Home » या मंदिरात भरतो विषारी सापांचा दरबार !

या मंदिरात भरतो विषारी सापांचा दरबार !

by Team Gajawaja
0 comment
Nagpanchami
Share

एखादा साप समोर आला तर भल्याभल्यांनाही भीती वाटते. त्यातच तो साप जर विषारी असेल, तर या भीतीत अधिक भर पडते. पण उत्तरप्रदेशमध्ये असे एक गाव आहे की, ज्या गावातील प्रत्येक घरात साप आहेत. फारकाय या गावात एक सापांचे मंदिरही आहे. या मंदिरात विषारी सापांची दरबार भरतो. या नागदेवतेची पुजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आहे. बाराबंकी जिल्ह्यातील मजिठा या गावातील या मंदिराला पौराणिक वारसा आहे. चातुर्मास सुरु झाल्यावर या मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागते. (Nagpanchami)

आषाढ महिन्यात येथे मोठा मेळा भरतो. तर श्रावण महिन्यात येणा-या नागपंचमीला या मंदिरात दूरदूरवरुन भाविक येतात आणि नागदेवतेची पुजा करतात. हे भाविक नागदेवतेला दूध आणि तांदूळ अर्पण करतात. बाराबंकी जिल्ह्यातील मजिठा येथील पौराणिक नाग देवता मंदिरात सध्या नागपंचमीसाठी तयारी सुरु झाली आहे. या मंदिरात नागपंचमीच्या आधी मोठा मेळा भरतो. आषाढ महिन्यात सुरु झालेला हा मेळा श्रावण महिन्यापर्यंत चालतो. या मजिठा येथील नाग देवता मंदिराची अनेक वैशिष्टे आहेत.

या मंदिरात येणा-या प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण होते, असे सांगितले जाते. शेकडो वर्षे जुने असलेल्या या नागदेवता मंदिरात श्रावण महिन्यात नागपंचमीला जत्रा भरते. या दिवशी नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी रात्री बारा वाजल्यापासून भाविकांच्या रांगा लागतात. यामध्ये या भागातील शेतक-यांचा प्रामुख्यानं समावेश असतो. शेतात काम करतांना ब-याचवेळा साप दिसतात किंव ते डंख मारण्याची भीती असते. अशावेळी या नागदेवता मंदिरात गेल्यावर साप चावत नाहीत, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळेच फक्त या बारबांकी जिल्ह्यातील नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरीही या नागदेवता मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. (Nagpanchami)

आषाढ आणि श्रावण महिन्यात शेतीची कामं पूर्ण झाली की या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात.बाराबंकी जिल्ह्याच्या हैदरगढ रोडवर जिल्हा मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या या मंजिठा गावात हे नागदेवता मंदिर आहे. पण या मंदिरासोबत संपूर्ण मंजिठा गावही प्रसिद्ध आहे. या गावातील बहुतांशी सर्वच घरात साप आहेत. हे साप तेथील कुठल्याही माणसाला चावत नाहीत. मंजिठा गावात प्रत्येक घरात सापांची पूजा केली जाते. या सापांना दूध आणि तांदळाचा नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमीच्या दिवशी हेच साप घराबाहेर पडतात. नागपंचमीच्या दिवशी हे साप या मंदिरात जातात आणि त्यांचा दरबार भरतो, अशी स्थानिकांची धारणा आहे.

या मंदिराबाबत एक आख्यायिकाही आहे. मजिठा येथे ज्या ठिकाणी नागदेवतेचे भव्य मंदिर बांधले आहे, त्या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक विषारी साप राहत होता. त्याने अनेकांना चावा घेतला होता. सापांच्या भीतीने लोक जंगलात जात नव्हते. एकदा महात्मा गौतम बुद्ध या गांवातून जंगलात जात होते. तेव्हा नागरिकांना त्यांना रोखलं आणि विषारी सांपाचे कारण सांगितले. हे ऐकून महात्मा बुद्ध हसले आणि जंगलात गेले. बराच वेळ ते परत न आल्याने गांवकरी काळजीत पडले. पण थोड्यावेळांनी गौतम बुद्ध सांपासह परत आले. त्यांना सापाला दूध देऊन शांत करा असे सांगितले. तेव्हापासून मजिठा येथे जत्रा भरू लागली. (Nagpanchami)

===============

हे देखील वाचा :  ‘या’ देशात होते सापांची शेती…

===============

सध्या नागदेवतेचे भव्य मंदिर बांधले आहे. भाविक दूध आणि तांदळांची लहान भांडी या नागदेवतेला अर्पण करतात. भाविक प्रसाद म्हणून भांडे घरी घेऊन जातात आणि चार कोपऱ्यात ठेवतात. घरात भांडे असेल तर साप येत नाहीत, अशी त्यांची श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी या गावात विशेष मेळा असला तरी त्याची तयारी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून होते. यापासूनच मोठ्या संख्येनं भाविक मंदिरात गर्दी करतात. यावेळी अनेकांना नागदेवतेचे प्रत्यक्ष दर्शन घडते. हा शुभशकून मानला जातो.

या मंदिरात अनेक आजारी व्यक्ती आराम पडावा म्हणून नागदेवतेला मातीच्या भांड्यातून दूध अर्पण करतात. नागदेवतेने हे दूध प्यायल्यास त्या व्यक्तीला आराम पडतो, असे सांगितले जाते.याशिवाय येथे सापाच्या आकाराच्या मातीच्या लहान मुर्तीही नागदेवतेच्या मुर्तीला अर्पण केल्या जातात. यामुळे दुर्धर आजारांवरही मात करता येते, असे सांगितले जाते. वर्षभर या मंदिरात भाविक येत असले तरी आषाढ आणि श्रावण महिन्यात येणा-या भाविकांची संख्या दुप्पटीनं वाढलेली असते. (Nagpanchami)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.