Home » संजय कुमार याचं पराक्रम !

संजय कुमार याचं पराक्रम !

by Team Gajawaja
0 comment
Rifleman Sanjay Kumar
Share

आपण जेव्हा लहान असतो, तेव्हा मोठं होऊन आपण डॉक्टर, इंजिनियर, गायक, क्रिकेटपटू, चित्रकार, आर्किटेक्ट व्हावं, अशी स्वप्नं पाहतो. पण एकदाचे मोठे झालो की आयुष्य भलत्याचं गोष्टीकडे कललेलं असतं. काही लोकांना तर मेहनत करूनसुद्धा आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही. मोजकी लोकं त्यांचं लहानपणी ठरवलेलं ध्येय गाठतात. पण एखादा व्यक्ती एकेकाळी सामान्य ड्रायव्हर होता आणि त्याने भविष्यात त्याचा चक्क परमवीर चक्राने सन्मान झाला, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. सैन्यात जाण्याचं स्वप्न नव्हतं पण नियतीने सैन्यात नेलं आणि पुढे त्यांनीच मिळवला परमवीर चक्र पदक त्यांचं नाव होतं रायफलमॅन संजय कुमार ! कारगिल युद्धाला 25 वर्ष सरली, पण आजही आठवणी कायम आहेत. या युद्धात अनेकांनी शौर्य गाजवलं, पण ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला, ते परमवीर झाले. त्यापैकीच एक म्हणजे संजय कुमार !

संजय कुमार यांचा 3 मार्च 1976 ला हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे झाला. पाच भावंडांमध्ये संजय हे सर्वात लहान, त्यामुळे लाड तर फारच झाले. आर्मीमध्ये जाणं ही त्यांच्या गावातल्या मुलांची खास आवड ! त्यांचे वडील शेतकरी त्यामुळे सिंपल ग्रामीण लाईफ पण त्यांचे काका लष्करात होते आणि मोठा भाऊ आयटीबीपीमध्ये होता, त्यामुळे त्यांचं घर डीफेन्स बॅकग्राऊंडच दहावी पास केल्यानंतर ते ड्रायव्हींग शिकायला दिल्लीला गेले. ड्रायव्हींग उत्तम झाल्यानंतर दिल्लीमध्येच जॉब सुरू केला. पैसे कमावले आणि लक्ष परत केंद्रित केलं आर्मी भरतीकडे ! तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण संजय कुमार तीन वेळा आर्मी भरतीत फेल ठरले होते. मात्र आपल्या जिद्दीच्या जोरावर 1996 साली ते आर्मीमध्ये भरती झाले. (Rifleman Sanjay Kumar)

13 जे एंड के रायफल्समध्ये जनरल ड्यूटी सोल्जर म्हणून भरती झाल्यानंतर त्यांनी दहशतवाद विरोधी प्रशिक्षणसुद्धा घेतलं. यानंतर त्यांचं रेजिमेंट शहाजनपुरला निघालं असतानाच कारगिल युद्ध सुरू झालं होतं. यावेळी संजय कुमार यांना कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये पाठवण्यात आलं होतं. यावेळी संजय कुमार यांचं वय केवळ 23 वर्ष होतं. त्यांच्यासमोर पॉइंट 4875 चा फ्लॅट टॉप गाठण्याची जबाबदारी होती. त्यांच्या तुकडीतील सर्व सैनिक पुढे सरकत होते. तीस तास झोप नव्हती. सलग अठरा तास कठीण चढण सुरूच होतं. त्यात गोठवणारी थंडीसुद्धा  अशातही 13 जे एंड के रायफल्सच्या चार्ली कंपनीच्या जेसीओ आणि साठ जवान पाकिस्तानी बंकरच्या जवळ पोहोचत होते.

3-4 जुलैची ती रात्र चार्ली कंपनीचे सैनिक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने 17 जाट बटालियनचे जवान पाकिस्तानी बंकर्सवर हल्ला करणार होते. दोन्ही तुकड्या हळू हळू पुढे सरकणार होत्या. पुढे काय होईल, याचा विचार न करता ते निर्धाराने एक एक पाऊल पुढे टाकत होते. यावेळी चार्ली कंपनी पाकिस्तानी बंकरपासून सव्वाशे मीटरच्या अंतरावरच एका घळीसारख्या खोलगट भागात थांबले होते. संजय कुमार केवळ कमांडिंग ऑफिसरच्या आदेशाची वाट पाहत होते. यावेळी बंकरवर थेट पळत जाऊन हल्ला करायचा, असा निर्णय घेण्यात आला आणि रायफलमॅन संजय कुमार आणि नजिंदर सिंग हे खडतर काम पूर्ण करायला तयार झाले. (Rifleman Sanjay Kumar)

