समस्येच्या स्वरूपानुसार तो आकार धारण करणं… समस्या समजावून घेऊन तिच्याशी दोन दोन हात करणं… आणि समस्येशी एकरूप होणं… म्हणजेच कृष्ण होणं… श्री कृष्णासारखा मोस्ट फ्लेक्सिबल व्यक्तीमत्व गेल्या अनेक युगांत झाला नाही आणि पुन्हा होणेही नाही.. न भूतो न भविष्यति..!!
म्हणूनच कदाचित तुमचा.. आमचा.. आणि सगळ्यांचाच लाडका.. नटखट.. लबाड.. अत्यंत हुशार पण तरीही निरागस बाळकृष्ण… प्रिय मित्र-सवंगडी… आदर्श भाऊ… उत्तम प्रियकर… कर्तव्यदक्ष पती… श्रेष्ठ योद्धा… उत्कृष्ठ सारथी… थोर समाजसुधारक… महान तत्त्ववेत्ता…
असे श्री भगवान गोपाळ कृष्ण त्यांची आज जयंती… आजचा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी… श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री १२ : ०० वाजता मथुरेत कंसमामांच्या बंदिशाळेत श्री लड्डूगोपाल जन्माला आले… म्हणून हा दिवस श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण भारतभरात साजरा केला जातो… कंसमामांच्या अनेक त्रासांतून.. पिडांमधून मुक्त होता यावे म्हणून श्री वसुदेव महाराज श्रीकृष्णाच्या जन्मानंतर रातोरात देवाला टोपलीत झोपवून.. गोकुळात श्री नंद पाटलांच्या घरी सुखरूप पोहचवतात…
“चले वसुदेव आज गोकूल धामा….”
“चले वसुदेव आज गोकूल धामा….”
आणि गोकुळात सकाळी नंद पाटलाला पुत्रप्राप्ती झाली आहे… म्हणून एकच जल्लोष सुरू होतो… सारा सारा आसमंत आनंदाने नाहून निघतो…
“नंद घेरा आनंद भयो, जय कन्हैयालाल की…!”
“यशोदा को लालो भयो, जय कन्हैयालाल की..!!”
“हाथी घोडा पालखी, जय कन्हैयालाल की..!!!”
प्रत्येकाच्या मनांत श्रीकृष्ण अजूनही जिवंत आहे.. श्रीकृष्ण नेहमी आपल्यातलाच एक कोणीतरी खास वाटतो… कोणतंही लहान मुल नटखट, हट्टी, लबाड असेल.. त्या लहान मुलाला नटखट बालकृष्णाची उपमा दिली जाते.. आणि श्रीकृष्णाच्या बाल लीला आठवल्याशिवाय राहत नाहीत…
प्रत्येक मुलीला तिचा प्रियकर किशन-कन्हैय्यासारखाच हवा असतो.. रोमँटिक, खूप जीव लावणारा, तिला समजून घेणारा.. जसा राधेसाठी नेहमी तिचा कृष्ण होता.. म्हणून त्यांचं प्रेम आजही अमर आहे… म्हणूनच हा मुरलीधर शाम “उत्तम प्रियकर” होता…
बहिणीवर जीव ओवाळून टाकणारा भाऊ.. संकटसमयी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला भाऊ.. अशा बहीण-भावाच्या जोडीला बघता क्षणीच सहजरित्या श्रीकृष्ण-द्रौपदीची आठवण होते… महाभारतात राखी म्हणून चिंधी बांधल्यावर द्रौपदीचा रक्षणकर्ता म्हणून श्रीकृष्ण कायमस्वरूपी तिच्या पाठीशी राहिला.. भरसभेत वस्त्रहरणाच्या पेचप्रसंगातुन द्रौपदीच्या केसालाही धक्का न लागू देता.. तिच्या भावाने नारायणाने तिला सुखरूप बाहेर काढले…
“भरजरी गं पितांबर दिला फाडून….!
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण….!!”
म्हणून श्रीकृष्ण- द्रौपदीची उपमा दिली जाते… हा गोपालकृष्ण “आदर्श भाऊ” सुद्धा होता…
दोन मित्रांची जोडगोळी बघताच आणि त्या दोघांमधील..
“ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे..
तोड़ेंगे दम मगर…
तेरा साथ न छोड़ेंगे….”
