अस म्हणतात की एखादी गोष्ट आपण मनापासून करायची ठरवली तर परिस्थितीही आपल्याला साथ देते. मग ती कोणीही गोष्ट असो वा क्षेत्र. जर मनात जिद्द आणि अंगात चिकाटी असेल तर आपण काहीही करू शकतो. याच जिद्दीच्या जोरावर भजी विक्रेता ते यशस्वी व्यवसायिक असणाऱ्या धीरूभाई अंबानींचा (Dhirubhai Ambani) आपण जीवन प्रवास पहिला.
भाजप नेते नितीन गडकरी १९९५ मध्ये राज्यात युतीच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. तेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या रस्त्याचे काम करायचे होते. यावेळी ज्याचे सर्वात कमी दराचे टेंडर असेल त्यालाच या रस्त्याचे काम मिळायला हवे अशी मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी अट ठेवली होती.
मात्र या रस्त्यासाठी त्यावेळी धीरूभाईंनी ३६०० कोटींचे सर्वात कमी दराचे टेंडर भरले होते. पण नितीन गडकरींना विश्वास होता की तो रस्ता २००० कोटीत पूर्ण होईल. म्हणून नितीन गडकरींनी या रस्त्याच्या योजनेबद्दल त्याकाळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना सांगितले.
परिणामी सरकारकडे जास्त पैसे नसल्याने मनोहर जोशींनी धीरूभाई अंबानींचे टेंडर नाकारले. आणि एक्सप्रेस वे बनवायची जवाबदारी नितीन गडकरींवर (Nitin Gadkari) सोपवली. पण हे टेंडर नाकारल्याने अंबानी खुप नाराज झाले.
धीरूभाईंचे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत चांगले संबंध असल्याने त्यांनी आपली नाराजी या दोघांना बोलून दाखवली. धीरूभाई नाराज आहेत हे लक्षात येताच बाळासाहेबांनी नितीन गडकरींना धीरूभाईंचा रुसवा काढून समजवायला त्यांच्या घरी पाठवले.
यानंतर काही दिवसांनी नितीन गडकरी धीरूभाईंना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यावेळी नितीन गडकरी आणि धीरूभाई अंबानी यांच्यासह त्यांची दोन मुले मुकेश व अनिल अंबानी हे चौघेजण एकत्र जेवायला बसले.
तेव्हा जेवण करत असताना धीरूभाईंनी गडकरींना “टेंडर तर नाकारलं, आता रस्ता कसा बनवणार?” असा प्रश्न केला. तेव्हा धीरूभाईंना समजवायला गेलेल्या गडकरींनी अंबानींना नकळत एक चॅलेंजच दिले होते. धीरूभाईंच्या या प्रश्नाचं उत्तर देताना गडकरी म्हणाले की, “हा रोड जर मी बनवला नाही, तर मी माझ्या मिशा कापून टाकेल.”
धीरूभाईंनी म्हणाले, “मी तुझ्यासारखे बोलणारे खूप बघितले, पण तुझ्याच्याने काहीच होणार नाही.” गडकरी आणि अंबानींची भेट संपते पण समजवायला गेलेल्या गडकरींना अंबानींचे हे शब्द मनाला लागले होते.
पुढे गडकरींनी या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यासाठी नितीन गडकरींनी राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. रस्त्यासाठी गडकरींनी अनेक कंपन्यांसमोर पैशांसाठी प्रस्ताव ठेवले. आणि अखेर गडकरींनी २००० कोटींचा रस्ता त्याहीपेक्षा कमी किंमतीत करून दाखवला.
यानंतर एके दिवशी धीरूभाईंनी हेलिकॉप्टरने तो रस्ता पहिला. तो रस्ता पाहून धीरूभाईं अवाक झाले. त्यांनी लगेचच मेकर चेंबरला नितीन गडकरींना भेटायला बोलावले. आणि याभेटीत धीरूभाई सगळा रुसवा विसरून गडकरींचे कौतुक करू लागले.
या भेटीवेळी धीरूभाई गडकरींना म्हणाले की तुझ्यासारखे ४-५ लोक जर देशात असतील तर देशाचे नशीबच बदलेल. धीरूभाई कौतुकाने पुढे म्हणाले,”नितीन मै हार गया, तुम जीत गये.”
कदाचित धीरूभाई यांच्या स्वभावातील अनेक पैलूंपैकी हा एक पैलूसुद्धा त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेला असावा.
-निवास उद्धव गायकवाड