भारताच्या बोफोर्स शिखराच्या पायथ्यापासून पाकिस्तानी बंकरवर हल्ला करतच होते. तेवढ्यात शिखरावर एक गोळा पडला आणि मिनिटभरासाठी पाकिस्तानी मशीनगनचा मारा थांबला. याचीच संधी साधून दोघेही आपल्या बंदुका हातात घेऊन पुढे निघाले. सगळं अंधुक असल्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना काहीच दिसलं नाही आणि संजय कुमार, नजिंदर हे दोघे चक्क बंकरच्या खाली पोहोचले आणि तिथेच शांत बसून राहिले. एवढ्यात संजय कुमार यांनी ग्रेनेड काढला आणि तो थेट बंकरमध्ये भिरकावला. पाक सैनिकांच्या किंकाळ्या घुमल्या. संजय कुमार अजूनही त्या ठिकाणी दडून बसले होते. धुरळा कमी झाला, आणि त्यांनी उठून तशाच हातांनी गरम झालेली मशीनगन धरली आणि ती उखडून समोरच्या दगडावर फेकली. याचवेळी त्यांनी आपल्या बंदुकीने आणखी तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं आणि अशाप्रकारे भारतीय सैन्याने एक टप्पा पूर्ण केला. (Rifleman Sanjay Kumar)

पहिला बंकर जिंकल्यानंतर भारताचे सर्व जवान आता पाकिस्तानच्या दुसऱ्या बंकरकडे वळले. पण एवढ्यातच इतर संगरमधून पाकिस्तानी सैनिक बाहेर पडले आणि त्यांनी पोजीशन्स घेतल्या. एवढ्यातच भारतीय सैनिकांनी गोळीबार सुरू केला. पण पाक सैन्यांच्या प्रचंड गोळीबारामुळे संजय कुमार यांनाही पाच गोळ्या लागल्या. तसेच त्यांचे अन्य साथीदार जखमी झाले आणि काही शहीद झाले. संजय कुमार मृत असल्याचं सोंग घेऊन एका दगडावर निपचित पडून राहिले. पंधरा मिनिट पाक सैनिकांचा गोळीबार सुरूच होता. त्यांना वाटलं की एकही भारतीय सैनिक आता वाचलेला नाही. यावेळी पाक सैनिक तिसऱ्या बंकरकडे सरकत होते, पण तिथे एकही शत्रू वाचला नव्हता. इतक्यात जखमी संजयकुमार हे त्या मशीनगनपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ती पाक सैनिकांवर फिरवली आणि सर्वांना ठार केलं. (Rifleman Sanjay Kumar)

भारताने शिखर जिंकला, तिरंगा फडकला. संजय कुमार जखमी होते, पण त्यांच्या मुखावर एक स्मितहास्य होतं, विजयाचं ! शिखर जिंकल्यानंतर पाहणी करण्यात आली. तिथे 15 पाकिस्तानी सैनिक मृत पडले होते. जखमी भारतीय जवानांना हातांनी आधार देत खाली आणलं जात होतं. पण पाच गोळ्या लागूनही संजय कुमार चालू शकत होते. त्यांना पाहून सर्वांना आश्चर्यच वाटलं. ते चालतच खाली आर्मीच्या बेसजवळ पोहोचले. सैनिकांना उतरायला पूर्ण रात्र गेली. यानंतर अॅम्ब्युलेन्समध्ये बसून संजय कुमार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. (Rifleman Sanjay Kumar)

===========

हे देखील वाचा :  म्हटलेलं वाक्य त्याने युद्धभूमीवर खरं केलं !

==========

संजय कुमार यांच्या डोळ्यांसमोर तो पूर्ण प्रसंग चालूच होता. त्यांचे कितीतरी सहकारी शहीद झाले होते. आपल्याला माहीत नसणाऱ्या कितीतरी शत्रू सैनिकांना त्यांनी ठार केलं होतं. त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं, मात्र यासाठी भारत सरकार त्यांचा असा गौरव करेल, हे त्यांना माहीत नसावं. महिनाभर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले, ते परमवीर चक्रासोबत एका सामान्य माणसाने केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्याच्या देशासाठी असामान्य कार्य करून दाखवलं. आज परमवीर चक्राने सन्मानित होणारे तीनच वीर जिवंत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे संजय कुमार आता त्यांची बढती सुबेदार मेजर या पदावर करण्यात आली आहे आणि आजही ते सैन्याला आणि युवकांना मार्गदर्शन करत असतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.