जेव्हा जेव्हा भारतीय राजकारणात फाळणीचा विषय येतो तेव्हा महंमद अली जीना यांचे नाव पुढे येतं. भारत पाकिस्तानच्या फाळणीसाठी जिनांना दोषीही धरलं जातं. पण जिना यांची ओळख एवढीच नव्हती. जिना हे कोणेएकेकाळी नावाजलेले वकील होते. आणि याच जिनांनी लोकमान्य टिळकांची बाजूही मांडली होती. ती ही दोनदा. (Tilak and Jinnah)
आनंद हर्डीकर यांनी लिहिलेल्या कायदे आझम या जिनांच्या चरित्रात हा किस्सा सांगितलाय. १८९७ साली टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल झाला होता. शिवाजीचे उद्गार या लेखासाठी टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. तेव्हा टिळकांची बाजू मांडली होती बॅरिस्टर दावर यांनी. दावर यांनी बाजू मांडल्यानंतर टिळकांना जामीन मंजूर झाला होता. १९०८ साली दोन लेखांमुळे टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा खटला दाखल झाला होता. १२ मे १९०८ ला प्रसिद्ध झालेला देशाचे दुर्दैव आणि ९ जून १९०८ ला प्रसिद्ध झालेला हे उपाय टिकाऊ नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दावर यांनी टिळकांची बाजू १८९७ ला मांडली होती तेच दावर आता न्यायमुर्ती होते. यावेळी टिळकांनी मोहम्मद अली जिना यांच्याकडे आपले वकीलपत्र दिले होते. जिना टिळकांचे लेख नेहमी वाचायचे. त्यांनी मोठ्या आनंदाने टिळकांचे वकीलपत्र स्विकारले.
१८९७ साली दावर यांनी जो युक्तिवाद केला, तोच युक्तिवाद यावेळी लागू होता. त्यामुळे टिळकांना जामीन मिळणे सोपे होते असे जिना आणि टिळकांना वाटले. पण दावर यांनी टिळकांना जामीन देण्याऐवजी त्यांना सहा वर्षाची शिक्षा सुनावली. टिळकांना जामीन मिळवून देण्यात आपण कमी पडलो अशी खंत जिनांना वाटली नाही. पण न्यायाधीश दावर यांच्याबद्दल जिनांच्या मनात कटुता निर्माण झाली. टिळकांना शिक्षा झाली म्हणून ब्रिटिश सरकारने दावर यांना नाईटहूड किताब दिला. या निमित्ताने मुंबई हायकोर्टाने दावर यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजन केले होते. यावर उपस्थित राहणाऱ्या वकिलांनी सही केली. (Tilak and Jinnah)
जिनांनी यावर सही केली तर नाहीच. उलट जिनांनी त्या कागदावर खरमरीत शेरा लिहिला. जिनांनी लिहिलं की सरकारी मनमर्जीपुढे मान तुकवून एका थोर देशभक्ताला कडक शिक्षा ठोठावणाऱ्या आणि त्या कामगिरीच्या मोबदल्यात सन्मानाचे पद पदरात पाडून घेणाऱ्या अशा न्यायाधीशाचा सन्मान करताना बार असोसिएशनला लाज वाटली पाहिजे. हा शेरा न्यायाधीश दावर यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी जिनांना बोलावून घेतलं. आणि असा शेरा का लिहिला अशी विचारणा केली. तेव्हा जिना म्हणाले की, मला वाटलं तेच मी लिहलं. आपण माझ्याशी जरी नीट वागत आला तरी आपण टिळकांवरचा खटला ज्या पद्धतीने चालवलात, त्याबद्दलच्या माझ्या तीव्र भावना दडपू शकलो नाही, म्हणून मी तसा शेरा लिहिला असे उत्तर जिनांनी दिले आणि निघून गेले.
पुढे १९१६ साली टिळकांवर पुन्हा सरकारने नोटिस बजावली. आणि यावेळी जिनांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होत. धनंजय कीर यांनी टिळकांच चरित्र लिहिलं आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे टिळकांनी १९१६ साली होमरुल लीग चळवळ सुरू केली होती. या चळवळीत त्यांनी स्वराज्याची कल्पना मांडली. टिळकांनी ३१ मे आणि १ जून १९१६ ला होमरुलवर दोन भाषणं केली आणि स्वराज्यावरची आपली भुमिका स्पष्ट केली. (Tilak and Jinnah)
23 जुलैला टिळकांचा ६० वा वाढदिवस होता. तेव्हाच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी टिळकांना नोटीस दिली. या नोटीशीत म्हटले होते की चांगल्या वर्तनाची टिळकांकडून हमी घेण्यासाठी एक वर्ष मुदतीसाठी वीस हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा एक असे दोन जामीन तुमच्याकडून का घेऊ नयेत. टिळकांनी ही नोटीस स्विकारली.
====================
हे देखील वाचा : ब्रिटनमध्ये १४ वर्षानंतर सत्तांतर
====================
टिळकांचे सहकारी या खटल्यासाठी मुंबईत जिनांना भेटले आणि त्यांना टिळकांचे वकीलपत्र दिले. 9 नोव्हेबर १९१६ ला मुंबई हायकोर्टात यावर सुनावनी झाली. जिनांनी टिळकांची जोरदार बाजू मांडली. जिना म्हणाले की सत्तेची सर्व सूत्रे एकवटलेल्या आणि लोकाना जबाबदार नसलेल्या नोकरशाहीवरच त्यांनी टीका केली आहे. होमरुल म्हणजेच अंतर्गत शासन हे त्या दिशेने टाकावयाचे एक पाऊल आहे आणि लोकांनी त्यात सहभागी झाले पाहिजे हे लोकांना समजावून सांगण्याचा त्यांचा हेतू होता. ब्रिटिश भारतात कायद्याने प्रस्थापित झालेल्या शासनासंबंधी अप्रीती पसरवण्या त्यांचा हेतू नव्हता हे त्यांची भाषणे स्पष्टपणे दर्शवतात. अशा शब्दांत जिना यांनी टिळकांची जोरदार बाजू मांडली. (Tilak and Jinnah)
जिनांनी मांडलेली टिळकांची बाजू न्यायालयाला पटली. १८९७ आणि १९०८ साली ज्या कोर्टाने टिळकांना शिक्षा सुनावली त्याच कोर्टाने टिळकांच्या उदिष्टाचे समर्थन केले होते. कोर्टाने टिळकांविरोधातील आरोप फेटाळून लावले आणि त्यांची निर्दोष सुटका केली. ज्या दिवशी कोर्टाने निकाल दिला त्या दिवशी टिळक कोर्टात हजर होते. टिळकांची जिना यांच्याशी हात मिळवला आणि अभिनंदन केले.