एवढे परकोटीचे प्रेम बघितल्यावर ‘श्रीकृष्ण आणि सुदामा ब्राह्मण’ ही जोडगोळी आठवतेच.. सुदाम्याच्या पुरचुंडीतल्या पोह्यांच्या बदल्यात.. श्रीकृष्णाने सुदाम्याला सुवर्ण-सुदामपुरी भेट म्हणून देऊ केली.. निस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेमामुळे.. विश्वासामुळे! श्रीकृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीचे आजही दाखले दिले जातात… मोरोपंतांची ह्या प्रसंगाला अनुसरून फार सुंदर आर्या आहे…
“ऋण तरी मूठभरी पोहे ।
त्याच्या व्याजात हेमनगरी ती ।
मुद्दलात मुक्ती देणे ।
ही कोण्या सावकाराची रीती ।।”
त्या विश्वेश्वराने ऋण म्हणून काय घेतले.. फक्त एक घास पोहे.. कर्जाचे व्याज सुदामपुरी सुवर्णनगरी करुन सोडली.. व्याज दिलं पण मुख्य मुद्दल द्यायचे राहिले आहे.. मुद्दल म्हणून सुदामा ब्राह्मणाला मुक्ती दिली… हे श्रीकृष्णाने सुदाम्यासाठी केले कारण सुदाम्याच्या मनातील स्वतःबद्दलचे प्रामाणिक प्रेम ओळखले… म्हणून आजही श्रीकृष्ण-सुदामा ही प्रिय मित्र-सवंगडी जोडगोळी म्हणून ओळखली जाते…
ह्या बाकेबिहारीला एकूण ०८ राण्या होत्या… त्यातली रुख्मिणी ही पट्टराणी… आणि सत्यभामा.. जांबुवती व इतर ०५ राण्या होत्या… ह्या सगळ्या राण्या युद्ध करून जिंकलेल्या होत्या.. प्रत्येक राणीचे हट्ट पुरवणारा.. कधीच कर्तव्यात कसूर न ठेवणारा.. हा भगवंत कर्तव्यदक्ष पती होता… श्रीकृष्णाने कर्तव्यदक्ष आणि कुटूंबवत्सल पती म्हणून कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली… आणि त्यामुळेच कुटुंब एकत्रितरित्या बांधून ठेवण्यात यशस्वी झाले… श्रीकृष्णाच्या युगांपासून एकत्र कुटुंबपद्धतीचे आदर्श समाजात मांडले गेले आहेत…
हा जगज्जेता जगदीश्वर श्रेष्ठ योध्दाही होता… युद्धनीती आणि युद्धप्रसंगाला अनुसरून श्रीकृष्णाने केलेले “कालियामर्दन” आठवते… “कालिया” हा सर्प होता.. यमुनेच्या डोहामध्ये त्याने अतिक्रमण केले होते… त्याचा रमणक द्वीप सोडून तो यमुनेत आला होता.. पाणी विषारी करू लागला.. गुरं-ढोरं.. पोरं-बाळं.. निरागस लोकं मरू लागली… थोडक्यात कालियाने आतंकवाद पसरवायला सुरुवात केली..
हे कृष्णाला समजल्यानंतर श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी घेतली..कालियाला धोबीपछाड केले… त्याच्या फण्यावर उभे राहिले आणि त्याच्याशी युद्ध केले.. कालियाला दरडावून सांगितले.. तुला रमणक द्वीप सोपवला होता.. तरी तो सोडून इकडे का आलास.. असं अतिक्रमण केलेलं चालणार नाही.. आणि कालियाला भगवंताने पळवून लावले.. आणि यमुनेचा डोह स्वच्छ झाला…
ह्याचप्रमाणे काश्मीरमधील आतंकवादी-दहशतवादी रुपी कालियाला पळवून लावण्यात आपले भारतीय नौ-जवान अथक प्रयत्नांनंतर यशस्वी झाले आहेत… आणि ह्यावर्षी पहिल्यांदा संपूर्ण काश्मिरात तिरंगा फडकला… आता काश्मीरमधलं वातावरण यमुनेच्या डोहाप्रमाणेच हळुहळू निर्मळ होतं आहे… ही शिकवण निडर योद्धा श्रीकृष्णाकडुन मिळालेली प्रेरणाच आहे…
श्रीकृष्ण उत्कृष्ठ सारथी आणि मार्गदर्शकही होता… श्रीमद भगवतगीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करतांना श्रीकृष्ण म्हणतात.. मी कुठे कुठे आहे.. सगळ्या चराचरात मी समावलेलो आहे… हा जगतनियंता वृक्षामध्ये आहे… वैश्वानर-अग्निमध्ये आहे.. (ज्याच्या पोटात भुकेने व्याकुळ होऊन अग्नी प्रदीप्त होतो), नामात मी आहे.. अर्जुनाला सांगितले आहे… “माम अनुस्मर युद्धच।”
अर्जुना तुझं कर्मही सुरू ठेव… आणि नामस्मरणही सुरू ठेव.. फक्त कर्मही करू नकोस आणि फक्त नामस्मरणही करू नकोस.. कारण तुझ्यावर प्रपंचातल्या जबाबदाऱ्या आहेत.. सर्व प्रापंचिकांना गीतेत दिलेला हा सल्ला आहे… गीतेत कर्मयोगाला विशेष महत्व दिले आहे…
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
कर्म करत चला… फळाची अपेक्षा करू नका… निरपेक्ष भावनेने कर्म केल्यास… कर्तव्य केल्यास त्याच्या बदल्यात योग्यवेळी फळ मिळल्यावाचून राहणार नाही.. परंतु कलियुगात सद्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवता यावी म्हणून कर्माबरोबरच नामाचे महत्व गीतेमध्ये पटवून दिले आहे..
