सौदी अरेबिया (Saudi Arabia) मधील मक्का आणि मदिना ही दोन्ही स्थळे जगभर राहणाऱ्या मुस्लिम धर्माच्या नागरिकांसाठी अतिशय पवित्र स्थाने मानली जातात. या भागातील हवामान हे येथे येणा-यांसाठी आव्हानात्मक असते. यातील बहुतांशी भाग हा वाळवंटी आहे. मात्र अलिकडच्या काही वर्षात या दोन्ही स्थळांचे रुपच बदलते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण या मक्का मदिनाच्या वाळवंटी प्रदेशात चक्क हिरवी कुरणे तयार झाली आहेत. अलिकडच्या काही महिन्यात या हिरव्या कुरणांवर चरणारे उंट अशी छायाचित्रे सोशल मिडियात फिरु लागली आहेत. काहीजण याला मोठ्या संकटाची चाहूल असे म्हणत आहेत. मात्र हा सर्व हवामान बदलाचा फटका असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सौदी अरेबियातील (Saudi Arabia) मक्का आणि मदिना या शहरांना जगभरातून हजारो भाविक भेट देतात. या सर्व भाविकांना येथील उष्ण वातावरणाची माहिती आहे. भाविक जेव्हा मक्का मदीनाला जाण्याची तयारी करतात, तेव्हा या उष्ण वातावरणाचा सामना कसा करायचा याच्या सूचना देण्यात येतात. मात्र आता हिच शहरे आपले वातावरण बदलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दोन्ही शहरांमधील उष्मा कमी झाला असून त्याचा परिणाम म्हणजे, येथे चक्क हिरवी कुरणे दिसू लागली आहेत. गेल्या काही वर्षात या भागात अचानक येणा-या पावसाची आणि वादळांची संख्याही वाढली आहे. या दोन्ही शहरांजवळचा परिसर हा हजारो वर्षांपासून वाळवंटी आहे. मात्र गेल्या काही वर्षांत येथील पावसाचे प्रमाण वाढल्यानं या वाळवंटी भागांना हिरवेगार केले आहे. हा बदल या शहरात येणा-या भाविकांना सुखावत आहे. मात्र काहींनी ही भविष्यातील मोठ्या आपत्तीची चाहूल असल्याचे सांगितले आहे. सध्या सोशल मिडियावर हिरवाईनं सजलेले मक्का मदीनाचे वाळवंट आणि अशाच भविष्यवाणी व्हायरल होत आहेत. (Saudi Arabia)
मुसळधार पावसामुळे मक्का आणि मदिनाभोवती एक हिरवेगार ओएसिस तयार झाले आहे. या शहरात येणा-या पर्यटकांसह येथील स्थानिकांनाही हा बदल प्राकर्षानं जाणवू लागला आहे. आता या हिरवळीवर वाळवंटाचे जहाज म्हणून ज्या उंटांचा उल्लेख करण्यात येतो, ते उंट मुक्तपणे चरतांना दिसत आहेत. हवामानाच्या या बदलाने स्पष्ट झालं आहे की वाळवंटातील कठीण परिस्थितीत जीवनरुपी पाण्याचा आधार मिळाला तर पुन्हा निसर्गाचे रुप बदलू शकते. पावसाच्या आगमनाने या भागातील कोरड्या जमिनीला पुन्हा जिवंत केले आहे.
या बदललेल्या परिस्थितीबाबत सोशल मीडियावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तसेच अनेकांनी आपली मते मांडायलाही सुरुवात केली आहे. काहींच्या मते याबाबात प्रेषित मोहम्मद यांनी १४०० वर्षांपूर्वी भाकीत केले होते. तर काहींनी याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगसोबत जोडून सौदी अरेबियातील वाळवंट काही वर्षानी मोठ्या हरित पट्ट्यात बदलणार असा दावा केला आहे. वातावरणातीलच बदलामुळे मक्का मदीनामधील ज्या भागात पाण्याची कायमची वाणवा होती, तिथे पाणी आले असून आता या भागात मोठी वृक्षसंपदा दिसू लागली आहे. (Saudi Arabia)
============
हे देखील वाचा : उदरनिर्वाहासाठी केली होती टुथपेस्टच्या रिकाम्या डब्याची विक्री… आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री
============
एकूणच सौदी अरेबियामधील (Saudi Arabia) तापमान हे अलिकडच्या काही वर्षात बेभरवशाचे झाले आहे. सौदीमध्ये वाळवंटी हवामान आहे म्हणजेच, तिथे सलग काही महिने सरासरी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते. या देशाच्या बहुतांश भागात वर्षभरात सरासरी वार्षिक पाऊस १५० मिमीपेक्षा कमी असतो. वाळवंटी हवामान असल्याने सौदीमध्ये पाऊस कमी पडतो, प्रामुख्यतः नोव्हेंबर ते एप्रिल या दरम्यान पाऊस असतो. सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधमध्ये पर्यटकांचा मोठा राबता असतो.
साधारण डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येथील हवामान आल्हाददायक असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. बहुतांशी पर्यटकांना येथील वाळवंटात रात्र अनुभवायला आवडते. कारण रात्री हे वाळवंट थंड होते. मक्कामध्येही वातावरण नेहमी ४३ अंश सेल्सिअस असते. मदीनामध्येही अशाच प्रकारचे वातावण असते. त्यामुळे या शहरात जाणा-या पर्यटकांना आणि भाविकांना आधी येथील वातावरणानुसार कपडे आणि अत्यावश्यक साधने घेण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र अलिकडच्या काळात येथील वातावरण पूर्णपणे बदललेल आहे. त्यामुळेच या साधनात एक छत्री आणि पावसाळी कपडे यांचाही समावेश झाला आहे.
सई बने