टायगर हिल समोरच होतं, यासोबतच योगेंद्र सिंग यादव यांची तुकडी पुढे सरकत होती. त्यांच्या बटालियनचं घातक प्लॅटुन हे कमांडो पथक यावेळी पुढे सरकार होतं. ते एकूण २३ जण होते. वरुन पाकिस्तानी सैनिकांची हेवी फायरिंग आणि इथे जवानांना एक कठीण आणि सरळसोट कडा चढायचा होता. एकतर थंडी त्यात श्वास घेणं जड जात होतं. कॅप्टन सचिन निंबाळकर लेफ्टनंट बलवान यांच्या नेतृत्वात सर्व जवान टायगर हिल चढतच होते. (Yogendra Singh Yadav)

सतत चालत असल्यामुळे त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला. चहा बनवण्यात आला. सर्वच चहाचा आस्वाद घेत होते, इतक्यात त्यांच्या गोळ्यांचा भडिमार सुरू झाला. गोळ्या नेमक्या कुठून येत आहेत, हेच त्यांना कळत नव्हतं. यावेळी कमांडिंग ऑफिसरने आम्ही तोफांचा संरक्षण देतो, तुम्ही कोणतीही कृती न करण्याचा आदेश दिला. द्रासमधूनच तोफांचा मारा सुरू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानचा गोळीबार काही का असेना थोड्या वेळासाठी थांबला. विशेष म्हणजे योगेंद्र सिंग यादव यांच्या पलटणमध्ये अजून एक सैनिक होते, ज्यांचं नाव योगेंद्र यादवच होतं आणि दोघांची चांगली गट्टी होती. चालत चालत ते पहाटेपर्यंत एका घळीत पोहोचले याच ठिकाणी शत्रू सैनिकांकडून प्रचंड गोळीबार करण्यात आला.

काही सैनिक मागे सरले आणि फक्त सातच सैनिक तो गोळीबार पार करू शकले. पण आता त्यांच्यापुढे नवीन संकट येऊन उभं राहिलं होतं. त्यांची पूर्ण तुकडी पाक सैनिकांच्या टप्प्यातच होती. त्यामुळे गोळीबार काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं. एवढ्यात त्यांनी काही दगडांचा आसरा घेतला. आणि इथूनही फायरिंग सुरू केली. दोन्ही बाजूंनी पाच तास गोळीबार सुरूच होता. योगेंद्र सिंग यादव यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या ६ जवानांना हे माहीत होतं की, आता आपण परतून जाउच शकत नाही आणि पुढे मरणच आहे. मात्र त्यांनी आपली बटालियन 18 ग्रेडेनियर्सचं घोषवाक्य ‘सर्वदा शक्तिशाली’ हे दाखवूनच दिलं. (Yogendra Singh Yadav)

या सात जणांच्या तुकडीने गोळीबार थांबवला नाही पाक सैनिक जवळ येण्याची वाट पाहू लागले. त्यांनी एक निश्चय केला होता की, मरण्यापूर्वी जास्तीत जास्त पाक सैनिकांना ठार करायचं. त्यामुळे त्यांनी मेल्याचं सोंग केलं. एवढ्यात पाकचे 12 सैनिक त्यांच्या अगदी जवळ आले. आणि क्षणातच या 7 जणांनी गोळीबार सुरू केला आणि पाकच्या 10 सैनिकांना ठार केलं. त्यातले दोन जण पळून गेले आणि अर्ध्या तासानंतर ते 35 पाक सैनिकांना घेऊन आले. आता तर जिवंत राहण्याची एकही संधि नव्हती हे सर्व सैनिकांना कळून चुकलं. पाक सैनिकांकडून पुन्हा गोळीबार सुरू झाला. हेवी मशीनगन्स, उबेर मशीनगन्स, रॉकेट प्रॉपल्ड ग्रेनेड, अशा सर्व वेपन्सनी त्या 7 जणांवर मारा होत होता.