म्हणूनच -; “माम अनुस्मर युद्धच ।”
अर्जुना.. तुझे युध्दही सुरू ठेव.. आणि माझे स्मरणही सुरू ठेव… म्हणजेच नामस्मरणही सुरू ठेव… अशाप्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत होते.. आणि जीवनविषयक मोलाचे मार्गदर्शनही करत होते.. हेच मार्गदर्शन आज कलियुगातही मार्गदर्शक तत्वे म्हणून तंतोतंत उपयोगीच पडतात..
स्त्री-मुक्तीचा पहिला कार्यकर्ता म्हणजे श्री भगवान गोपालकृष्ण… नरकासुर राक्षसाच्या बंदिशाळेत.. नारकसुराने १६,१०० स्त्रियांना बंदीवासात ठेवले होते.. नरकासुरच्या तावडीतून सुटून त्या १६,१०० स्त्रियांसमोर दोनच पर्याय होते.. समुद्रात अंग टाकून जीव देणे.. किंवा शरीरविक्रय करणे.. कारण त्या स्त्रियांना समाज पुन्हा स्वीकारणार नव्हता.. पण श्रीकृष्णाने त्यांना सांगितले असं काही करू नका.. आणि भगवंताने त्या सर्व स्त्रियांना कुंकवाचा अधिकार दिला.. श्रीकृष्ण त्यांच्या कुंकवाचे धनी झाले.. म्हणून भगवान श्रीकृष्ण थोर समाजसुधारक.. स्त्रीमुक्तीचे प्रथम प्रणेते होते.. आणि आज त्यांच्याच राष्ट्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरत आहेत..
तुम्ही एखादं धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक कार्य किती मोठ्या प्रमाणात करतात.. थाट-माट, शोमनशिप, बडेजाव कसा करतात ह्याला महत्त्व नाही.. पण तुमच्या मनातील भाव-भक्ती किती प्रामाणिक आहे.. ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे.. -; एकदा कृष्ण व त्याचे सवंगडी अरण्यात गेले.. त्यादिवशी ते शिदोरी न्यायची विसरले होते.. तेथे यज्ञ सुरू होता.. ह्या बाळ-गोपाळांच्या लक्षात आले की येथे खायला मिळेल.. ब्राह्मणांचा मंत्रघोष मोठं-मोठ्याने सुरू होता.. ह्यांनी सगळ्यांनी सांगितले, अहो.. आम्ही सगळे भुकेले झालेलो आहोत.. आम्हाला खायला मिळेल काय..? त्या ब्राह्मणांनी सांगितले, अजून आमच्या यज्ञाची पूर्णाहुती झाली नाही.. तरी तुम्ही जेवायला मागतात.. तुम्हाला लाजा वाटत नाहीत.. असे बोलून ह्या बाळ-गोपाळांना पळवून लावले..
हे सर्व ब्राम्हण विद्वान होते.. ज्ञानी होते.. पण चित्तामध्ये भाव-भक्ती-ओलावा नव्हता.. म्हणून ते ह्या बाळ-गोपाळांना “चालते व्हा” असं कोरडेपणाने म्हणू शकले.. मागच्या बाजूला ऋषीपत्नींचा स्वयंपाक सुरू होता.. तिकडे ह्या बाळ-गोपाळांनी सांगितलं आम्हाला भूक लागली आहे पण आम्हाला तुमच्या नवऱ्यांनी हाकलून दिलं.. ऋषीपत्नींना दया आली.. त्यांनी ह्या सगळ्यांना नैवेद्याच्या आणि पूर्णाहुतीच्याआधी जेवायला वाढून दिले.. भगवंत तृप्त झाले आणि त्यांनी साक्षात सगुण स्वरूपात ऋषीपत्नींना दर्शन दिले..
