न्यूयॉर्क, अमेरिकेचे एक प्रगत राज्य. अमेरिका (America) या देशाला जागतिक महासत्ता म्हणून बघितले जाते. याच अमेरिकेचे सर्वात प्रगत राज्य म्हणून न्यूयॉर्कचे नाव घेतले जाते. न्यूयॉर्क शहर हे अमेरिकेचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. फारकाय संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय न्यूयॉर्क शहरात आहे. याच न्यूयॉर्क शहरात अनेक जागतिक अव्वल कंपन्यांची कार्यालये आहेत. आधुनिक सुखसोयींचे आगार म्हणूनही या शहराकडे बघितले जाते.
मात्र हे आधुनिक शहर आता एका वेगळ्याच समस्येनं हैराण झाले आहे. ही समस्या म्हणजे, उंदीर आहेत. हो, या आधुनिक शहरातील नागरिक येथे वाढलेल्या उंदरांच्या संख्येनं हैराण झाले आहेत. येथील रस्त्यांवर, बागांमध्ये मोठ्या प्रमाणात उंदिर वाढले आहेत. या उंदरांना पकडून त्यांना मारण्याचे मोठे आव्हान आता येथील प्रशासनासमोर उभे राहिले आहे. फारकाय येथील पोलीसांनाही उंदिर पकडण्याचे काम करावे लागत आहे. त्यावरुन अमेरिकेतील अती प्रगत असलेल्या या शहरातील उंदरांची संख्या किती वाढली आहे, याचा अंदाज येतो.

अमेरिकेतील (America) सर्वात मोठे शहर न्यूयॉर्क उंदरांमुळे हैराण झाले आहे. वाढलेल्या उंदरांनी न्यूयॉर्कवासीयांचे जीवन दयनीय केले आहे. येथील नागरिक या उंदरांना पकडण्याच्या प्रयत्नात जखमीही झाले आहेत. एका अंदाजानुसार न्यूयॉर्कमध्ये उंदरांची संख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. उंदरांची संख्या वाढण्यापासून रोखण्यासाठी येथील प्रशासनाने आत्तापर्यंत अनेक उपाय केले आहेत. मात्र ते सर्व अपयशी ठरले आहेत. अगदी त्यासाठी मिठाचे पाण्यापासून ते विषाच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या.
मात्र न्यूयॉर्कचे उंदिर या सर्वांपासून वाचले असून ते संख्येनं अधिकच झाले आहेत. या उंदिरांना पकडण्यासाठी सापळेही लावण्यात आले. तसेच बर्फाचाही मारा या उंदरांवर करुन झाला आहे. पण या सर्वांचा काहीही परिणाम उंदरांवर झालेला नाही. उलट उंदरांसाठी ज्या विषाच्या गोळ्या ठेवल्या, त्या विषाच्या गोळ्या अन्य प्राण्यांनी आणि पक्षांनी सेवन केल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घटल्या आहेत. काही घुबडांनीही या विषाच्या गोळ्या खाल्या असून ही घुबडं मृतावस्थेत आढळली. या घटनेनंतर न्यूयॉर्कमध्ये उंदरांना विष देऊन मारण्याऐवजी दुसरी पद्धत शोधली जात आहे. या उंदरांच्या नसबंदीची सूचनाही आली आहे. (America)
न्यूयॉर्क शहरात सध्या उंदरांना ‘स्नॅप अँड ग्लू‘ या सापळ्यात अडकवून मारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या विषाच्या परिणामामुळे अंतर्गत रक्तस्रावामुळे उंदीर मरतात. उंदरांना मारण्यासाठी कार्बन मोनॉक्साईड देखील वापरला जात आहे. या उंदरांनी येथील बागांना सर्वात नष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बागा आहेत, असा मंडळींनी उंदरांना मारण्यासाठी कुत्रा पाळायला सुरुवात केली आहे. या कुत्र्यांना त्यांनी उंदीर पकडण्याचे प्रशिक्षणही दिले आहे.
न्यूयॉर्क हे जागतिक शहरांमधील सर्वात महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या पर्यटकांना न्यूयॉर्कमधील हे उंदिर पाहून धक्का बसत आहेत. कारण येथील सर्वच पर्यटन स्थळांवर उंदरांचा स्वैर वावर सुरु आहे. अगदी येथील प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंग, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, सेंट्रल पार्क, टाइम्स स्क्वेअर, आणि प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही धावणारे उंदिर दिसतात. हे उंदिर अनेकवेळा बसलेल्या नागरिकांच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करतात. अचानक उंदिर दिसल्यामुळे पर्यटक घाबरत आहेत. तसेच या उंदरांमुळे कुठला आजार होणार नाही ना याची काळजीही त्यांना पडली आहे. (America)
ब-याच जणांना उंदिर चावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे उंदरांमुळे कुठला आजार झाल्यास काय करायचे हा प्रश्न या प्रगत शहरातील नागरिकांना पडला आहे. त्यामुळेच येथील नागरिकांनी या वाढलेल्या उंदरांना पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी प्रशासनानं ठोस पाऊल उचलावे अशी मागणी केली आहे. या उंदरांमुळे आम्हाला अनेकवेळा परदेशी नागरिकांसमोर अपमानीत व्हावे लागले आहे, असेही या नागरिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांनी या उंदरांच्या वाढत्या संख्येला फुटपाथवरील कच-यांचे वाढते ढिग कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
===========
हे देखील वाचा : भक्तांना रामलल्लांच्या सूर्याभिषेकाची प्रतीक्षा
===========
त्यामुळे न्यूयॉर्क शहराच्या प्रशासनाने रेस्टॉरंट्सना रस्त्यावर कच-याच्या पिशव्या टाकण्याच्या ऐवजी त्या कंटेनरमध्ये टाकण्यात याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. असे असले तरी न्यूयॉर्कमधील उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये उंदरांची संख्या सुमारे ३ दशलक्ष असल्याचे सांगितले जाते. आता याच उंदरांना कसे संपवावे हा प्रश्न जगातील सर्वात प्रगत शहराला पडला आहे.
सई बने
