Home » आजकी रात कुछ होने वाला है !

आजकी रात कुछ होने वाला है !

by Team Gajawaja
0 comment
Saturn Lunar Eclipse
Share

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणजे काय ते आपल्याला माहित आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होतं. चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. याला सूर्य ग्रहण स्थिती म्हणतात. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि तिची सावली चंद्राला व्यापते तेव्हा पूर्ण चंद्रग्रहण होते. पण याशिवाय शनी चंद्र ग्रहण असते याची माहिती आहे का. जर नसेल तर आज आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. २४ आणि २५ जुलै रोजी शनी चंद्र ग्रहण असणार आहे.

आकाशात चंद्र शनी ग्रहाच्या आड येणार आहे. शनी ग्रह त्यामुळे न दिसता त्याच्या जागी चंद्र दिसणार आहे. तर शनीभोवती असलेलं रिंगण चंद्राला दिसणार आहे. ही अदभूत खगोलीय स्थिती असणार आहे. चंद्र जणू शनी ग्रहाला लपवणार आहे. २४ आणि २५ जुलैनंतर ही खगोलीय घटना बरोबर १८ वर्षानंतर घडणार आहे. म्हणूनच ज्यांना शक्य होईल, त्यांनी आकाशात घडणा-या या खगोलीय घटनेला नक्की बघावे असे आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी केले आहे. (Saturn Lunar Eclipse)

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याबद्दल माहिती असते. मात्र आकाशात अनेक खगोलीय घटना घडतात. त्याला वेगळी नावे देण्यात आली आहेत. खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, पेनंब्रल चंद्रग्रहण अशी वेगवेगळ्या स्थितीतील चंद्रग्रहण आहेत. तसेच खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण​, कंकणाकृती सूर्यग्रहण असे सूर्यग्रहाणाच्याही स्थिती आहेत. मात्र २४ आणि २५ जुलै रोजी शनी चंद्र ग्रहण होणार आहे. ही स्थिती आकाशात फारच क्वचित दिसून येते. आता या दोन दिवसानंतर बरोबर १८ वर्षानी अशी खगोलीय स्थिती आकाशात दिसून येणार आहे. त्यामुळेच या दोन दिवसातील आकाशातील खगोलीय स्थिती पहाण्यासाठी आणि टिपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी योग्य ठिकाणी गर्दी केली आहे.

यावेळी चंद्र आपल्या छायेत शनिला लपवणार आहे. शनि चंद्राच्या मागे लपेल आणि शनीचे वर्तुळ चंद्राच्या कडांवरुन दिसणार आहे. या खगोलीय घटनेला शास्त्रज्ञ शनीचा चंद्र ग्रहण म्हणतात. २४ आणि २५ जुलैच्या मध्यरात्री भारतात काही तासांसाठी ही स्थिती दिसणार आहे. २४ जुलै रोजी १.३० वाजल्यापासून हे शनी चंद्र ग्रहण सुरु होणार आहे. नंतर पुढच्या १५ मिनिटांत म्हणजे १.४५ पर्यंत, चंद्र शनि ग्रहाला पूर्णपणे झाकून घेईल आणि स्वतःच्या मागे लपवेल. ४५ मिनिटांनंतर म्हणजेच २ वाजून २५ मिनिटांनी चंद्राच्या मागून शनि दिसू लागणार आहे. (Saturn Lunar Eclipse)

===========

हे देखील वाचा :  चंद्रावर जाण्यासाठी सूपर हायवे !

==========

ही अदभूत खगोलीय घटना केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी हे दृश्य पाहायला मिळणार आहे. श्रीलंका, म्यानमार, चीन आणि जपानमध्ये देखिल ही खगोलीय घटना पहाता येणार आहे. हे शनी चंद्र ग्रहण अतिशय दुर्मिळ आहे. शनीचे चंद्रग्रहण का होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शनी आणि चंद्र हे दोन्ही ग्रह आपापल्या गतीने आपला मार्ग बदलतात तेव्हा चंद्राच्या मागून शनी उगवताना दिसतो. यामध्ये शनीची वलये सर्वात जास्त दिसतात, शास्त्रज्ञांच्या मते, हे दृश्य आकाशात उघड्या डोळ्यांनीही पहाता येणार आहे. मात्र, शनीची वलये पाहण्यासाठी चांगल्या दुर्बिणीचा वापर करावा लागणार आहे. या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये पुन्हा असेच दृश्य अवकाशात दिसणार आहे. मात्र १४ ऑक्टोबर रोजी होणारी ही खगोलीय घटना भारतातून दिसणार नाही. भारतात अशी घटना १८ वर्षांनी दिसणार आहे. त्यामुळेच २४ आणि २५ जुलै हे दिवस खगोलीय घटनांची आवड असणा-यांसाठी महत्त्वाचे आहेत.

या खगोलीय घटनेचे फोटो टिपण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भारतातील खगोलशास्त्रज्ञ या खगोलीय घटनेसाठी उत्सुक आहेत. मात्र सध्या भारतात सर्वदूर पावसाचे वातावरण आहे. मध्यरात्री पावसाचा जोर वाढलेला असतो. अशावेळी ढगाळ वातावरणामुळे ही खगोलीय घटना बघता येणार का याची चिंता अनेकांना सतावत आहेत. त्यामुळेच अनेक खगोलशास्त्रज्ञ या घटनेला प्रत्यक्ष पहाण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी कमी पाऊस असलेल्या ठिकाणी गेले आहेत. ज्या नागरिकांना शक्य असेल त्यांनी या अदभूत घटनेला प्रत्यक्ष पहावे, त्याचे आरोग्यावर कोणतेही परिणाम होणार नाहीत, असे आवाहन आणि ग्वाही, खगोल शास्त्रज्ञांनी दिली आहे. (Saturn Lunar Eclipse)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.