देवभुमी म्हणून ज्या उत्तराखंडचा गौरव करण्यात येतो, त्या देवभुमीमध्ये आता चारधाम यात्रा सुरु होत आहे. उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात असलेल्या यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार स्थळांवर ही यात्रा होते. याच चारधाम यात्रेदरम्यान भाविक अनुसूया देवी मंदिर आणि अत्री मुनी आश्रमाला भेट देतात.
या मंदिराचे आणि अत्री मुनी आश्रमाचे महात्म्य एवढे आहे की, भाविक याला छोटा चार धाम म्हणून ओळखतात. याच ठिकाणी माता अनुसूया यांची ब्रह्मा, विष्णु, महेश यांनी परीक्षा घेतली होती. या मंदिराच्या काही अंतरावर पुढे अत्री ऋषींचा आश्रम आहे. हे ऋषी अत्री यांचे तपस्थळ म्हणून ओळखले जाते.
येथे जाण्यासाठीचा रस्ता हा अवघड आहे. सर्वात अवघड तिर्थस्थळ यात्रा म्हणूनही याचा उल्लेख होतो. येथेच अमृत झरा अखंड वाहत असतो. या झ-य़ाखाली स्नान करण्यासाठी अनेक भाविक जातात. देवी अनुसूया माता मंदिरस्थळी अत्री ऋषींचा आश्रम होता, असेही भाविक सांगतात. येथेच श्री दत्तमहाराजांचा जन्म झाल्याची कथा असून या मंदिरात दत्तजयंतीला मोठा मेळा भरतो. आता चारधाम यात्रा सुरु झाल्यावर या मंदिरातही भाविक मोठ्या संख्येनं भेट देतात. (Anusuya Devi Mandir)
उत्तराखंड हे चारधाम यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. याच उत्तराखंडमध्ये चारधामला आलेले भाविक माता अनुसूया मंदिराला भेट देणअयासाठी येतात. उत्तराखंडमध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत, त्यातील हे एक प्रमुख मंदिर आहे. चमोली जिल्ह्यातील गोपेश्वर येथे माता अनुसूया मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २००० मीटर उंचीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी एक मोठे जंगल पार करावे लागते. ही सर्व पाऊलवाट असून हा सर्वच परिसर वनसंपदेनं संपन्न आहे. येथेच देवी अनुसूया यांचा आश्रम होता.(Anusuya Devi Mandir)
देवी अनुसूया या महान ऋषी अत्रि मुनींच्या पत्नी होत्या. या मंदिरात देवी अनुसूयाची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात भगवान शिव, माता पार्वती आणि गणेशाच्या मूर्तीही आहेत. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराला भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतातच शिवाय ज्यांना ट्रेकींगची आवड आहे, असे ट्रेकरही माता अनुसूया मंदिर आणि अत्री ऋषी आश्रमाचा ट्रेक करण्यासाठी मोठ्या संख्येनं येतात.
विशेषतः येथे मे महिन्यात भाविकांची गर्दी होते. कारण याच दरम्यान चारधाम यात्रा चालू होते. हा भाग घनदाट वृक्षांनी आणि द-याखो-यांनी भरलेला आहे. जोरदार पाऊस झाला तर येथे जाता येत नाही. त्यामुळे मे महिन्यात मोठ्या संख्येनं या मंदिराला भाविक भेट देतात. (Anusuya Devi Mandir)
देवी अनुसूया यांचा आश्रम येथेच होता. येथेच त्यांची ब्रह्मा, विष्णु, महेश यांनी परीक्षा घेतल्याचे सांगण्यात येते. हे तीनही देव आश्रमात आल्यावर त्यांनी देवींची परीक्षा घेतली. पण देवी अनुसूया यांनी या तीनही देवांना लहान मुल केले. नंतर तिन्ही देव अनुसूया देवीचे पुत्र झाले आणि तेथे राहू लागले. त्यांच्या तपस्येचे सत्व माता पार्वती, माता लक्ष्मी, माता सरस्वती यांनी मान्य केले.
याच ठिकाणी दत्तात्रय महाराज आणि चंद्रदेवाचा जन्म झाल्याचीही कथा आहे. याच मंदिरापासून दोन किमी अंतरावर अत्री मुनींची गुहा आहे. ही त्यांची तपस्थळी असून अतीशय अवघड वाट या ठिकाणी जाण्यासाठी आहे. ज्या भक्तांना या गुहेतील अत्री मुनींच्या पुरातन मुर्तीचे दर्शन घ्यायचे असेल त्यांना मोठ्या पर्वताखालून झोपून या गुहेपर्यंत पोहचावे लागते.(Anusuya Devi Mandir)
==========
हे देखील वाचा : अमेरिकेत का काढली जात आहे जेएनयु आंदोलनाची आठवण
==========
याच ठिकाणी मोठी नदी आहे आणि अमृत धबधबा आहे. अत्री ऋषी गुहेत जाण्यासाठी या धबधब्यातूनही जावे लागते. या धबधब्याच्या पाण्यात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. मात्र माता अनुसूया मंदिर हे हिमालयाच्या उंच दुर्गम टेकड्यांवर वसलेले आहे, त्यामुळे येथे जाण्यासाठी पर्यटन विभागतर्फे खास सूचना देण्यात येतात. त्यांचे पालन भाविकांनी करावे असे आवाहन असते. माता अनुसूया माता मंदिराकडे जातांना श्री गणेशाची भव्य मुर्ती भाविकांना दिसते. ही स्वयंभू मुर्ती असून नागरी शैलीतील या मंदिरातही अनेक भाविक भक्तीने येतात.
सई बने