चीन आणि अमेरिका या दोन देशांचे संबंध कसे आहेत, हे लपून राहिलेले नाही. अमेरिका गेली अनेक वर्ष जागतिक महासत्ता हे बिरुद मिरवत आहे. मात्र सध्याच्या चीनला हे बिरुद मान्य नाही. चीनच्या मते अमेरिकेची सत्ता आता संपली आहे. सध्याचे अमेरिकेचे नेतृत्वही कमकुवत आहे. त्यामुळेच चीनने थेट अंतराळातून युद्धाची तयारी सुरु केल्याचा मोठा खुलासा झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
चीन अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून अंतराळात आपली लष्करी ताकद वाढवत असल्याचा अहवाल नुकताच एक संस्थेनं केला असून त्यांनी या युद्धासाठी अमेरिकेलाही सज्ज होण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आपलाच देश सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करीत आहेत. मात्र असे असले तरी गेल्या काही महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे रशिया आणि युक्रेन युद्धात गुंतल्याचे पाहून चीननं वेगळ्याच प्रांतात युद्धाची तयारी सुरु केली आहे. चीननं अतिशय गुप्तपणे एक मिशनची तयारी केली, आणि ही तयारी आता पूर्ण होत असल्याची माहिती हाती आली आहे. हे मिशन म्हणजे, थेट अंतराळातून युद्ध करण्याची तयारी. (China vs America )
अंतराळात आतापर्यंत अमेरिकेचे वर्चस्व होते. पण या वर्चस्वाला चीन, रशिया, भारत यांनी धक्का दिला आहे. त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाल्याचा अहवाल अमेरिकन थिंक टँक या नावानं रॅड यांनी प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार चीन अमेरिकेला अंधारात ठेवून अंतराळात आपली लष्करी ताकद वाढवत आहे. भविष्यात युद्ध झाल्यास चीन अमेरिकेच्या सॅटेलाईटला हॅक करण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गेल्या दोन दशकांत मिळवलेल्या अंतराळातील मोहीमांचे विश्लेषण आणि त्यांच्या क्षमतेची माहिती घेण्यासाठी हा अहवाल काढण्यात आला. या अहवालातून अमेरिकेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या अहवालातून रॅड यांनी अमेरिकेने आपल्या सुरक्षितेसाठी फार त्वरित निर्णय घेण्याच गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. यूएस स्पेस फोर्सला अमेरिकेनं तैनात करण्याची गरज आहे, अन्यथा अमेरिकेला मोठा धोका असल्याचा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. (China vs America )
===========
हे देखील वाचा : ही नवरात्र ९ दिवस नाही तर १० दिवस साजरी होणार
==========
चीनची अंतराळ मोहीम २०२० पासून अधिक वेगानं सुरु झाली. जेव्हा जगभर करोना नावाची महामारी परसरली होती, त्याच काळात चीन अंतराळ मोहीमेची तयारी करीत होता. चीनचे मिनी स्पेसप्लेन ऑगस्ट २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आले. हे यान २७६ दिवस अंतराळ कक्षेत होते. चिनी प्रसारमाध्यमांनी ही मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले होते. मात्र या यानाबद्दल एका खाजगी अंतराळ कंपनीने धक्कादायक अहवाल दिला होता.
त्यानुसार, चीनच्या स्पेसप्लेनने अंतराळ मोहिमेदरम्यान एका वेगळ्या छोट्या वस्तूसह अनेक युद्धाभ्यास आणि डॉकिंग मोहिमांमध्ये भाग घेतला. चीनने अणु-सक्षम हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले असून ते पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याची बातमीही तेव्हा प्रसिद्ध झाली होती. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे अमेरिकेवर विजय मिळण्यासाठी अंतराळातून आक्रमणाची तयारी करत आहेत. त्याचाच हा एक भाग होता. नुकताच चीनने दुसऱ्यांदा चंद्राच्या पृष्ठभागावर यान पाठवण्याचा विक्रमही केला आहे. शिवाय चंद्रावरून माती आणून इतिहास रचला आहे. चाँगई 6 रोबोटिक चंद्र लँडर हे गेल्या आठवड्यात पृथ्वीवर परतले आहे. (China vs America )
चीनने चंद्राच्या दूरच्या बाजूने चार पौंडांपेक्षा जास्त माती गोळा केली आहे. चंद्राच्या या दक्षिणेकडील बिंदूवरून चंद्राचा नमुना पृथ्वीवर येण्याची मानवी इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. या मातीचे परिक्षण चीन कसे करणार हे त्यांनी जाहीर केलेल नाही. ही मोठी उपलब्धी असली तरी चीननं या मोहीमेसाठी जगातील अन्य देशांबरोबर संपर्क साधला होता. मात्र नासा आणि अमेरिकेला यापासून दूर ठेवले. त्यामुळेच या मोहीमेतूनही चीनच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. (China vs America )
अमेरिकेला मागे टाकण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे गांभीर्य अमेरिकन तज्ज्ञही चिंतेचा विषय मानत आहेत. अलीकडेच चीनने अंतराळ क्षेत्रात ज्या वेगाने प्रगती केली आहे, तो अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. रॅड यांच्या अहवालानं त्याला पुष्टी मिळाली आहे.
सई बने