त्यांचा प्रतिकारदेखील करता येत नव्हता. इतक्यात पाक सैनिकांनी फेकलेला एक हातबॉम्ब योगेंद्र सिंग यादव यांच्या गुडघ्याजवळ फुटला. यावेळी त्यांचा पाय इतका सुन्न पडला की त्यांना वाटलं आता माझा पाय राहिलाच नाहीये. यानंतर आणखी एक बॉम्ब त्यांच्या दिशेने आला आणि डोक्याजवळ फुटला. योगेंद्र सिंग यादव कोसळले. प्रचंड वेदना व्हायला लागल्या. सगळं दिसेनास झालं. रक्त वाहत डोळ्यांमध्ये साचु लागलं. एवढ्यात योगेंद्र यांना बँडेज बांधण्यासाठी पुढे आलेल्या ग्रेनेडिअर नरेश यांच्या अंगावर एक बॉम्ब फुटला आणि ते शहीद झाले. यानंतर अनंतराम त्यांच्याजवळ आले, डोक्याला पट्टी बांधत असतानाच एक गोळी थेट अनंतराम यांच्या डोक्यात घुसली. हे सगळं जखमी योगेंद्र सिंग यांच्या समोर घडत होतं. (Yogendra Singh Yadav)

एकच गोंधळ माजला. ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दणाणू लागल्या. पस्तीस पाक सैनिक आमच्यावर तुटून पडले होते. दोघे जण जखमी झाले होते, दोघे शहीद जिवंत असलेले तिघे जण पस्तीस सैनिकांना तोंड देत होते. पण आता चित्र पालटलं होतं. पाक सैनिकांचा गोळीबार काही केल्या थांबला नव्हता. भारतीय तुकडीमधला एकही सैनिक जिवंत न राहावा, यासाठी ते आता अगदी गोळीबार करत होते. गोळ्यांनी सर्वांच्या शरीराची चाळण झाली होती. आश्चर्य म्हणजे आतापर्यंत 7-8 गोळ्या लागलेले योगेंद्र सिंग यादव जिवंत होते आणि उर्वरित सर्व सैनिक शहीद झाले. पाक सैनिक इतका गोळीबार करत होते की, त्यांच्या साथीदारांचे मृतदेह अक्षरश उडत होते. एक पाक सैनिक पुन्हा आला आणि त्यांच्या बाजूला असलेल्या सैनिकावर त्याने चार राऊंड फायर केले. यानंतर तो योगेंद्र सिंग यादव यांच्याजवळ आला.

त्यांनी डोळे मिटले. मेल्याचं सोंग घेतलं आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळ्या आपल्या अंगात घुसत आहेत, याची त्यांना जाणीव होत होती. १५ गोळ्या शरीरात घुसल्या होत्या. पण शरीर श्वास घेत होतं. त्यांनी मनात एक पक्क केलं होतं की डोक्यावर आणि हृदयावर गोळी जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत यांनी माझ्यावर कितीही गोळ्या झाडल्या तरी मी जिवंत राहीन. भारताचे सर्व जवान मेले अशी त्यांना खात्री झाली. पाकिस्तानी सैनिकांनी मुशकोच्या आपल्या तळावर संदेश पाठवला आणि टायगर हिलमध्ये भारतीय सैनिक आले आहेत, त्यांचा शोध घ्यावा, त्यांना उद्ध्वस्त करावं, असं पाक सैनिकांनी मुख्य ठाण्यावर कळवलं. (Yogendra Singh Yadav)

आपल्या तुकडीमधले अठरा जवान कुठेतरी वाट चुकले आहेत, हे योगेंद्र यांना माहीत होतं. त्यामुळे या अठरा जणांपर्यंत हि माहिती पोहोचवणं खूप गरजेचं होतं. आपण जिवंत राहायचं, शुद्ध हरपू द्यायची नाही, असं ते पुन्हा पुन्हा स्वतला सांगत होते. एवढ्यात पुन्हा दोन पाक सैनिक त्यांच्याजवळ येत असल्याचं त्यांना दिसलं. आपल्या पट्ट्यात एक हाटबॉम्ब आहे, हे त्यांना कळलं. मोठ्या कष्टाने त्यांनी तो काढला आणि दोघांवर भिरकावला. पाक सैनिकांच्या चिंधद्या उडाल्या. यानंतर संपूर्ण शक्ति एकवटून त्यांनी पाक सैनिकाची रायफल घेतली आणि फायरिंग सुरू केली. पाक सैनिकाच्या तुकडीला वाटलं, भारतीय सैनिकांची दुसरी तुकडी आली की काय ? त्यामुळे पाक सैनिकांनी पळ काढला. दुपारचे दीड वाजले होते. योगेंद्र सिंग यादव रांगत रांगत पुढे सरकत होते. आपल्या तळावर माघारी जावं आणि कमांडिंग ऑफिसरला सगळं सांगाव, हीच त्यांची इच्छा होती.