मग याचा काय अर्थ घ्यायचा.. सगळ्या ब्रह्मांडाला जेवू घालणारा जगदीश्वर भुकेला कसा होता..? तो उपाशी कसा राहील..? यज्ञात सगळा थाट-माट उत्तम होता.. पण तिथे भाव नव्हता, भक्ती नव्हती.. म्हणून देव उपाशी होते… देव भावाचा भुकेला आहे… म्हणूनच भगवंत महान तत्ववेत्तेसुद्धा होते.. तत्वांचे-न्यायाचे पक्के.. भगवंताकडे रोकडा न्याय असतो…
“तू मेरे नाम पर, मैं तेरे काम पर ।
तू तेरे काम पर, मैं मेरे धाम पर ।”
श्रीकृष्णाच्या बाललीलामध्ये सगळ्यात आवडती आणि मोहक लीला म्हणजे कृष्ण त्यांच्या सवंगाड्यांसोबत गोकुळातल्या घरोघरी दूध, दही , तूप, लोणी फस्त करण्याच्या हेतूने दहीहंडी आणि गोपाळकाला करायचे.. श्रीकृष्ण.. वाकड्या.. पेंद्या.. वडज्या.. सुदाम्या.. कधी कधी बलराम दादा.. ह्यांना सोबत घेऊन गवळणींच्या घरात घुसून दुपारच्या वेळी सगळी जिन्नस फस्त करायचे.. श्रीकृष्णाची दहीहंडी – गोपाळकाला ह्या लीला सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरत होत्या..
मित्रांच्या बाबतीत जात-पात.. रंग-वर्ण-आर्थिक स्तरांच्या भेदाची तमा न बाळगता श्रीकृष्णाने सगळ्या सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून प्रत्येकाला आपल्या हाताने घास भरवले.. ह्यालाच “गोपाळकाला” म्हणून ओळखले जाऊ लागले.. “दहीहंडी” मध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी कृष्ण सगळ्यांना एकत्र करायचा.. एकत्र येऊन कोणतेही कार्य तडीस नेता येऊ शकतं… टीमवर्क आणि युनिटीचे महत्त्व श्रीकृष्णाने “दहीहंडी” ह्या बाललीलेतून समजावून दिले..
आजही “जन्माष्टमी” आणि “दहीहंडी” चा उत्सव जल्लोषात साजरा होतो.. प्रत्येक शहरात आणि खास करून मुंबईत “दहीहंडी-गोपाळकाला” उत्सवात अनेक गोविंदा पथकं हिरीरीने भाग घेतात.. आणि अनेक थरांवर थर चढवलेला दहीहंडीचा नयनरम्य सोहळा भान हरपून बघायला मिळतो.. दहीहंडी जास्तीतजास्त थरांची बनवण्यात अनेक गोविंदा पथकं उत्साहाने सहभाग घेतात.. अनेकदा अपघातही होतात.. पण श्रीकृष्णावरच्या प्रेमापोटी सगळे गोविंदा हार न मानता दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नांत असतात.. आणि उत्कृष्ठ दर्जाच्या टीमवर्कचा नमुना देत.. दहीहंडी फोडली जाते…
आजकाल दहीहंडीचं स्वरूप ग्लॅमरस झालं आहे… अनेक गटात दहीहंडी फोडण्यासाठी चुरशीची लढत असते… मोठमोठी बक्षिसेही जाहीर केली जातात… अनेकदा हया प्रकारच्या दहीहंडी सोहळ्याची तुलना श्रीकृष्णाच्या दहिहंडीशी केली जाते… आणि सध्याच्या दहीहंडी सोहळ्यांवर टिका केली जाते.. पण तरी सळसळत्या तरुणाईतला “दहीहंडी” उत्सवातल्या जल्लोष आणि उत्साहामुळे त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या टिकेचा आणि टिकेकऱ्यांचा कधी विसर पडतो हे आपल्यासारख्यांना कळत देखील नाही…
आपण जो प्रत्येक अन प्रत्येक क्षण साजरा करू इच्छितो.. त्यामुळे आपसूकच त्या “गोविंदांमधलेच” आपणही एक आहोत असे समजायला लागतो.. आणि त्या “दहीहंडी – गोपाळकाल्यातील” गोविंदा पथकांमध्ये आपल्याला आपला नटखट.. छेनछबिला.. रासरचेईय्या गोपालकृष्ण गवसायला लागतो.. आणि हेच कदाचित श्रीकृष्ण मनापासून आवडण्याचं आणि जिवंत मनाचं लक्षण आहे…
तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमी – गोपाळकाला – दहीहंडीच्या आभाळभर शुभेच्छा…!!!
गोविंदा आला रे आला….
जरा मटकी संभाल ब्रिजबाला…..
लेखन : भक्ती उपासनी