रांगत असताना त्यांना आपल्या सहकार्यांचे मृतदेह दिसले. कोणाचं डोकं उडालं होतं. कुणाचं पोट फाटलं होतं. भावापेक्षाही अधिक जवळच्या या सहकाऱ्यांनी पाक सैनिकांनी अत्यंत क्रूरपणे मारलं होतं. खूप वेळ ते तिथेच पडून राहिले आणि खूप रडले. शरीर थंड पडत चाललं होतं. प्रचंड वेदना होत होत्या. जखमांमधून बाहेर पडलेली हाडं वेदना अजून वाढवत होते. खांद्याचा सांधा तुटलेला शेवटी तो हात कमरेच्या पट्ट्यात बांधून टाकला. काहीही झालं तरी मरायचं नाही, हे त्यांनी ठरवलं होतं. तुटलेला हात, शरीरात पंधरा गोळ्या असतानाही ते रांगत रांगत एका नाल्याजवळ आले. सर्व शक्तीने स्वतला त्या नाल्यात झोकून दिलं आणि त्यातून वाहत खाली आले. एक हात शाबूत होता, त्यामुळे एका दगडाला घट्ट धरून लटकून राहिले. यावेळी १८ ग्रेनेडियर्सच्या एका तुकडीने त्यांना पाहिलं. (Yogendra Singh Yadav)

रक्ताने भरलेलं शरीर आणि दीर्घ श्वास घेत असणाऱ्या त्या नाकपुड्या ! जवानांनी त्यांना तिथून बाहेर काढलं. पाठीवर घेऊन त्यांना मुख्य तळावर आणण्यात आलं. मरणाच्या दारात आणि थंडीने कुडकुडत डोळ्यांवर फक्त अंधारीच होती. एवढ्यात कमांडिंग ऑफिसर तिथे आले आणि म्हणाले, मला ओळखलं का ? यावर योगेंद्र सिंग यादव म्हणाले, साब मै आपकी आवाज पहचानता हूं.. जय हिंद साब ! यानंतर त्यांनी शत्रूचं तळं कुठे आहे, शत्रू सैनिक किती आहेत सगळ सगळं त्यांनी सांगितलं आणि त्यांची शुद्ध हरपली. मुख्य तळावरून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. यानंतर तीन दिवसांनी ते शुद्धीवर आले. त्यांनी नर्सला विचारलं टायगर हिलचं काय झालं ? यावर नर्सने सांगितलं. ज्या दिवशी तुम्ही इथे आलात, तेव्हा ब्राव्हो आणि डेल्टा कंपनीच्या शंभर जवानांनी टायगर हिल जिंकला.

===========

हे देखील वाचा :  संजय कुमार याचं पराक्रम !

===========

हे ऐकून त्यांना शांती मिळाली. आपलं जगण सार्थकी लागलं, असं त्यांना वाटू लागलं. यानंतर योगेंद्र सिंग यादव यांना दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालं. बोन ग्राफटिंग करण्यात आलं. गोळ्यांमुळे महत्त्वाच्या अवयवांना इजा झाली नव्हती. अजूनही या १५ गोळ्यांचे निशाण त्यांच्या शरीरावर आहेत. अजूनही हिवाळ्यात त्यांचा खांदा प्रचंड दुखतो, पण त्यावेळी जे दुख सोसलं त्यापुढे हे फिकच, असं योगेंद्र सिंग यादव म्हणतात. कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण १५ गोळ्या, हात तुटला, सगळे साथीदार गेले आणि अशांत त्या एकट्याने एका कंपनीएवढ्या जवानांशी मुकाबला केला आणि पाच पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं. (Yogendra Singh Yadav)

त्यांचा परमवीर चक्र पुरस्काराने गौरव झाला. गेल्या ७७ वर्षांच्या इतिहासात केवळ २१ जणांचाच परमवीर चक्राने गौरव झाला आहे, त्यापैकीच एक म्हणजे सुबेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ! २०२१ साली ते सैन्यातून रिटायर झाले. आजही त्यांची शौर्यगाथा फक्त सैन्यातच नाही, तर प्रत्येक शहरापासून गावखेड्यात ऐकवली जाते. आज ते अनेक ठिकाणी भाषण करतात, युवकांना सैन्यात जाण्यासाठी प्रेरित करतात. भारतभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं. इंडियन आर्मीच्या टायगरने टायगर हिल काबिज केला आणि भारताने कारगिल युद्ध जिंकलं !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.